माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी केलं ‘सिता रामम्’चं कौतुक, म्हणाले.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Venkaiah Naidu praises Dulquer Salmaan and mrunal thakur’s ‘Sita Ramam’, calls it a must watch

माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी केलं ‘सिता रामम्’चं कौतुक, म्हणाले..

सध्या चित्रपटांबाबत अत्यंत दूषित वातावरण आपल्या देशात आहे. चित्रपट बहिष्काराची मागणी आणि एकूणच कलाकारांवरचा वाढता रोष यामुळे परिस्थिती ढवळून निघाली आहे. अशामध्ये कोणत्या चित्रपटाला किती यश मिळेल, कोणता चित्रपट आपटेल याचा काहीच अंदाज बांधता येत नाहीय. पण यामध्ये बॉलीवूडपेक्षा दाक्षिणात्य चित्रपट काकणभर सरस ठरताना दिसत आहे. असाच एक तेलगू चित्रपट म्हणजे 'सीतारामम'. ५ ऑगस्ट रोजी रिलीज झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर तर कमाई करतोच आहे, पण खुद्द भारताचे माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (venkaiah naidu) यांनीही या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे. (Venkaiah Naidu praises Dulquer Salmaan and mrunal thakur’s ‘Sita Ramam’, calls it a must watch)

बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत असलेला ‘सिता रामम्’ हा तेलुगू चित्रपट ५ ऑगस्टला सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटातूनच मृणालने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. ‘सिता रामम्’ चित्रपटात अभिनेता दुलकर सलमान देखील प्रमुख भूमिकेत आहे. या चित्रपटाची सोशल मीडियावरही बरीच चर्चा आहे. या चित्रपटासंदर्भात कौतुक करणारे ट्विट स्वतः माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केले आहे.

व्यंकय्या नायडू यांनी चित्रपट पाहिल्यानंतर ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, 'सिता रामम्’ चित्रपट पाहिला. कलाकार आणि तंत्रज्ञानाच्या योग्य समन्वयाने चित्रपटातील काही सीन उत्कृष्टरित्या चित्रित झाले आहेत. एका साध्या लव्हस्टोरीला शूरवीर सैनिकाची पार्श्वभूमी दिली गेली आहे. भावनांची उत्तमरित्या सांगड घालणारा हा चित्रपट प्रत्येकाने जरूर पाहावा असाच आहे.'

पुढे ते म्हणतात, 'बऱ्याच काळानंतर चांगला चित्रपट पाहिल्याचं ‘सिता रामम्’ बघितल्यानंतर मला जाणवलं. एकीकडे युद्ध सुरू असताना चित्रपटातील निसर्गाचं सौंदर्य दाखवणारी दृश्ये डोळ्यांना सुखावणारी आहेत.' व्यंकय्या नायडूंनी चित्रपटाचे दिग्दर्शक हनु राघवपुडी यांचंही कौतुक केलं आहे. “दिग्दर्शक हनु राघवपुडी, निर्माते अश्विनीदत्त आणि स्वप्न मुव्ही मेकर्सचे अभिनंदन”, असंही ते म्हणाले आहेत. ‘सिता रामम्’ चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर ५० कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंधाना आणि अभिनेता तरूण भास्करनेही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.