#SakalForMaharashtra मान्यवरांच्या प्रतिक्रिया

sakal
sakal

पुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-महिलांच्या उत्थानासाठी समाजातील सेवाभावी व्यक्‍ती व संस्थांनी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागल्यामुळे महाराष्ट्राचे समाजमन अस्वस्थ आहे. केवळ मराठाच नव्हे तर अन्य समाजही विविध मागण्यांसाठी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. खरेतर सगळ्याच समाजाचे प्रश्‍न पोटापाण्याशी संबंधित आहेत. 'सकाळ'च्या आवाहनाची दखल घेऊन काही मान्यवरांनी दिलेल्या प्रतिक्रिया.

'एकत्र येऊया, मार्ग काढूया' हा सकाळने सुरू केलेला उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे. मी अधिकारी म्हणून ज्या खुर्चीवर आहे त्या खुर्चीवरूनही मी समाजासाठी खूप काही करू शकतो आणि मी ते करत आहे. मी इचलकरंजीला नगरपालिका मुख्याधिकारी होतो तेव्हा "सकाळ"च्याच मदतीने आम्ही स्वच्छतेसाठी उपक्रम हाती घेतला होता. आताही सकाळने जे सुरू केले आहे त्यासाठी मी नक्कीच माझे योगदान देईन. युवकांना मार्गदर्शन असेल किंवा स्वच्छतेसंदर्भात करावयाच्या कारवाई असतील यासंदर्भात सकाळने जर एखाद्या कार्यक्रम आयोजित केला तर मी त्या ठिकाणी स्वतःहून सहभाग हेईन. 
- प्रशांत रसाळ, पनवेल महापालिका-अतिरिक्त आयुक्त

शिक्षणासाठी मुलांना तालुक्‍याच्या ठिकाणी ठेवण्याचा खर्चही खेड्यातील पालकांना सोसवत नाही. सरकारने, समाजसेवी संस्थांनी समाजाच्या मुलांसाठी होस्टेल्स काढली, तर मोठी समस्या सुटू शकते. "बार्टी'सारखी एखादी संस्था काढणे, तरुणांना उद्योजकतेसाठी प्रवृत्त करणे, त्यांच्यातील कौशल्यांचा विकास करण्यासाठी मदत करावी. मूलभूत उपाययोजनांवर भर दिल्यास, कौशल्याधिष्ठित उपक्रम राबविल्यास आरक्षण वेगळे मागण्याची गरजही पडणार नाही. 
- डॉ. राम भिसे, नवी मुंबई 

सध्याची शिक्षण पद्धतीही केवळ डिग्री देणारी नको तर व्यवसायिकदृष्ट्या कौशल्यावर आधारित हवी. यासाठी सरकारने प्रयत्न करणे गरजेचे आहे. मी स्वतः दीपक मोरे यांच्या सहकार्याने "वर्किंग प्रोफेशन' वर आधारित लेक्‍चर्स घेत आहे. आर्थिक उन्नती करणाऱ्या शिक्षणाची गरज आहे. आमच्याकडे यासाठी चळवळ सुरु आहे. भविष्यात "सकाळ'सोबत असे उपक्रम घ्यायला आवडेल. या उपक्रमासाठी "सकाळ'ला शुभेच्छा. 
- अभय पाटील, अकोला 

कृषी क्षेत्रातील अनिश्‍चितता, युवकांमध्ये आलेली बेरोजगारी यातून मार्ग काढण्यासाठी सर्वांनी सोबत काम करण्याची आज खरोखरच गरज आहे. शेतीपूरक व्यवसाय सुरु करुन शेतकऱ्यांना, तर उद्योगधंदे सुरु करुन बेरोजगारीतून मार्ग काढता येईल. जिल्हाभरात मी स्वत: व्यवसायाभिमुख शिक्षणासंदर्भात मार्गदर्शन मेळावे घेऊन जनजागृती करु शकतो. दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करता येऊ शकते. जातीवंत दुभत्या म्हशी हरियाणासारख्या भागातून आणण्यासाठी "सकाळ रिलीफ फंडा'कडून काही मदत मिळाली तर मी माझ्या बॅंकेमार्फत काही मदत उपलब्ध करुन दुभती जनावरे वाटू शकतो. 
- विजय मुधोळ, हिंगोली 
 
शालेय, महाविद्यालयीन शिक्षण केवळ पुस्तकबद्ध झाले आहे. त्यामुळे नोकरीसाठी भटकत असताना "प्रॅक्‍टिकल नॉलेज'चा अभाव मुलांमध्ये दिसून येतो. नवा अभ्यासक्रम मूलभूत बदलला पाहिजे. उद्योगांमध्ये "अप्रेंटिसशीप' मिळाली, तर कौशल्यांचा विकास होऊ शकतो. एखाद्या शिक्षणक्रमाचे अमाप पीक येते आणि शिकविण्यासाठी अनुभवी शिक्षकांचा तुटवडा निर्माण होतो. ही कोंडी फोडली पाहिजे. सेवाभावी संस्थांमार्फत मुलांना समाजाभिमुख बनविणारे कार्यक्रम राबवता येतील. 
- डॉ. सत्यवान हनेगावे, नवी मुंबई 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com