‘जागतिक नेतृत्वाची योग्यता मराठी रंगभूमीतच’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

रंगभूमी दिनानिमित्ताने (ता. ५ नोव्हेंबर) राष्ट्रीय नाट्यशाळेचे माजी संचालक, ज्येष्ठ रंगकर्मी वामन केंद्रे यांच्याशी राज काझी यांनी साधलेला संवाद अंशरूपाने....

मराठी माणूस नाटकवेडा. त्याचे हे वेड व्यापक, गहिरे, बहुआयामी. हे नाट्यवेड मराठी माणसाने जिवापाड जपले, प्रयोगशीलतेने रंगभूमीचा वारसा उन्नत केला. या सकस मुशीतूनच ही रंगभूमी जगाला खूप काही देण्याच्या अवस्थेमध्ये पोहोचली आहे. प्रायोगिक आणि हौशी नाटकांबरोबरच व्यावसायिक नाटकांनीही रंगभूमीचे योगदान अधिक उठावदार केले, मराठी मन समृद्ध केले. रंगभूमी दिनानिमित्ताने (ता. ५ नोव्हेंबर) राष्ट्रीय नाट्यशाळेचे माजी संचालक, ज्येष्ठ रंगकर्मी वामन केंद्रे यांच्याशी राज काझी यांनी साधलेला संवाद अंशरूपाने....

प्रश्‍न - नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा अर्थात दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्यशाळेच्या संचालकपदाचा यशस्वी कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर मराठी रंगभूमीसंदर्भाने काही नव्याने जाणवते का?
केंद्रे :
संचालक होण्याच्या कैक वर्षांआधी मी तिथे विद्यार्थीही होतोच. त्याच वेळी भारतीय रंगभूमीचे समग्र दर्शन मला घडले होते. नवी जबाबदारी स्वीकारून मला पुन्हा तिथे काम करण्याची संधी मिळाली. मधल्या काळात हातून घडलेल्या कामाने गाठी आलेला अनुभव आणि प्रगल्भतेने इथे राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय रंगभूमीचे निरीक्षण अधिक तटस्थपणे करता आले. मराठी रंगभूमीची क्षमता नव्याने जाणवली. व्यावसायिक, समांतर, हौशी नाटकांशिवायही आपला नाट्यपट प्रचंड व्यापक आहे. संगीत, अभिजात, दलित, बोधी, कामगार, बाल रंगभूमी, झाडीपट्टी, दशावतारी, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्रातली प्रादेशिक वैशिष्ट्यांची रंगभूमी आणि त्याही आधी शेकडो वर्षांपासूनची गावोगाव, वाड्यातांड्यांची लोक रंगभूमी, असा हा विराट, विस्मयकारी पट आहे. मराठी रंगभूमीच्या मुखवट्यावर ही सगळी चिन्हं-चेहरे आले तरच ते न्यायपूर्ण चित्र होते. विविध रंग, शैली, धाटणी हे सगळे मिळून एकूण मराठी नाटक आहे. 

राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय रंगभूमीचे तौलनिक निरीक्षण केल्यानंतर हे ठामपणे जाणवते, की जागतिक रंगभूमीचे नेतृत्व करण्याची योग्यता आपल्या मराठी रंगभूमीचीच आहे. हा दावा सिद्ध होण्यासाठी ज्या प्रभावीपणे मराठी नाटक आंतरराष्ट्रीय मंचावर मांडले जायला हवे आहे, ते मात्र आजवर घडू शकलेले नाही. आपल्या रंगभूमीची सगळी बलस्थाने एकवटून जोरकसपणे ते जगापुढे ठेवण्याची गरज आहे. जगाचे लक्ष वेधून घेण्यासाठी ‘ग्लोबल व्हिलेज’ या आजच्या वास्तवाचा कल्पकतेने त्यासाठी वापर करता येईल.

प्रश्‍न - आपली प्रायोगिक- समांतर रंगभूमी आणि व्यावसायिक मुख्यधारा ही परस्परांना पूरक आहे की विरोधक?
केंद्रे :
हा सवतासुभा पन्नास-साठ वर्षांआधीपासूनच संपायला आला आहे. विजया मेहता, डॉ. श्रीराम लागू, डॉ. जब्बार पटेल, अमोल पालेकर यांच्या कामाच्या उंचीमुळे ‘नवता’ असलेले नाटक मुख्यधारेत सन्मानाने स्वीकारले गेले. तेव्हापासूनच मधल्या सीमारेषा पुसट होऊ लागल्या. ‘झुलवा’ किंवा ‘एक झुंज वाऱ्याशी’च्या रूपाने हा आनंद मीही अनुभवू शकलो. ‘वाडा नाट्यत्रयी’, ‘रणांगण’सारख्या वेगळ्याच प्रयत्नांनी मोठ्या प्रमाणात चोखंदळ रसिक प्रेक्षागृहांपर्यंत ओढला. आज ‘देवबाभळी’, ‘अनन्या’ला मिळणाऱ्या प्रतिसादाने ही वाट प्रशस्त होताना दिसते. समांतर रंगभूमीने ‘व्यावसायिक’ला आपली कक्षा आणि दर्जा वाढवण्यात कायम मदतच केली. जे स्थापित झाले ते ओलांडून त्यापलीकडचे नवे शोधणे हे आता ‘समांतर’पुढचे आव्हान आहे. चटपटीत शहरी नाटके आणि गावांकडची संथ मुरणारी नाटके यांच्यातले आदान- प्रदानही फलदायी ठरू शकेल.

