esakal | स्वस्त धान्य दुकानदार अडचणीत
sakal

बोलून बातमी शोधा

osmanabad

स्वस्त धान्य दुकानदार अडचणीत

sakal_logo
By
दिलीप गंभीरे

कळंब : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मे महिन्यात मोफत धान्य वाटप करण्याचे निर्देश दिले होते. यासाठी धान्य दुकानदारांकडून धान्याचे चलनाद्वारे पैसे भरून घेऊन हे धान्य शासनाच्या नावाने मोफत वाटले. रोखीने भरलेली रक्कम व प्रधानमंत्री गरीब कल्याण कुटुंब योजनेंतर्गत वाटप केलेल्या मोफत धान्याचा नफा अद्यापपर्यंत धान्य दुकानदारांना मिळाले नाही. त्यामुळे दुकानदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

या बाबत दुकानदारांनी जिल्हापुरवठा अधिकारी चारुशीला देशमुख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने मे महिन्याकरिता कार्डधारकांना मोफत धान्य वाटप करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार धान्य दुकानदाराने स्वतः जवळचे पैसे चलनाद्वारे शासनाच्या तिजोरीत भरणा करून सदरील धान्य कार्डधारकांना मोफत वाटप केले. दुकानदारांनी मे महिन्यात रोख स्वरूपात भरलेली रक्कम जून दरम्यान मिळणे अपेक्षित होते. मात्र, संबंधित विभागाकडून अद्यापही रक्कम मिळाली नाही. या शिवाय कोरोना काळात कार्डधारकांना प्रति माणसी पाच किलो धान्य मोफत वाटण्यात निर्णय केंद्र शासनाने घेतला असून, याची अंमलबजावणी मे महिन्यापासून सुरू आहे.

धान्य वाटपाच्या बदल्यात केंद्राकडून दुकानदारांना मार्जिन देण्यात येते. या संदर्भातील मार्जिन अद्यापपर्यंत मिळालेली नाही. त्यामुळे दुकानदार आर्थिक संकटात सापडले असून, त्यांना दिलासा देण्यासाठी पुरवठा विभागाने त्वरित मे महिन्यात दुकानदाराने रोख स्वरूपात भरलेली रक्कम व मार्जिन द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

पॉस मशीनमध्येही अडथळे

पॉस मशीनमध्ये वारंवार होणारे अडथळे दूर करावेत, पॉस मशीन महिन्याच्या पाच तारखेला धान्य कोठा टाकावा, प्रत्येक गोदामामध्ये इलेक्ट्रिक वजन काटा बसवून दुकानदारांना धान्य द्यावे, कोरोना संसर्गामुळे मृत्युमुखी पडलेल्या दुकानदारांच्या सदस्यांना आर्थिक मदत तत्काळ द्यावी आदी मागण्याही संघटनेचे जिल्हाध्यक्ष समाधान कदम, सचिव मनेश सोनकवडे, कार्याध्यक्ष शिवाजी जाधव, उपाध्यक्ष धनंजय शिंगाडे यांनी केल्या आहेत.

loading image
go to top