रितेश-जेनेलियाचा प्रेमात पाडणारा 'वेड'! अभिनय, गाणी सगळंच 'लई भारी' | Ved Marathi Movie Review | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ved Review

Ved Review : रितेश-जेनेलियाचा प्रेमात पाडणारा 'वेड'! अभिनय, गाणी सगळंच 'लई भारी'

Ved Marathi Movie Ritesh Deshmukh Genelia Ashok Saraf : मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची अभिनेत्री पत्नी जेनेलिया हे दोघेही सोशल मीडियावर चर्चेत असणारे सेलिब्रेटी. आपल्या चित्रपटाचे प्रमोशन कसे करावे याचे तंत्र त्या दोघांकडून शिकण्यासारखे आहे. यापूर्वी रितेशनं त्याच्या चित्रपटांचे दणक्यात प्रमोशन करुन प्रेक्षकांना आपली कलाकृती पाहण्यास भाग पाडले होते.

काही दिवसांपूर्वी रितेशच्या वेड चित्रपटावरुन वाद सुरु झाला होता. त्याला कारण म्हणजे त्याच्या बाऊन्सरनं पत्रकारांशी वाद घातला होता. बॉलीवूडमध्ये वेगळी ओळख आणि नाव असणाऱ्या रितेशनं असं वागणं हे अनेकांना खटकलं होतं. जेनेलियाही सोशल मीडियावरुन ट्रोल करण्यात आले होते. यासगळ्यात रितेशनं माफी मागून त्या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

सध्या रितेशच्या वेडची चर्चा आहे. बऱ्याच वर्षांनी तो त्याच्या वेड नावाच्या कलाकृतीच्या माध्यमातून समोर आला आहे. पडद्यावरील त्याचा आणि जेनेलियाचा लूक भारावून टाकणारा आहे. यापूर्वी देखील त्या दोघांच्या चित्रपटातील केमिस्ट्रीला प्रेक्षकांनी पसंत केले होते. आता ते पुन्हा वेड मधून लाईमलाईटमध्ये आली आहे. चाहत्यांचा वेडला जोरदार प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.

अजय - अतुलच्या संगीताचा काळजाला भिडणारा स्वरसाज, बॉलीवूडच्या भाईजान सलमानचा कॅमिओ आणि यासाऱ्यात रितेश जेनेलियाचा पावरफुल अभिनय यामुळे वेड तुम्हाला वेडं करुन जातो हे नक्की. गाणी सुश्राव्य आहेत. संवाद फारसे लक्षात राहणारे नसले तरी कथेला पुढे घेऊन जाण्यात महत्वाची भूमिका बजावताना दिसतात. केवळ रितेशच नाही तर प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांनी देखील प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.

रितेशनं वेडचे ज्याप्रकारे प्रमोशन केले त्यामुळे तो मोठ्या प्रमाणात त्याचा चित्रपट पोहचविण्यात यशस्वी झाला आहे. त्यानं प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यासाठी प्रवृत्त केले आहे. यापूर्वी रितेशच्या लई भारीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. या ही चित्रपटात त्यानं दिग्दर्शक म्हणून केलेली कामगिरी प्रभावी आहे. दिग्दर्शक, निर्माता, भूमिका म्हणून त्यानं पेलेलं शिवधनुष्य हे त्यानं यशस्वीरित्या पेललं आहे.

हेही वाचा: Avatar The Way Of Water Review: तिकीट कितीचे का असेना, 'अवतार' खूश करतोच! अविस्मरणीय अनुभव

रितेशचा वेड हा चित्रपट मजिली या चित्रपटावर आधारित आहे. तो मुळचा टॉलीवूडचा चित्रपट आहे. त्यामुळे वेडचा जेव्हा टीझर, ट्रेलर आला तेव्हा तो कोण पाहणार, रिमेक करण्यात काय हाशील असे अनेक प्रश्न त्याला विचारण्यात आले होते. मात्र तुम्ही जेव्हा त्याच्या वेड च्या वाटेला जाल तेव्हा तो तुम्हाला प्रेमात पाडल्याशिवाय राहत नाही. वरवर साधी वाटणारी सत्या, रिया आणि श्रावणीची ती गोष्ट तुम्हाला अडकवून ठेवते. चाहत्यांना वेड यासाठी भावेल.

हेही वाचा: Govinda Avatar Offer: चक्क गोविंदा अवतारचा हिरो होणार होता, का नाकारली जेम्स कॅमेरूनची ऑफर ?

रितेशच्या भूमिकेचे कौतूक करावे लागेल. तो विनोदी अभिनेता आहे हे त्यानं यापूर्वी त्याच्या वेगवेगळ्या चित्रपटांमधून सिद्ध केलं आहे. मात्र एखादी गंभीर कथा वाट्याला आली तर त्याचे सोने कसे करायचे हे त्यानं त्याच्या भूमिकेतून दाखवून दिले आहे. त्यामुळे वेड हा प्रेक्षकांना प्रभावित करतो. क्रिकेट आणि जिया या दोनच गोष्टींवर सत्याचे मनापासून प्रेम आहे. क्रिकेटमध्ये मोठं नाव कमवायचे हे त्याचं स्वप्न आहे. पण वाटेवर काटे आहे. सत्याला व्यसनांचा मार्ग जवळचा वाटू लागतो.

हेही वाचा: Avatar 2 Collection : बॉलीवूड 300 कोटीत खुश, एकट्या 'अवतार'ची 83 अब्ज 84 कोटींची कमाई!

सत्याची वाट चुकलीये. ती सावरण्यासाठी त्याला श्रावणी मदत करतेय. अशात सत्याच्या आयुष्याला तिहेरी अर्थ प्राप्त झालाय. तो त्यापैकी कोणत्या नावेत बसून आयुष्याचा प्रवास पूर्ण करणार हे प्रेक्षकांनी वेड पाहून जाणून घ्यावं. वेड तुम्हाला निराश करणार नाही. निखळ मनोरंजन करत तुम्हाला प्रेमाची वेगळी व्याख्याही समजून सांगण्यात तो यशस्वी झाला आहे.

चित्रपटाचे नाव - वेड

दिग्दर्शक - रितेश देशमुख

कलाकार - रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख, अशोक सराफ,

रेटिंग - ***