रामनगरीच्या आठवणी अजूनही तजेलदार

वंदन नगरकर
Sunday, 7 June 2020

माझे वडील अभिनेते राम नगरकर यांचं अहमदनगर जिल्यातील सारोळे हे एक छोटंसं गाव. काही कारणामुळे सर्व परिवाराला मुंबईला स्थलांतरित व्हावं लागलं. ही घटना आहे 1947 च्या पूर्वीची. तेव्हा बहुजन समाजातील लोक जास्त शिकत नसत. माझ्या वडिलांचे फारसे शिक्षण झाले नव्हते. तरुणपणात देशासाठी आपण काहीतरी करावं म्हणून ते राष्ट्र सेवा दलात जायला लागले. 

अवघ्या महाराष्ट्राला हसविणारे ज्येष्ठ अभिनेता आणि प्रसिद्ध एकपात्री कलाकार राम नगरकर आज (8जून) 25  वा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्त त्यांचे चिरंजीव एकपात्री कलाकार वंदन नगरकर यांनी त्यांच्याविषयी जागविलेल्या आठवणी...

माझे वडील अभिनेते राम नगरकर यांचं अहमदनगर जिल्यातील सारोळे हे एक छोटंसं गाव. काही कारणामुळे सर्व परिवाराला मुंबईला स्थलांतरित व्हावं लागलं. ही घटना आहे 1947 च्या पूर्वीची. तेव्हा बहुजन समाजातील लोक जास्त शिकत नसत. माझ्या वडिलांचे फारसे शिक्षण झाले नव्हते. तरुणपणात देशासाठी आपण काहीतरी करावं म्हणून ते राष्ट्र सेवा दलात जायला लागले. तिथे त्यांचा परिचय एस. एम. जोशी, ग. प्र. प्रधान, नानासाहेब गोरे तसेच निळू फुले, दादा कोंडके यांचाशी झाला. हे सर्वजण पथ नाट्यातून इंग्रजांविरुद्ध आवाज उठवायचे. या पथनाट्यतूनच माझ्या वडिलांच्या कलाप्रवासाची बीजे रोवली गेली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कला पथकातील झालेल्या मैत्रीमुळे दादा कोंडके आणि माझे वडिल यांनी 'विच्छा माझी पुरी करा' हे लोकनाट्य सुरू केलं. त्यांनी याचे हजारो प्रयोग केले. त्यामुळे या लोकनाट्यला संपूर्ण महाराष्ट्राने अक्षरशः डोक्यावर घेतलं. यात माझ्या वडिलांनी केलेली हल्याची भूमिका आणि त्यांच्या तोंडी असलेलं 'हल्ल्या थिर्र' हे डायलॉग प्रेक्षक आजही विसरलेले नाहीत. या लोकनाट्यमुळं दादा कोंडके आणि राम नगरकर हे नाव घराघरात पोचलं.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नंतर निळू फुले आणि राम नगरकर यांचं 'राजकारण गेलं चुलीत' आणि कथा अकलेच्या कांद्याची' हे या दोन लोकनाट्यांनी देखील धुमाकूळ घातला आणि मग आला याच जोडीचा ब्लॅक अँड व्हाइट सिनेमा. 'हऱ्या नाऱ्या झिंदाबाद' सत्तरच्या दशकात आलेला हा सिनेमाही खूप गाजला. यातील 'कशी नखऱ्यात चालतीया गिरणी' हे तेव्हा प्रचंड गाजलेलं गाणं आजही यूट्यूब वर पहायला मिळत.

 मनोरंजन क्षेत्रातील आणखी ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

'बायांनो नवरे सांभाळा', 'लक्ष्मी' आणि 'एक डाव भुताचा हे चित्रपटही हिट झाले. शूटिंग किंवा नाटकाच्या प्रवासाच्या दरम्यान माझे वडील त्यांच्या त्यांच्या आयुष्यात झालेले अनेक किस्से सांगून सर्वांना खूप हसवत. हेच किस्से एकत्र करून त्यांनी 'रामनगरी' हे त्यांचं आत्मचरित्र लिहिलं. याला प्रस्तावना होती दस्तुरखुद्द पु. ल. देशपांडे यांची. त्यामुळे रसिकांनी हे पुस्तक डोक्यावर घेतलं.  त्याला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार ही मिळाला. हे पुस्तक अभिनेते अमोल पालेकर यांनी वाचलं. त्यावर त्यांनी ' रामनगरी' हा हिंदी सिनेमा काढला. त्यात प्रमुख भूमिकाही राम नगरकर यांनीच केली. त्यात निळू फुले यांनीही भूमिका केली होती. त्याच दरम्यान प्रसिद्ध नाटककार आणि लेखक सुरेश खरे यांनी 'रामनगरी' हा एकपात्री कार्यक्रम सुरू करण्याची संकल्पना मांडली. ते म्हणाले मी बसवून देतो हा कार्यक्रम, या गोष्टीला वडिलांनी तात्काळ होकार दिला आणि मग सुरू झालं 'रामनगरी' नावाचा झंझावात. या रामनगरीचे हजारो कार्यक्रम देशात तसेच अमेरिका, कॅनडा, दुबई येथील मराठी मंडळांसाठी केले. 

