
अरुणा इराणी यांनी या कारणासाठी घेतला आई न होण्याचा निर्णय
हिंदी चित्रपटसृष्टीत अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांचे चित्रपट आजही प्रेक्षक आवडीने पाहतात आणि त्यांच्या अभिनयकौशल्याची दाद देतात. अभिनेत्री अरुणा इराणी या त्यापैकीच एक आहेत. वडिलांकडे मुलांच्या शिक्षणासाठी पैसे नव्हते म्हणून अरुणा यांना वयाच्या सहाव्या वर्षी शिक्षण सोडावं लागलं होतं. १९६१ मध्ये त्यांनी बालकलाकार म्हणून पहिल्यांदा 'गंगा जमुना' या चित्रपटात काम केलं होतं. आजवर त्यांनी हिंदी, मराठी, गुजराती अशा भाषांमध्ये ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय. वयाची चाळीशी पार केल्यानंतर त्यांनी दिग्दर्शक कुकु कोहली यांच्याशी लग्नगाठ बांधली.
"कुकुजी यांना भेटले तेव्हा मी वयाची चाळीशी पार केली होती. माझ्या एका चित्रपटाचे ते दिग्दर्शक होते. आम्ही दोघंही एकमेकांकडे आकर्षित झालो होतो", असं त्या एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या. त्यावेळी कुकु यांचं लग्न झालं होतं आणि त्यांना मुलंसुद्धा होती. ही गोष्ट अरुणा यांनासुद्धा ठाऊक होती. १९६० मध्ये या दोघांनी लग्न केलं आणि लग्नानंतर अरुणा यांनी कधीच आई न होण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयाबाबत त्या 'फिल्मफेअर'ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त झाल्या होत्या. "मी जेव्हा माझ्या भाच्या आणि पुतण्यांना पाहते, तेव्हा मला मुलं नाहीत याचं समाधान वाटतं. जर माझ्या घरी पाहुणे आले आणि त्यांच्याशी माझी मुलं नीट वागली नाहीत तर मला त्याचं खूप वाईट वाटेल. माझा जवळचा मित्र डॉ. अजय कोठारी यांनी माझी खूप चांगली समजूत काढली. तू लग्न केलंस आणि जोडीदार शोधलास हे खूप चांगलं केलंस, पण तुझ्या आणि मुलांच्या वयातील अंतर तुला पुढे सांभाळायला कठीण होईल, असं त्यांनी मला सांगितलं. त्यांनी जे काही सांगितलं त्याच्याशी मी पण सहमत आहे. त्यामुळेच मी आई न होण्याचा निर्णय घेतला आहे", असं त्यांनी सांगितलं.
Web Title: This Is Why Aruna Irani Decided Never Have Any
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..