esakal | कलाकारांसाठीची इन्सिट्यूट!
sakal

बोलून बातमी शोधा

sumitra bhave

कलाकारांसाठीची इन्सिट्यूट!

sakal_logo
By
टीम ई सकाळ

बहुआयामी चित्रकर्मी म्हणजे सुमित्रा भावे. साहित्य, आशय, शब्द, चित्र, कला, मूल्यं आणि माणूसपण या सर्व गोष्टींचा एकसंध विचार करून त्याला चित्रपटाचं रूप देण्याचं काम सुमित्रा भावे यांनी केलं. एकीकडे समाजशास्त्राचा अभ्यास, समाजातल्या सर्व घटकांविषयी कळकळ, चांगुलपणावर विश्वास आणि समूहभावनेने काम करण्याची सवय यांमुळे त्यांचे चित्रपट आणि कामाचे स्वरूपही वेगळे ठरले. कलाविश्वात आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणाऱ्या सुमित्रा भावे यांचं पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात निधन झालं आणि मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली. त्यांच्या निधनाचं वृत्त समोर आल्यानंतर कलाविश्वातील अनेकांनी त्यांच्या प्रतीचं प्रेम, आदर व्यक्त करत काही जुन्या आठणींना उजाळा दिला आहे.

ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे,डॉ. अनिल अवचट, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष यांसारख्या अनेकांनी सुमित्रा भावे यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या आहेत.

"सुमित्रा भावे यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही चित्रपट निर्मात्याने एचआयव्ही, स्किझोफ्रेनिया, कोड, स्मृतिभ्रंश, औदासिन्य या पाच आजारांचे संवेदनशील विषय हाताळले नाहीत. ‘जिंदगी झिंदाबाद’, ‘देवराई’, ‘नितळ’, ‘अस्तु’ आणि ‘कासव’ या पाच चित्रपटांतून त्यांनी ते हाताळले. त्या समाजशास्त्रज्ञ आणि संशोधक होत्या व त्यांना सिनेमा हे योग्य व शास्त्रीय माहिती लोकांपर्यंत पोचवण्याचे प्रभावी माध्यम आहे, याची जाणीव झालेली होती. ही माहिती मनोरंजनातून लोकांपर्यंत पोचवत त्या आजाराबद्दलचे गैरसमज व खोटी माहिती दूर करण्यासाठी त्या प्रयत्न करीत. त्या अत्यंत सोप्या भाषेत या आजाराबद्दल सांगत तो दूर करण्यात मानवी दृष्टिकोनाची भूमिका कशी महत्त्वाची आहे, हे समजावून सांगत. त्यांच्या चित्रपटांच्या चाहत्यांसाठी ही खूप मोठी हानी आहे. त्यांच्या शेवटच्या दोन चित्रपटांची निर्मिती मी केली होती", असं ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे म्हणाले.

"माझी आणि सुमित्राची कॉलेजपासूनची मैत्री होती. ती अत्यंत साधीसुधी होती. ‘बाई’ लघुपट करण्यासाठी सुरुवातीला आर्थिक अडचण आली, त्यावेळी माझ्या पत्नीने सुनंदाने शंभर रुपये काढले आणि पैसा उभा केला. त्यानंतर तिने उत्तमोत्तम चित्रपट निर्माण केले. कलाकारांना तिच्याकडून खूप काही शिकायला मिळायचे. तिच्या चित्रपटात कथा, पटकथा, एडिटिंग सर्व काही तीच करे. तिने निर्माण केलेला ‘दिठी’ चित्रपट खूपच अप्रतिम होता. चित्रपट निर्माण करणे हा तिचा ध्यास होता. अत्यंत प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्त्वाला आपण हरपलो आहे".- डॉ. अनिल अवचट, ज्येष्ठ लेखक