अमेरिकेच्या दौऱ्याबाबत एक गंमतीदार किस्सा मला आठवतो. ही गोष्ट आहे साधारणपणे 1986 ची. ते त्यांचा दोन महिन्यांचा दौरा संपवून येणार होते. मी आणि माझे चार मित्र पुण्याहून पहाटे पहाटे त्यांना मुंबई विमानतळावर घ्यायला गेलो. आम्ही बोर्डवर पाहिलं त्यांचं विमान आलेलं होतं. आम्ही वरून काचेतून पहात होतो. त्या सरकत्या पट्यावरून लोक आपापल्या बॅगा घेत होते. खूप गर्दी होती पण त्यात आम्हाला माझे वडील सहज सापडणार होते, त्याचं कारण होतं त्यांचे कपडे, पायजमा आणि झब्बा. असे कपडे घालणारी व्यक्ती एअरपोर्टवर सापडणं जरा अवघडच होत. संपूर्ण अमेरिका ते याच कपड्यात फिरले होते. पण या गर्दीत खूप वेळ झाला तरी ते दिसेनात. तेव्हड्यात समोर एक सूट-बूट घातलेली एक पाठमोरी व्यक्ती आम्हाला दिसली. तिने सुटावर तिरकी  शबनम (झोळी) लावलेली होती आणि ती व्यक्ती तंबाकू खात होती. आम्ही सर्वजण सांशंक नजरेने तिकडे पहात होतो. नंतर नीट पाहिलं तर काय? ते होते माझे वडील. ते बाहेर आल्यावर मी विचारलं "एकदम सुटात कसे" ते म्हणाले " ती अमेरिकेतील मराठी मंडळी म्हणाली, रामभाऊ तुम्ही भारतात जाताना, सूट घातलाच पाहिजे. मी त्यांना म्हणालो, तो मी परत नाही घालणार, त्या लोकांनी आग्रह सोडला नाही, आता इतक्या प्रेमाने ते म्हणाल्यामुळे नकार नाही देऊ शकलो." आम्ही गाडीत बसून पुण्याकडे निघालो,

काही अंतर पार केल्यावर वडील म्हणाले "गाडी डाव्या बाजूने घे, थांबू नकोस, घे डाव्या बाजूने." मी म्हटलं," अहो तिथं खड्डा आहे." ते म्हणाले, "हो हो म्हणूनच मी म्हणतो आहे, घे घे खड्यातून घे" आम्हाला काहीच समजत नव्हतं. मग घेतली गाडी खड्यातून. जशी गाडी खड्यातून पुढे आली, तस ते म्हणाले, " वाऽवाऽवा आता भारतात आल्यासारखं वाटतंयं." मी म्हटलं, "म्हणजे? त्यावर ते म्हणाले, अरे मी दोन महिन्यांत तिकडे गाडीने खूप प्रवास केला. पण तिकडॆ खड्डे नसल्यामुळे हादरेच बसत नव्हते. त्यामुळे ही गोष्ट मी खूप 'मिस' करत होतो... त्यांचं हे उत्तर ऐकल्यामुळे आम्ही सर्वजण खो खो हसायला लागलो.

निळू फुले आणि राम नगरकर हे यशाच्या अत्युच्च शिखरावर असतानाही त्यांचे पाय मात्र जमिनीवर होते. हे मी स्वतः अनुभवलंय. आमचं 'वंदन हेअर कटींग सलून' हे पुण्यातील टिळक रोड वरील प्रसिद्ध दुकान. कार्यक्रम नसतील तेव्हा या दुकानाच्या बाहेरील कट्ट्यावर निळूभाऊ आणि रामभाऊ पानसुपारी खात बसलेले असायचे. त्यांच्याकडे सर्वजण कौतुकाने पहायचे. त्यातील काही जण 'हऱ्या नाऱ्या झिंदाबाद' अशी हाकही मारायचे. हे दोघे त्यांना हाथ हलवून प्रतिसाद द्यायचे.

माझ्या वडिलांचे 8 जून 1995 रोजी निधन झाले. त्यांनी त्यांच्या मृत्युपत्रात लिहिल्याप्रमाणे आम्ही त्यांचं देहदान केलं. ते गेले तेव्हा मी तिशीत होतो. तीन लहान बहीण भावंड, आई तीन महिन्यांपूर्वी गेली होती. आम्ही पोरके झालो होतो. पण त्यावेळी निळूभाऊंनी आमच्या पाठीवर मायेचा हात ठेवून आम्हाला खूप धीर दिला. निळूभाऊंचा आमची विचारपूस करण्यासाठी नेहमी फोन यायचा. वेळ मिळाला की घरीही यायचे. असेच एकदा ते आले असताना मला म्हणाले, "वंदन मला रामभाऊंची आठवण म्हणून त्यांची एक वस्तू हवी आहे." मी, "हो हो नक्की देतो, काय हवंय"? तेव्हा ते म्हणाले, "मला रामभाऊंचा तो अडकित्ता हवा आहे." हे बोलताना त्यांचे डोळे पाणावले होते." तो अडकित्ता मी त्यांना दिला. 

निळू फुले आणि राम नगरकर यांनी 'हऱ्या नाऱ्या झिंदाबाद' या सिनेमात सख्या भावांचा रोल केला होता. पण प्रत्यक्ष आयुष्यातही हे नातं त्यांनी निभावल होतं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tribute to Veteran actor and famous solo artist Ram Nagarkar today 25th Memorial Day