'आमचा साखरपुडा झाला नाही'; विराजसने चाहत्यांना केलं स्पष्ट | Virajas Kulkarni and Shivani are Not Formally Engaged | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virajas & Shivani are Not Formally Engaged

'आमचा साखरपुडा झाला नाही'; विराजसने चाहत्यांना केलं स्पष्ट

अभिनेता विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) आणि शिवानी रांगोळे (Shivani Rangole) यांनी त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा सोशल मीडियावर केली. हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा तर होतीच. मात्र त्यावर दोघांनी कधी जाहीरपणे कबुली दिली नव्हती. आता सोशल मीडियावर एकमेकांसोबतचा फोटो पोस्ट करत शिवानीने तिच्या हातातील अंगठी चाहत्यांना दाखवली आहे. सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर या सेलिब्रिटी कपलच्या लग्नसोहळ्याला विराजस आणि शिवानीने एकत्र हजेरी लावत सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. तेव्हापासून या दोन कलाकारांमध्ये प्रेमाचं नातं फुलल्याच्या जोरदार चर्चा आहेत. अखेर गुरुवारी फोटो पोस्ट करत या दोघांनी चर्चांवर शिक्कामोर्तब केला आहे. अंगठीचा फोटो पाहून या दोघांनी साखरपुडा केल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होऊ लागल्या आहेत. मात्र आम्ही दोघांनी अद्याप साखरपुडा केला नाही, असं विराजसने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्पष्ट केलंय. (Virajas & Shivani are Not Formally Engaged)

विराजस आणि शिवानी गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत विराजस म्हणाला, 'आमच्या पोस्टमधून आम्हाला चाहत्यांना हेच सांगायचं होतं की मी शिवानीला प्रपोज केलं आणि तिने त्याला होकार दिला. आमचा साखरपुडा झाला नाही. साखरपुडा लवकरच होईल, पण त्याबद्दल अद्याप काही ठरलेलं नाही.'

हेही वाचा: 'राजचं वागणं तिला सहन झालं नसतं'; बाळासाहेबांनी उलगडला माँसाहेबांच्या स्वभावाचा पैलू

या नात्याबद्दल शिवानी म्हणाली, 'आमचं रिलेशनशिप चाहत्यांसमोर जाहीर करावं यासाठी आम्ही योग्य वेळेची प्रतीक्षा करत होतो. आमच्या जवळच्या लोकांना माहितच होतं की आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत. जवळपास १० वर्षांपूर्वी आम्ही एकमेकांना भेटलो. एका इंग्रजी नाटकात मी काम करत होते. ते नाटक विराजसने लिहिलं होतं आणि त्याचं दिग्दर्शनसुद्धा त्याने केलं होतं. तेव्हापासून आमच्यात चांगली मैत्री झाली आणि या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.' विराजसने 'माझा होशील ना' या मालिकेत भूमिका साकारली. लवकरच तो दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

विराजससोबतच्या अफेअरच्या चर्चांवर शिवानी 'ई टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली होती, "होय, आमच्यात खूप चांगली मैत्री आहे आणि आम्हाला एकमेकांचा सहवास खूप आवडतो. पण लोकांनी माझ्या आणि विराजच्या नात्याबद्दल बोलत राहावं, चर्चा करत राहावी आणि मनमोकळेपणाने अंदाज वर्तवले जावेत असं मला वाटतं. कारण त्यात एक वेगळीच मजा आहे."

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top