ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शिकर यांचं निधन

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Thursday, 8 October 2020

अभिनेते अविनाश खर्शिकर यांनी सिनेमा, मालिका आणि नाटक या तिन्ही माध्यमातून काम करत प्रेक्षकांची मनं जिंकली. १९७८ मध्ये 'बंदिवान मी या संसारी' या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

मुंबई- ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शिकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. आज सकाळी १० वाजता ठाणे येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांचं निधन झालं. अविनाथ खर्शिकर जानेवारीपासून आजारी होते. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावली होती. आज गुरुवार रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. 

हे ही वाचा: माधुरी दिक्षितसाठी पती नेने यांनी बनवला तिचा आवडता मराठमोळा पदार्थ, माधुरीची मजेशीर रिऍक्शन 

अभिनेते अविनाश खर्शिकर यांनी सिनेमा, मालिका आणि नाटक या तिन्ही माध्यमातून काम करत प्रेक्षकांची मनं जिंकली. कधी कॉमेडी तर कधी सिरीअस भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांना त्यांच्या अभिनयाच्या वेगवेगळ्या छटा दाखवल्या. नाटकातील त्यांच्या भूमिका चाहते डोक्यावर घेत असत.१९७८ मध्ये 'बंदिवान मी या संसारी' या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. 'जसा बाप तशी पोरं', 'आधार', 'आई थोर तुझे उपकार', 'माझा नवरा तुझी बायको', 'चालू नवरा भोळी बायको', 'बकुळा नामदेव घोटाळे', 'घायाळ', 'लपवाछपवी', 'माफीचा साक्षीदार'  यांसारख्या सिनेमांमध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्या.

 केवळ सिनेमातंच नाही तर रंगमंचावरही त्यांनी त्यांच्या अभिनयाची जादू दाखवली. 'तुझं आहे तुजपाशी', 'सौजन्याची ऐशी तैशी', 'वासूची सासू', 'अपराध मीच केला', 'दिवा जळू दे सारी रात', 'लफडा सदन' ही त्यांची नाटकेही प्रचंड गाजली. 

सिनेमा आणि नाटक या सोबतंच छोट्या पडद्यावरही अनेक मालिकांमध्येही भूमिका साकारल्या होत्या. 'दामिनी' या प्रसिद्ध मालिकेतील त्यांच्या भूमिकेलाही प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिली. त्यांच्या जाण्याने मराठी कलाविश्वात शोकाकुल वातावरण आहे. सोशल मिडियावर सेलिब्रिटी त्यांच्या आठवणीत त्यांना श्रद्धांजली देत आहेत.   

veteran marathi actor avinash kharshikar passed away  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: veteran marathi actor avinash kharshikar passed away