esakal | 'झी मराठीने खूपच मनावर घेतलेलं दिसतंय'; नव्या मालिकांवर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

marathi serials

'झी मराठीने खूपच मनावर घेतलेलं दिसतंय'; नव्या मालिकांवर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

sakal_logo
By
स्वाती वेमूल

कोरोना काळात खचलेल्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी अनेक वाहिन्यांनी कंबर कसली आहे. नवीन संकल्पना, नवा आशय आणि नवे कलाकार घेऊन झी मराठी Zee Marathi वाहिनीवर पाच नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. झी मराठी वाहिनीवरील काही मालिकांनी अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली होती. मात्र ठराविक भागांनंतर कथेत एकसुरीपणा येत असल्याने प्रेक्षकांना या मालिका रटाळवाण्या वाटू लागल्या आहेत. याचाच परिणाम मालिकांच्या टीआरपीवर झाला. 'अग्गंबाई सूनबाई', 'देवमाणूस', 'कारभारी लयभारी' या मालिका बंद होण्याच्या मार्गावर असून त्यांच्या जागी नवीन मालिका दाखल होणार आहेत. झी मराठीच्या इन्स्टाग्राम पेजवर या नव्या मालिकांचे प्रोमो पोस्ट केले जात आहेत. या प्रोमोंवर प्रेक्षकांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. 'झी मराठीने खूपच मनावर घेतलेलं दिसतंय', असं एकाने म्हटलंय. तर काहींनी 'माझा होशील ना' आणि 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिका बंद करू नका, अशी विनंती केली आहे.

कोरोना महामारीचा मोठा फटका कलाविश्वाला बसला. अटीशर्तींच्या आधारावर पुन्हा शूटिंग सुरू झाले. त्यामुळेसुद्धा आता बऱ्याच नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. झी मराठीवर पाच नवीन मालिका आणि दोन रिअॅलिटी शो येणार आहेत. यामध्ये 'ती परत आलीये', 'तुझी माझी रेशीमगाठ', 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं', 'मनं बाजिंद झालं', 'मन उडु उडु झालं' या पाच मालिका, 'मी होणार सुपरस्टार' आणि 'बिग बॉस मराठी ३' या दोन रिअॅलिटी शोजचा समावेश आहे.

हेही वाचा: मालदीवमध्ये सोनाली कुलकर्णीचा बिकिनी लूक

प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

जुन्या मालिकांच्या रटाळ कथानकावरून अनेक प्रेक्षकांनी कमेंट्स केल्या होत्या. त्यामुळे 'आता झी मराठी बघावंसं वाटणार' अशी कमेंट एकाने केली. 'शेवटी झी मराठीने स्वच्छता अभियान सुरु केलं', असं दुसऱ्याने म्हटलं. यात अनेकांनी 'येऊ कशी तशी मी नांदायला' आणि 'माझी होशील ना' या मालिका बंद करू नका अशी विनंती केली आहे.

loading image
go to top