अमृता-जितेंद्रचा 'चोरीचा मामला', पोट धरुन हसवणारा ट्रेलर पाहाच !

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 January 2020

अमृता खानविलकर आणि जितेंद्र जोशी यांचा 'चोरीचा मामला' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर तो सध्या व्हायरल होतोय. 

मुंबई : बॉलिवूडच्या मागोमाग आता मराठी सिनेमांची मेजवानीही प्रेक्षकांना मिळणार आहे. मनोरंजन करण्यासाठी एक कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. अमृता खानविलकर आणि जितेंद्र जोशी यांचा 'चोरीचा मामला' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर तो सध्या व्हायरल होतोय. 

कॉमेडी, चोरी आणि क्राइम यांचं कॉम्बिनेशन असलेला हा चित्रपट असणार आहे. अमृताचा हॉट आणि क्युट अंदाज यामध्ये पाहायला मिळतोय. शिवाय ट्रेलर पाहिल्यावर लक्षात येते की हा चित्रपट कॉमेडीचा तडका असणार आहे आणि प्रेक्षकांना पोट धरुन हसवण्यात यशस्वी होणार आहे. 

चित्रपट प्रियदर्शन जाधव यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटामध्ये अमृता खानविलकर, जितेंद्र जोशी, हेमंत ढोमे, अनिकेत विश्वासराव, क्षिती जोग, कीर्ती पेंढारकर अशी क्रेझी स्टार कास्ट पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटामध्ये एक क्युट भूमिका दिसणार आहे ती म्हणजे 'लियो' नावाच्या एका कुत्र्याची. चित्रपटाच्या पोस्टरवरही हा कुत्रा दिसतो. एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट प्रस्तुत आणि स्वरुप स्टुडिओजच्या सहकार्याने सुधाकर ओमाळे, आकाश पेंढारकर, सचिन नारकर,विकास पवार, स्मिता ओमळे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.

काही दिवसांपूर्वी प्रियदर्शनने चित्रपटाचे पोस्टर इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करुन 'एकामागे एक आले किती चोर, गॅरंटी देणार, तुम्ही होणार नाही बोअर!', हे कॅप्शन दिलं होतं. तर, आता अमृताने फेसबुकवर चित्रपटाचा ट्रेलर शेअर करताना लिहिले आहे की,''जगात चांगुलपणा शिल्लक आहे...आमचा चोरीला गेलेला ट्रेलर परत मिळाला..आवडून घ्या, आणि सगळ्यांबरोबर वाटा''. जानेवारीच्या 31 तारखेला हा चित्रपट सिनेमागृहात दाखल होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Upcoming marathi movie choricha mamla trailer out