********************** ********************** **********************

आपल्या रंगभूमीची सगळी बलस्थाने एकवटून जोरकसपणे ती जगापुढे ठेवण्याची गरज आहे. ‘ग्लोबल व्हिलेज’ या आजच्या वास्तवाचा कल्पकतेने त्यासाठी वापर करता येईल.

********************** ********************** **********************

प्रश्‍न - नाट्यकलेची निखळ आवड असो, किंवा नाट्य व्यवसायाची ओढ; त्याला शिक्षणाची जोड गरजेचीच आहे का?
केंद्रे :
शिक्षण आवश्‍यकच आहे, नव्हे ते अपरिहार्यच मानले पाहिजे. शिक्षणाच्या दोन पद्धती आहेत, औपचारिक किंवा अनौपचारिक. ‘एनएसडी’, ‘ललितकला’ किंवा तत्सम विद्यापीठीय, महाविद्यालयीन नाट्यशास्त्र अभ्यासक्रम ही औपचारिक शिक्षणाची दारे आहेत; पण वर्षानुवर्षे नाटकाचा ध्यास घेऊन ‘ट्रायल-एरर’ पद्धतीने सातत्याने प्रयोग करत राहणाऱ्या नाट्यसंस्था आणि व्यक्ती ही अनौपचारिक शिक्षणाची केंद्रे ठरतात. भालबा केळकर, विजया मेहता, सत्यदेव दुबे, डॉ. श्रीराम लागू, डॉ. जब्बार पटेल ही आपल्याच प्रयोग आणि अनुभवांमधूनच शिकलेली व इतरांनाही शिकवणारी, ऊर्जा देणारी उदाहरणे आहेत. कलाक्षेत्रात जन्मजात प्रतिभा, उपजत कौशल्य असे देवदत्त काहीही नसते. जे आपल्यात आहे, त्याला पैलू पाडायला शिकावे लागतेच; भले ते औपचारिक असो की अनौपचारिक. कौशल्याला कलेच्या पातळीपर्यंत त्या शास्त्राच्या आकलन आणि शिक्षणाची सांगडच नेऊ शकते. औपचारिक शिक्षणपद्धतीत शिकण्याचा काळ छोटा होतो.

प्रश्‍न - रंगकर्मींनी संघटितपणे किंवा सरकारने पाठबळ म्हणून मराठी रंगभूमीच्या समृद्धीसाठी आणखी काय काय करता येईल?
केंद्रे :
सरकार आजवर विविध योजनांयोगे रंगभूमीच्या मदतीला येत आलेच आहे; पण आता नव्या धोरणांमध्ये अधिक ‘दृष्टी’ बाळगायला हवी. मराठी माणसाला नाटकाचे अफाट वेड आहे आणि अपरिमित गतीही आहे, हे भरीव कामांमधून आता जगापुढे सिद्ध व्हावे. वैश्विक पातळी गाठण्यासाठी आता प्रयत्न व्हावेत. राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय महोत्सवांचे आयोजन होत राहिले पाहिजे. त्यातून इतरांकडून अधिक शिकताही येईल आणि आपली बलस्थानेदेखील जगापुढे आणता येतील. संगीत, नृत्य, चित्र, शिल्पकलांची स्वतंत्र विद्यापीठे जगभर आहेत; पण नाटकाची विद्यापीठ पातळीची किंवा परिघाची स्वतंत्र शिक्षण यंत्रणा जगात कुठेच नाही. मराठीला हा मान मिळवण्याची मोठी संधी आहे. एक सर्वसमावेशक, विशाल रंगविद्यापीठ आपल्याकडे उभे राहावे, जे जगात मराठी रंगकलेला उन्नत करेल.

साहित्यात, विज्ञानात रवींद्रनाथ टागोर किंवा होमी भाभा यांच्यासारख्या सन्माननीय फेलोशिप्स आहेत, त्या दर्जाच्या फेलोशिप्स आपण मराठीत नाटकांच्या संदर्भात ज्येष्ठांना प्रदान केल्या पाहिजेत, जे आपल्यालाच समृद्ध करणारे नवे आणखी काही देऊ शकतील. 

प्रायोगिक, समांतर रंगभूमीसाठी महाराष्ट्रात आजही एकसुद्धा स्वतंत्र संकुल नाही, जे प्रत्येक महसूल विभागात किमान एक तरी असावे. खूपच मनापासून सांगायचे तर राज्याचा सांस्कृतिक मंत्री हा कलावंत असावा, जो मराठी नाटकच नव्हे; सकल कलांसाठी पोटतिडकीने काम करेल. मराठी नाटक आणि कला नक्कीच जगभर तेजाने तळपतील! 

********************** ********************** **********************

राज्याचा सांस्कृतिक मंत्री हा कलावंत असावा, जो मराठी नाटकच नव्हे; सकल कलांसाठी पोटतिडकीने काम करेल. 

********************** ********************** **********************


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Waman Kendre exclusive interview