"तिच्यासारखी व्यक्ती विरळाच. अशी विलक्षण व्यक्तिमत्त्वे अभावानेच आढळतात. ती सर्वगुणसंपन्न तर होतीच, त्याचबरोबर सामाजिक कार्याची तळमळ हे तिचे वैशिष्ट्य होते. सामान्य नागरिकांबद्दल तिच्यामध्ये कमालीची कणव होती. ती अत्यंत साधेपणाने विषयाची मांडणी करायची. तिच्या डोक्यात सतत काही ना काही तरी सुरू असायचे. राष्ट्र सेवा दलाची पार्श्वभूमी आणि समाज विज्ञानाची पदवीधारक अशा दुहेरी भूमिकेतून ती समस्यांकडे पाहत असे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांचा ती कायम अभ्यास करे. विविध गुणांचा तिच्यामध्ये समुच्चय झालेला होता. स्वभावातील प्रसन्नतेमुळे तिचा मित्र परिवार मोठा होता. सामाजिक दृष्टिकोन असलेले व्यक्तिमत्त्व हरपले असून मोठी हानी झाली आहे. तिच्या चित्रपटांना अनेक पुरस्कार मिळाले असले, तरी तिला पद्म पुरस्कार मिळाला नसल्याची मला खंत आहे."- ज्योती सुभाष, ज्येष्ठ अभिनेत्री

"सुमित्रा भावे यांच्या बरोबर मी ‘नितळ’ या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. त्यांच्या एका वर्कशॉपला मी त्यांना आणि सुनील सरांना पहिल्यांदा भेटलो. त्यांच्या ‘देवराई’ या चित्रपटाने मी भारावून गेलो होतो व वर्कशॉपमध्ये मी खूपच प्रश्न विचारत होतो. बहुदा हे बघूनच की काय त्यांनी मला नंतर त्यांचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी दिली. वर्ल्ड सिनेमा, शॉर्ट फिल्मस, सिनेमा लँगवेज, माफमलबाग, किरोस्तामी, तार्कोवस्की, किस्लोव्स्की हे असले अगम्य शब्द माझ्या कानी पडू लागले. मराठी चित्रपटसृष्टीला खरा श्वास सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी दिला."- मंगेश जोशी, दिग्दर्शक

"मी तिला मावशीच म्हणायचे. माझीच नाही अनेकांवर तिने मावशीसारखे प्रेम केले. माझी आई तिच्याबरोबर काम करतानाचे पाहत मी लहानाची मोठी झाले. माझ्या पहिल्या ‘चाकोरी’ चित्रपटासाठी सुमित्रा मावशीने खूप मेहनत घेतली. कोणतीही भूमिका करण्यापूर्वी तिचे सर्व कंगोरे ती समजून सांगे. चित्रीकरण असलेल्या ठिकाणी ती दोन दिवस आधी घेऊन जायची. तिथे भूमिकेचा पूर्ण होमवर्क अत्यंत रंजक पद्धतीने करून घ्यायची. कलाकार म्हणून तिनेच माझा पाया पक्का करून घेतला. चित्रपट महोत्सवात चित्रपट कसा पहायचा हे तिनेच शिकवले. माझ्यासह अनेक कलाकारांना घडविण्यात तिचा मोलाचा वाटा आहे. सच्चाई, सचोटी हे तिच्याकडून शिकण्यासारखे होते. चित्रपट, वाचनावरील तिचे प्रेम थक्क करणारे होते. ते प्रेम तिने प्रत्यक्ष आचरणातून शिकविले."- अमृता सुभाष, अभिनेत्री

"कॉलेजमध्ये असल्यापासून मी सुमित्रा मावशींना ओळखते. त्यांच्या घरी त्यांनी मला ‘दोघी’ या चित्रपटाची गोष्ट सांगायला बोलावलं होतं. आमच्या या भेटीला आता पंचवीस वर्ष उलटून गेली. सुमित्रा मावशी या खूप जीवनासक्त होत्या. त्यांना माणसं खूप आवडायची. सगळ्याच्या सुख-दुःखात त्यांना सहभागी व्हायला आवडायचं. त्यांनी खूप प्रेम केलं आम्हा सर्वांवर. आमच्या सगळ्यांची खूप काळजी देखील घेतली. जेवढं त्यांना दिग्दर्शन आवडत होतं तेवढंच त्यांना कलादिग्दर्शन देखील आवडत होतं. सेटवरील कॉश्च्युम डिझायनिंग असो किंवा लेखन करणं असो त्या सर्वच गोष्टी अतिशय आवडीने करत असत. मानसिक स्वास्थ्य हा त्यांचा अतिशय जवळचा आणि आवडता विषय असायचा. दिग्दर्शिका म्हणून त्या सेटवर एक कडक आणि प्रेमळ मुख्याध्यापक कसे असतात तसं त्या सेटवर असायच्या. त्यांचं सगळीकडे लक्ष असायचं. मी त्यांच्यासोबत जी काम केली आहेत त्या सर्व कामांना पुरस्कार मिळाले आहेत. गेल्याच वर्षी मी त्यांना भेटायला पुण्याला गेले होते. त्या दिवशी त्यांनी मला त्यांच्या ठेवणीतली साडी भेट म्हणून दिली. जेव्हा मी साडी घालून त्यांना भेटले होते त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावर फारच आनंद होता. त्या माझ्या पाठीवरुन हात फिरवत होत्या. एक उत्तम लेखिका व दिग्दर्शिका. त्यांची पोकळी कोणीही भरून काढू शकत नाही."- सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री

"सुमित्रा भावे यांना मी लहानपणापासूनच ओळखत होते. त्यांची मुलगी सती आणि मी एका वर्गात होतो. मी त्यांची पहिली शॉर्टफिल्म 'बाई' बघितली त्यावेळेस मला त्यांचं खूप कुतूहल वाटलं कारण त्या माझ्या आईच्या वयाच्या होत्या आणि त्या पन्नाशीनंतर चित्रपट बनवत आहेत ही मोठी गंमतच आहे. त्या स्वतः लिहायच्या, त्यामुळे एक लेखिका व दिग्दर्शिका म्हणून माझ्यावर त्यांचे फार चांगले संस्कार झाले असे मी नक्की सांगेन. माझ्या पिढीच्या लेखकांवर, दिग्दर्शकांवर त्यांच्या कामाचा लेखनाचा, दिग्दर्शनाचा नक्कीच खूप प्रभाव आहे. माझ्यावर देखील त्यांचा खूप जास्त प्रभाव आहे. त्यांचं भाषेवर प्रभुत्व होतं. त्यांनी चित्रपटात लिहिलेले अनेक संवाद माझे तोंडपाठ आहेत. मी खूप वर्ष वाट पाहत होते त्यांच्यासोबत काम करण्याची. ‘वेलकम होम’ चित्रपटाची कथा त्यांनी मला फार पूर्वी ऐकवली होती.आणि त्यांनी मला सांगितलं होतं की तूच हा चित्रपट करायचा.मी स्वतःला खूप नशीबवान समजते की संपूर्ण वेळ मला त्यांच्यासोबत घालवता आला. त्यांच्याकडून शिकलेल्या गोष्टी मी एक दिग्दर्शिका म्हणून माझ्यामध्ये आणू शकले तर त्यांना खरी श्रद्धांजली होईल."- मृणाल कुलकर्णी, अभिनेत्री

"सुमित्रा भावे ही माझी सख्खी मावशी. आज सकाळीच ती दुःखाची बातमी आली व आमच्या घरातील सगळ्यांना, आमच्या संपूर्ण टीमला मोठा धक्का बसला. लवकरच ती एक नवीन प्रोजेक्ट सुरू करणार होती. त्याबाबतीत आमच्यामध्ये बोलणेही झाले होते आणि अचानक ती अशी निघून जाईल असे वाटलेले नव्हते. मला आजही आठवते आहे की तिने पहिली शॉर्ट फिल्म केली ‘बाई’ नावाची. तेव्हापासून मी तिच्याबरोबर काम करीत आहे. तेव्हा मी चार की पाच वर्षांची होते आणि पहिले काम सुमित्रा मावशीबरोबर केले. `देवराई’, ‘नितळ’, ‘संहिता’ अशा तिच्या प्रत्येक चित्रपटात मी वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. माझ्यासाठी आणि सगळ्यांसाठी ती एक अख्खी इन्स्टिट्यूट होती. आता आमची ती इन्स्टिट्यूट संपली आहे असे मला वाटते. आमच्या सगळ्यांसाठी ती आमची एक बेस्ट फ्रेण्ड होती आणि त्याचबरोबर आमची गाईडदेखील होती."- देविका दफ्तरदार, अभिनेत्री

