esakal | सोशल मीडियावर 'चेल्लम सरांची' क्रेझ, उदय महेश आहेत तरी कोण?
sakal

बोलून बातमी शोधा

उदय महेश

सोशल मीडियावर 'चेल्लम सरांची' क्रेझ, उदय महेश आहेत तरी कोण?

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: सध्या सर्वत्र THE FAMILY MAN 2 ची जोरदार चर्चा सुरु आहे. अपेक्षेप्रमाणे पहिल्या सीझनप्रमाणे दुसरा सीझनही रंगतदार ठरला आहे. त्यामुळे प्रेक्षकांची पसंती या वेबसीरिजला लाभली आहे. 'द फॅमिली मॅन २' मध्ये मनोज वाजपेयी आणि समंथा अक्किनेनी मुख्य भूमिकेत आहे. दोघांनी तोडीस तोड अभिनय केला आहे. त्यांच्या भूमिकांचे कौतुक होत आहेच. पण त्याचबरोबर 'चेल्लम सर' (Chellam sir) म्हणजे उदय महेश (Uday Mahesh)हे पात्रही हिट ठरले आहे. (who is Chellam sir in family man know about Uday Mahesh)

सोशल मीडियावर चेल्लम सरांविषयी भरपूर चर्चा होत आहे. त्यांच्यावरुन काही मीम्सही बनवण्यात आले आहेत. 'चेल्लम सर' म्हणजे उदय महेश यांचा फार मोठा रोल नाहीय. पण जितका वेळ ते स्क्रिनवर दिसले, त्यावेळी त्यांनी श्रीकांत तिवारीला मोलाची मदत केली. त्यामुळेच श्रीकांतला तामिळ बंडखोर आणि आयएसआयचा कट हाणून पाडता आला. सोशल मीडियावर चाहते 'चेल्लम सरांना' गुगल, विकिपीडिया ठरवून मोकळे झाले आहेत. वेबसीरिजमध्ये हे चेल्लम सर निवृत्त एनआयए अधिकारी दाखवले आहेत.

हेही वाचा: लस घेतल्यानंतर चुंबकत्व येतं का? तात्याराव लहाने म्हणतात...

द फॅमिली मॅन २ मधील हे चेल्लम सर खऱ्या आयुष्यात कोण आहेत, ते आपण जाणून घेऊया. चेल्लम सरांचे मूळ नाव उदय महेश आहे. ते तामिळ अभिनेते असून त्यांनी तामिळ चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. 'ऑफिस' या गाजलेल्या मालिकेतील विश्वनाथनच्या भूमिकेसाठी ते विशेष ओळखले जातात. त्याच रोलने त्यांना ओळख मिळवून दिली. २०१३ साली आलेल्या जॉन अब्राहमच्या 'मद्रास कॅफे' चित्रपटातही त्यांनी काम केले आहे. त्याशिवाय 'सीरियस मेन' या हिंदी चित्रपटातही त्यांनी भूमिका केली आहे. आतापर्यंत त्यांनी अनेक तामिळ चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे.