यू ट्यु बवरचं मराठी पाऊल...

तेजस परब
Tuesday, 2 May 2017

यू-ट्युबवर सध्या प्रादेशिक भाषेतील आशयाला प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देत आहेत. मराठीत वेगळ्या वाटेवरच्या विषयांना दाद मिळत आहे. त्याशिवाय आतापर्यंत कॉलेजच्या कट्ट्यावर रंगणाऱ्या गप्पांचे विषय आणि शब्दप्रयोग फिक्‍शन व नॉन फिक्‍शन स्वरूपात पाहायला मिळत असल्याने "कट्यावरच्या' चर्चांना नवीन प्लॅटफॉर्म मिळाल्याचे यू-ट्युब प्रेक्षकांचे म्हणणे आहे. दस्सा, स्मॉल, चाबूक, माहोल यांसारखे शब्दप्रयोग तुम्हाला माहीत नसतील, तर या यू-ट्युबवरचा हा नवा "मराठी आशय' नक्की सर्च करा. मराठी कलाकारांसोबतच काही नवीन चेहऱ्यांचीही वेब सीरिज स्टार म्हणून ओळख बनली आहे.

यू-ट्युबवर सध्या प्रादेशिक भाषेतील आशयाला प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देत आहेत. मराठीत वेगळ्या वाटेवरच्या विषयांना दाद मिळत आहे. त्याशिवाय आतापर्यंत कॉलेजच्या कट्ट्यावर रंगणाऱ्या गप्पांचे विषय आणि शब्दप्रयोग फिक्‍शन व नॉन फिक्‍शन स्वरूपात पाहायला मिळत असल्याने "कट्यावरच्या' चर्चांना नवीन प्लॅटफॉर्म मिळाल्याचे यू-ट्युब प्रेक्षकांचे म्हणणे आहे. दस्सा, स्मॉल, चाबूक, माहोल यांसारखे शब्दप्रयोग तुम्हाला माहीत नसतील, तर या यू-ट्युबवरचा हा नवा "मराठी आशय' नक्की सर्च करा. मराठी कलाकारांसोबतच काही नवीन चेहऱ्यांचीही वेब सीरिज स्टार म्हणून ओळख बनली आहे. तरीही अजून मराठी यू-ट्युब चॅनल्सला मैलाचा दगड पार करायचा आहे. मराठीचे वेगळेपण जपत नव्या विषयांसह पुढे पाऊल टाकणाऱ्या काही यू-ट्युब चॅनल्सचा उहापोह. 

संतोष जुवेकर, विजू माने, कुशल बद्रिके यांच्या यू-ट्युबवरील "चावट' नावाच्या मराठी यू-ट्युब चॅनलचे 75 हजारांहून जास्त सबस्क्रायबरर्स आहेत. "स्ट्रगलर साला' या त्यांच्या वेब सीरिजला आतापर्यंत 50 लाखांहून जास्त व्ह्युज मिळाले आहेत. कुशल आणि संतोष यांना मराठी फिल्म इंडस्ट्रीत चित्रपट मिळावा म्हणून, दिग्दर्शकांच्या ऑफिसच्या कशा फेऱ्या घालाव्या लागतात. दिग्दर्शकांकडे गेल्यानंतर त्यांची होणारी फजिती, इतर कलाकारांना मिळालेल्या फिल्म्सनंतर होणारी जळफळाट, असे धम्माल एपिसोड्‌स प्रेक्षकांना खूप हसवतात. त्यात नुकताच रिलीज झालेला भाऊ कदमसोबतच्या लंडनमध्ये चित्रित झालेल्या एपिसोडला सर्वाधिक लाईक्‍स मिळाले आहेत. 

"भाडिपा' म्हणजेच भारतीय डिजिटल पार्टी या यू-ट्युब चॅनलवरील "कास्टिंग काउच' हा कलाकारांच्या अनौपचारिक मुलाखतीचा कार्यक्रम आहे. अमेय वाघ, निपुण धर्माधिकारी आणि त्यांची टीम आलेल्या पाहुण्यांना शो सोडून जायला भाग पाडतात, असा शोचा "फॉरमॅट' आहे. अमृता खानविलकर, इम्तियाज अली, शाल्मली खोलगडे, अनुराग कश्‍यप या पाहुण्यांनी पळ काढला आहे. अमेय वाघ त्याच्या "यो' स्टाईलने चालू कार्यक्रमात दिग्दर्शकांना ऑडिशन देतो; पण त्याला काम काही मिळत नाही. निपुण कार्यक्रम सावरण्याच्या प्रयत्न करतो; पण आलेला कलाकार कार्यक्रम सोडून जातो. मिथाली पालकर आणि गांधार यांचे "महाराष्ट्र देशा' हे गाणे पाच लाखांहून अधिक जणांनी पाहिले आहे. 

कॅफे मराठी या यू-ट्युब चॅनलवर आजच्या पिढीला हटके विषयांवर बोलतं करणारा भक्ती पाठारेचा "बिनधास्त बोल' हा शो तरुणाईच्या कॉलेजनंतरचा कट्टा बनला आहे. रिलेशनशिप, सोशल मीडिया आणि बऱ्याचदा भाष्य न होणाऱ्या विषयांवर मुले-मुली मोकळेपणाने मते मांडतात. या कार्यक्रमासाठी प्रेक्षकही विषय सुचवू शकतात. या चॅनलचे 25 हजारांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. "वर्ल्ड फेमस इन महाराष्ट्र' आणि मराठी शॉर्ट फिल्मही या चॅनल्सवर पाहायला मिळतात. 

वायरस मराठी या नव्या चॅनलचे "शॉक कथा' आणि "ऑस्सम टू सम' हे दोन शोज कमी वेळातच प्रसिद्ध झाले आहेत. शॉक कथेच्या एपिसोडमध्ये "ट्‌विस्ट' आणून कथेचा शेवट केला जातो आणि प्रेक्षकांनी मांडलेली गृहीतके फोल ठरतात. ऑस्सम टू सम हा संतोष कोल्हे निर्मित वेगवेगळ्या गूढ रम्य पर्यटन स्थळांची माहिती देणारा शो आहे. महाराष्ट्रातील विविध स्थळांचे ड्रोनमार्फत चित्रीकरण हे या कार्यक्रमाचे आकर्षण आहे. रिचा अग्निहोत्री आणि गौरी नलावडे या दोघी त्यांना सुचेल त्या ठिकाणी झटपट पोहोचतात. त्यासाठी काही वेगळं प्लानिंग करत नाहीत. अशी या शोची रचना आहे. त्यांच्या पहिल्या एपिसोडमध्ये कोकणातील प्रसिद्ध वेतोबाच्या मंदिरात जातानाचा प्रवास यामध्ये चित्रित झाला आहे. 

मराठी प्रेक्षक अजूनही नव नव्या आशयाच्या शोधात आहेत. मराठीत आम्ही पहिल्यांदाच अशा विषयांवर प्रेक्षकांना व्यक्त होण्यासाठी प्लॅटफॉर्म दिल्याने आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत चॅनलला तीन लाख व्ह्युज मिळाले आहेत, हीच त्याची पावती आहे. आपल्या कॉन्टेंटबद्दल प्रामाणिक राहून नवीन काही सातत्याने विषय हाताळले, तर प्रेक्षकही नवीन अपडेट्‌सची वाट पाहतात. 
- भूपेंद्र कुमार नंदन (कॅफे मराठी, चॅनल हेड) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: you tube marathi industry