"सुमित्रा भावे यांच्या वास्तुपुरुष आणि देवराई या दोन चित्रपटांत मी त्यांच्याबरोबर काम केलं. चित्रपट या माध्यमाकडे त्या एक फक्त एक मनोरंजनाचं माध्यम म्हणून नाही तर समाजात प्रबोधन घडवून आणण्याचं माध्यम म्हणून त्या बघायच्या. स्वतः उत्तम लेखिका असल्यामुळे मनोरंजन आणि प्रबोधन यांचा मेळ त्या खूप छान साधायच्या. दिग्दर्शिका म्हणून त्या खूप शांत आणि संयमी होत्या. एखादी गोष्ट मग ती कथा असो किंवा चित्रपटाची टीम; त्या खूप छान पद्धतीने फुलवून समोरच्याला सांगायच्या. त्यांच्या व्यक्तिमत्वात ममत्व होतं. त्यामुळे त्यांच्याशी बोलताना आपल्या घरातली एखादी मोठी व्यक्ती आपल्याशी बोलत आहे असं नेहमी वाटायचं."- तुषार दळवी, अभिनेते

"सुमित्रा भावे उत्कृष्ट लेखिका-दिग्दर्शिका होत्या. दिग्दर्शन किंवा अभिनय हे गुंतागुंतीचं न करता अत्यंत सहज सुंदररित्या त्या काम करायच्या आणि करवून घ्यायच्या. प्रत्येकाला त्यांच्याबद्दल कायम आदर वाटेल असं त्यांचं व्यक्तिमत्त्व होतं. कधी कुठे भेटल्या तर त्या सगळ्यांशी छान बोलायच्या. कायम हसतमुख आणि प्रसन्न असायच्या. सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या दिग्दर्शक द्वयासोबत काम करताना मला नेहमीच मजा आली. कधीच त्यांचं काही फिल्मी नसायचं. शूटिंग सेटवर अत्यंत घरगुती वातावरण असायचं."- मिलिंद गुणाजी, अभिनेते

"मराठी चित्रपटाला एका अर्थपूर्ण वाटेवर नेणाऱ्या प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक सुमित्रा भावे यांचं निधन हे अनेकार्थांनी दुःखद आहे. भावे या संवेदनशील दिग्दर्शक तर होत्याच, परंतु आपल्या प्रत्येक चित्रपटांमधून मानवतेची, प्रागतिक जीवनमूल्यांची कास धरून त्यांनी मराठी सांस्कृतिक विश्वाला एक वेगळे, प्रगल्भ परिमाण देऊ केले. स्त्रीचळवळीशी, ग्रामीण समस्यांशी जोडल्या गेलेल्या सुमित्रा भावेंनी अतिशय सकारात्मकतेने आपल्या भवतालाकडे बघत प्रेक्षकांच्या मनात कायम एक आशेचा अंकुर जागा ठेवला. स्त्रीप्रश्नाची आणि इतर सामाजिक प्रश्नांची त्यांची हाताळणी कला क्षेत्रासाठी पथदर्शक ठरली आहे. ‘मिळून साऱ्याजणी’ आणि अर्थातच विद्याताईंशी त्यांचा विशेष स्नेहबंध होता. त्यांच्या निधनाने ‘मिळून साऱ्याजणी’ परिवारातील एक जिवलग काळाच्या पडद्याआड गेला आहे."

- गीताली वि. मं.

संपादक, मिळून साऱ्याजणी

loading image