
शेतात मजूरी, कंपनीत रोजंदारी करणाऱ्या यशवंत थोरातची सहाय्यक कक्ष अधिकारी पदाला गवसणी
केज : हालाखीच्या परिस्थितीत कधी मजूरी तर नंतर कंपनीत नोकरी करत ढाकेफळच्या यशवंत निळोबा थोरात याने एमपीएससीत यश मिळवत मंत्रालय सहाय्यक कक्ष अधिकारी पदाला गवसणी घातली आहे. विशेष म्हणजे त्याने एकाच वेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक, विक्री कर निरीक्षक व सहाय्यक कक्षअधिकारी या तीन परीक्षांत यश मिळविले.
दोन एकर जमिन असलेल्या यशवंतने कधी स्वत:च्या शेतात तर कधी दुसऱ्यांच्या शेतात मजूरी केली. कुटूंबियांनीही त्याला शेती, मजूरी करुन आर्थिक मदत केली. पदवीनंतर पुणे, औरंगाबाद औद्योगिक वसाहतीत विविध कंपन्यात रोजंदारीवर दिवसामजूरी व रात्री आभ्यास केला. पदरी आलेले अपयश पचवत तो मजूरी करुन अभ्यास करत होता. त्याला मैत्री मांदीयाळी संस्थेनेही हातभार लावला. त्याने २०१८ मध्ये ‘एआओ’ (असिस्टंट इंटेलिजन ऑफिसर) परिक्षेत यश मिळवले. २०१८-१९ च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सहाय्यक पोलीस निरीक्षक, एस.टी.आय. व ए.एस.ओ. (सहाय्यक कक्ष अधिकारी मंत्रालय मु़बई) अशा तीन पदाच्या परिक्षेत यश मिळवले.
अद्यापही गावी शेजाऱ्याच्या भीतींचा आधार घेऊन पत्र्याच्या घरात राहणाऱ्या गरीब कुटूंबातील सुपूत्र राज्याच्या मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी पदावर शासकीय सेवेत रूजू होणार आहे. तो अधिकारी म्हणून काम करताना पाहण्याचे स्वप्न उराशी बाळगून राब-राब राबणाऱ्या घरच्यांच्या चेहऱ्यावरील आनंद इतरांना प्रभावित करणारा आहे.
"कुटूंबातील सर्वांनी केलेले कष्टाला मैत्र मांदियाळी संस्थेच्या माध्यमातून मिळालेला मदतीचा हात यामुळे यश मिळविता आले. मी सदैव या सर्वांच्या ऋणात जीवन व्यथीत करीन. शासकीय सेवेत काम करताना सामान्य जनतेच्या हिताला प्राधान्य देण्यात समाधानी राहील." -यशवंत थोरात