esakal | ज्येष्ठ गायक, संगीतकार अच्युत ठाकूर यांचे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

achyut thakur

ज्येष्ठ गायक, संगीतकार अच्युत ठाकूर यांचे निधन

sakal_logo
By
संतोष भिंगार्डे -सकाळ न्यूज नेटवर्क

लोकसंगीताला वेगळी ओळख देणारे ज्येष्ठ गायक आणि संगीतकार अच्युत ठाकूर Achyut Thakur यांचे मंगळवारी निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते. अच्युत ठाकूर यांना कोरोना झाला होता. उपचारासाठी त्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेले वीस दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यातच आज (मंगळवारी) त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला आणि रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अच्युत ठाकूर हे गेली चाळीसहून अधिक वर्षे संगीत क्षेत्रात कार्यरत होते. सुरुवातीचे संगीताचे धडे पं. शिवरामबुवा वरळीकर यांच्याकडे त्यांनी घेतले. पुढे या क्षेत्रातील त्यांचे गुरू पं. प्रभाकर म्हात्रे, आचार्य डी. पी. अडसूळ, खाँ साहेब गुलाम खाजाँ, पं. यशवंतबुवा जोशी, विश्वनाथ मोरे हे होते. (veteran marathi singer musician achyut thakur passes away)

गांधर्व महाविद्यालयातून ते ‘संगीत विशारद’ झाले. संगीतकार विश्वनाथ मोरे यांच्याकडे त्यांनी सात वर्षे सहाय्यक म्हणून काम केले. 1983 साली ‘श्री रामायण’ हा मराठी चित्रपट त्यांनी संगीतबद्ध केलेला पहिला चित्रपट होता. त्यानंतर ‘सौभाग्य वैंकण’, ‘पैज लग्नाची’, ‘घे भरारी’, ‘सत्ताधीश’, ‘गृहलक्ष्मी’, ‘सख्खा भाऊ पक्का वैरी’, ‘आता लग्नाला चला’, ‘सर्जा राजा’, ‘मर्मबंध’, ‘चिमणी पाखरं’ अशा अनेक चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. अनेक नाटकांनाही त्यांनी संगीत दिले.  ‘चूप गुपचूप’, ‘तीन पैशांचा तमाशा’, ‘जांभूळ आख्यान’ आदी नाटके रंगभूमीवर फार गाजली. विशेषत: ‘तीन पैशांचा तमाशा’ आणि ‘जांभूळ आख्यान’ ही नाटके रसिकांना फारच आवडली. आजवर जवळजवळ त्यांनी चाळीसहून अधिक चित्रपटांना संगीत दिले आहे, तसेच तर वीसेक नाटके संगीतबद्ध केली आहेत.

हेही वाचा: 'या' कारणामुळे मिलिंद सोमण करू शकला नाही प्लाझ्मादान

‘जांभूळ आख्यान’ हे त्यांनी संगीतबद्ध केलेले नाटक आज तीसहून अधिक वर्षे चालू आहे, तर ‘पैज लग्नाची’ आणि ‘मर्मबंध’ या चित्रपटांना संगीतकार व गायक म्हणून त्यांना दोन-दोन राज्य पुरस्कार मिळालेले आहेत. शिवाय त्यांनी काही मालिकांनाही संगीत दिले आहे. अच्युत ठाकूर यांनी संगीतबद्ध केलेली गाणी सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल, उत्तरा केळकर, रवींद्र साठे, वैशाली सामंत, देवकी पंडित, आशा खाडिलकर, साधना सरगम, फैय्याज, त्यागराज खाडिलकर, आरती अंकलीकर-टिकेकर आदी गायक-गायिकांनी गायली आहेत. त्यांना सहा राज्य पुरस्कार मिळालेले आहेत. तसेच 1992 साली अ. भा. मराठी नाट्य परिषदेचा उत्कृष्ट संगीतकार तर 1996 साली मुंबई महापालिकेचा उत्कृष्ट संगीत शिक्षक म्हणून महापौर पुरस्कार तसेच रायगड जिल्हा परिषदेचा ‘रायगड भूषण’ पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. तसेच त्यांना अ. भा. चित्रपट महामंडळातर्फे ‘चित्रकर्मी’ पुरस्कारही देण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील विविध भागांबरोबरच आसाम, नागालँड, उत्तर प्रदेश, दिल्ली, काश्मीर, प. बंगाल इत्यादी भारतातील अनेक राज्यांत सुगम व लोकसंगीताचे कार्यक्रम त्यांनी सादर केले आहेत. मराठी लोकगंगा, सूर तेच छेडीता या कार्यक्रमांबरोबरच युवक बिरादरी आणि इंडियन नॅशनल थिएटर या संस्थांमधूनही त्यांनी देशाच्या विविध भागांत कार्यक्रम केले आहेत. "जांभुळ आख्यान या नाटकाचे संगीत हे अविभाज्य घटक होते. काकांनी (अच्युत ठाकूर) ते दिले होते. माझे वडील विठ्ठल उमप गेल्यानंतर मी त्यांना सांगितले की काका काही तरी बदल करून द्या तर ते त्यांनी दिले. आम्ही दोनशेवा प्रयोग पुण्यात मागील वर्षी करणार होतो. आमच्या रिहर्सल सुरू झाल्या होत्या. काकांना खूप आनंद झाला होता. त्यानंतर कोरोना आला आणि सगळेच ठप्प झाले," अशी प्रतिक्रिया नंदेश उमप यांनी दिली.