esakal | ईदची इमोशनल भेट! (ट्युबलाईट-नवा चित्रपट)
sakal

बोलून बातमी शोधा

tublight movie review

ईदची इमोशनल भेट! (ट्युबलाईट-नवा चित्रपट)

sakal_logo
By
सुशील आंबेरकर

सलमान खान ईदनिमित्त पुन्हा आपल्या रसिकांसाठी मेजवानी घेऊन आलाय; पण नेहमीचा मसाला त्यात नाही. आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडत त्याने "ट्युबलाईट'सारखा काही हलकेफुलके प्रसंग असलेला मेलोड्रामा पेश केलाय. दिग्दर्शक कबीर खानने "बजरंगी भाईजान'नंतर सलमानसारख्या मेगास्टारला सलग दुसऱ्या सिनेमात एका सज्जन माणसाच्या भूमिकेत दाखवलंय. "ट्युबलाईट'मधला सलमान आपल्याला हसवतो, रडवतो अन्‌ एक आत्मविश्‍वास देतो... सिनेमाच्या कथेचा तोच गाभा आहे. "क्‍या तुम्हे यकीन है' अशी टॅगलाईन असलेला "ट्युबलाईट' तुमच्या मनात ठाम विश्‍वास असेल तर डोंगरही हलवू शकता, असा संदेश देतो. 

"ट्युबलाईट'ची कथा आहे दोन निराधार भावांची अन्‌ त्यांच्यातील प्रेमाची. मोठा लक्ष्मणसिंह बिष्ट (सलमान खान) अगदी निरागस असतो. त्याची समज कमी असते. इतकी की अनेकदा तो पॅंटची झिपही लावायला विसरतो. उशिरा ट्युब पेटत असल्याने सर्वच जण त्याला ट्युबलाईट म्हणून हिणवतात. लहान भाऊ भरतसिंह बिष्ट (सोहेल खान)वर त्याची मदार असते. भारत-चीनच्या सीमेवर असलेल्या एका निसर्गरम्य गावातील आश्रमशाळेत ते मोठे होतात. दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम असतं; पण युद्धाचे वारे वाहू लागल्यानंतर भरत लष्करात भरती होतो अन्‌ त्यांची ताटातूट होते. भरतचा विरह लक्ष्मण सहन करू शकत नाही. त्याला परत आणण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू होतात. महात्मा गांधीजींच्या आदर्शांचं पालन करणाऱ्या लक्ष्मणला पूर्ण विश्‍वास असतो, की आपण आपल्या भावाला परत आणू शकू. मग काय होतं ते पडद्यावर पाहणंच रंजक ठरतं.

 आतापर्यंत आपण सलमानला मारधाड करताना, आयटम सॉंगवर थिरकताना अन्‌ शर्टलेस होऊन डोलेशोले दाखवताना पाहिलंय; पण "ट्युबलाईट' वेगळा आहे. त्याचं कारण अर्थातच कबीर खान. कबीरने सलमानची इमेज तोडण्याचा प्रयत्न दुसऱ्यांदा यशस्वी केलाय. बघायला गेलं तर "ट्युबलाईट'ची भट्टी इतकी काही जमलेली नाही तरी सलमानच्या चेहऱ्यावरचे निरागस भाव अन्‌ त्याचं लाघवी बोलणं तुमच्या डोळ्यात पाणी आणतं... तुम्हाला खिळवून ठेवतं. एक नवा इमोशनल सलमान पाहायला मिळतो. चित्रपटाची कथा, पटकथा अन्‌ काही अंशी दिग्दर्शनही ठेपाळलंय; पण सलमानचा "वन मॅन शो' तारून नेतो. भाऊ सोहेलबरोबर असलेलं त्याचं रिअल लाईफमधलं बॉण्डिंगही जाणवतं. सोहेल खान, ओम पुरी, मोहम्मद अयुब आदी कलाकारांनी उत्तम साथ दिलीय. ओम पुरींनी आपल्या अखेरच्या सिनेमात अप्रतिम अभिनयाचा नजराणा सादर केलाय. विशेष उल्लेख करावा लागेल तो चिनी अभिनेत्री झू झू आणि बालकलाकार मातीन रे तुंग यांचा. झू झूने आपल्या भूमिकेला चांगला न्याय दिला. मातीननेही सलमानला मोलाची साथ दिलीय. त्यांच्यातील काही प्रसंगी मजेदार झालेत. किंग खान शाहरूखही जादूगाराच्या रोलमध्ये भाव खाऊन जातो. एकच फ्रेम शेअर करताना दोघांनीही आपल्या सहज अभिनयाने बाजी मारलीय. प्रीतमचं संगीत अप्रतिम आहे. सजन रेडिओ, नाच मेरी जान, तिनका तिनका दिल मेरा आदी गाणी उत्कृष्ट झालीय. कोरिओग्राफीही परफेक्‍ट सलमान स्टाईल आहे. विशेष म्हणजे कथेच्या अनुषंगाने गाणी येत असल्याने ती अजिबात बोअर करीत नाहीत. 

अमेरिकन युद्धावर आधारित असलेला हॉलीवूडपट "लिटील बॉय'वरून "ट्युबलाईट' बनवण्यात आलाय. 1962 च्या चीन-भारत युद्धाचा संदर्भ कथेला आहे. साहजिकच सिनेमाची सिनेमॅटोग्राफीही तितकीच महत्त्वाची होती. तशी ती आहेही. अप्रतिम कॅमेरावर्कने सिनेमा देखणा झालाय. सलमानच्या फॅन्सना तसं सिनेमाच्या कथा-पटकथेशी काही मतलब नसतो. सलमान आहे ना... मग फुल टाईमपास होणार, असा विश्‍वास त्यांना असतो. इथेही सलमानने थोडं हसवून अन्‌ जास्त रडवून आपल्या फॅन्सना ईदची एक इमोशनल; पण अनोखी "ईदी' दिलीय! 

loading image
go to top