ऑन स्क्रीन : प्रेमकथांची ‘यश’स्वी गाथा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Movie

हिंदी चित्रपटसृष्टीत प्रेमकथांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. काळ कोणताही असो, प्रेमकथांना प्रेक्षकांचा कायमच पाठिंबा राहिला आहे.

ऑन स्क्रीन : प्रेमकथांची ‘यश’स्वी गाथा

- युवराज माने

हिंदी चित्रपटसृष्टीत प्रेमकथांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. काळ कोणताही असो, प्रेमकथांना प्रेक्षकांचा कायमच पाठिंबा राहिला आहे. अशाच भावनिक कथेत प्रेक्षकांना गुंतवून त्यांना प्रणयरम्य जगताची मनोहर सफर घडवून आणणारा एक अवलिया होता यश चोप्रा. नेटफ्लिक्सची नवीन डॉक्युमेंटरी ‘द रोमॅंटिक्स’ याच अवलियाने निर्माण केलेल्या ‘यशराज फिल्म्स’ची एक मनोवेधक सफर आहे.

यश चोप्रा, आदित्य चोप्रा आणि यश राज फिल्म्स यांचा हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रवास ‘द रोमॅंटिक्स’मध्ये चार भागांत विभागला आहे. पहिल्या भागात यश चोप्रा यांचे सुरुवातीचे चित्रपट, ७० च्या दशकात त्यांनी केलेली ‘यशराज फिल्म्स’ची स्थापना आणि चढ-उतार दाखवण्यात आलेत. दुसऱ्या भागात आदित्य चोप्रा यांचा उदय आणि ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’च्या निर्मितीचा प्रवास उलगडण्यात आला आहे. तिसऱ्या भागात आदित्य चोप्रा यांनी ‘यशराज फिल्म्स’ची धुरा सांभाळल्यानंतर झालेले बदल, ‘वायआरएफ’ ब्रॅंडचा चढता ग्राफ या सर्वांचा परामर्श घेतला गेलाय. चौथ्या आणि शेवटच्या भागात ‘यशराज स्टुडिओ’ची निर्मिती, यश चोप्रा यांचा शेवटचा चित्रपट ‘जब तक है जान’ आणि त्यादरम्यान त्यांचे झालेले निधन यांचा आढावा घेण्यात आलाय.

डॉक्युमेंटरीमध्ये जागोजागी ज्या काळात घटना घडत आहेत, त्या काळातील काही महत्त्वाचे संदर्भ दाखवण्यात आलेत. उदाहरणार्थ, १९४७ मध्ये झालेली फाळणी, १९७१ मधील युद्ध, १९७५ मधील आणीबाणी, ९० च्या दशकातील जागतिकीकरण अशा अनेक संदर्भातून तो काळ जिवंत होण्यास मदत होते. सध्याच्या घडीला कळीचा मुद्दा असणाऱ्या ‘नेपोटिझम’ या विषयावरही सिरीजमध्ये दिलखुलास भाष्य करण्यात आले आहे.

शाहरुख खान ते रणवीरसिंह आणि काजोल ते अनुष्का शर्मा अशा अनेक लोकप्रिय कलाकारांनी आपले अनुभव कथन केलेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे इतकी वर्षे कोणत्याच मुलाखतीत न दिसलेले आदित्य चोप्रा या सीरीजच्या निमित्ताने प्रेक्षकांसमोर आले आहेत.

‘यशराज फिल्म्स’च्या स्थापनेला आता ५० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. स्मृती मुंदरा दिग्दर्शित डॉक्युमेंटरीच्या निमित्ताने प्रेक्षकांना यशराजच्या चित्रपटांच्या आठवणींच्या सफरीत रममाण होण्याची संधी मिळाली आहे.