#SakalForMaharashtra 'एकत्र येऊया...' उपक्रमात वाचकांचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 28 July 2018

महाराष्ट्र घडविण्याच्या या कामात आपण काय सहभाग देऊ इच्छिता?  
आमच्यापर्यंत पोचवा #SakalForMaharashtra हा हॅशटॅग वापरून.
ई-मेल कराः  webeditor@esakal.com  
Call Center : 9225800800

पुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-महिलांच्या उत्थानासाठी समाजातील सेवाभावी व्यक्‍ती व संस्थांनी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागल्यामुळे महाराष्ट्राचे समाजमन अस्वस्थ आहे. केवळ मराठाच नव्हे तर अन्य समाजही विविध मागण्यांसाठी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. खरेतर सगळ्याच समाजाचे प्रश्‍न पोटापाण्याशी संबंधित आहेत. 'सकाळ'च्या आवाहनाची दखल घेऊन काही मान्यवरांनी दिलेल्या प्रतिक्रिया.

कोकणात शेतीवरच सर्व काही अवलंबून आहे. नव्या पिढीला अत्याधुनिक शेती करण्याची खूप इच्छा आहे, त्यांची तयारीही आहे. यासाठी तालुकानिहाय काम करावे लागणार आहे. "सकाळ'ने सुरु केलेला उपक्रम अतिशय चांगला आहे, टीम वर्क करुनच आपणाला सद्याच्या परिस्थितीतून मार्ग काढता येईल. शेतकरी जगला पाहीजे आणि टिकला पाहीजे. शेतकऱ्यांना इस्त्रायलच्या धर्तीवर मार्गदर्शन मिळाले पाहीजे. तेथील तज्ञ सातत्याने इथे येऊन मार्गदर्शन करु शकणार नाहीत. यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी काही तज्ञांच्या इथे प्रशिक्षीत टीम तयार कराव्या लागतील. यासाठी शेतकरी व तरुणांसाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन मेळाव्यांचे आयोजन करण्याची आम्ही जबाबदारी घेऊ. 
- निलेश माळवी, अलिबाग 

समाजातील तरुणांना नोकरीशिवाय आणखी काय काय करता येईल, याचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे. स्वयंरोजगाराचे अनेक मार्ग आहेत. रिन्यूएबल एनर्जीपासून टुरिझमपर्यंत अनेक गोष्टींमध्ये आजचा तरुण आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतो. मात्र, त्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. "बार्टी'सारखी एखादी संस्था हे काम चांगले करू शकते. 
- विकास सुधाकर, जळगाव 

शाळा, महाविद्यालयातील पुस्तकी अभ्यासाबरोबरच तांत्रिक शिक्षण देणे काळाची गरज बनली आहे. जेणेकरून अभ्यासात मागे राहिलेला मुलगा तंत्रशिक्षणाच्या जोरावर व्यावसायिक बनू शकतो. नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय हा केव्हाही फायदेशीरच आहे. आम्ही चार मित्रांनी मिळून एक सॉफ्टवेअर फर्म चालू केली आहे. त्यातून आता आम्हीच रोजगार देणारे झालो आहोत. 
- महेश पवार, जळगाव 

"एकत्र येऊ या, मार्ग काढू या' हा "सकाळ'चा उपक्रम अतिशय चांगला आहे. त्यातून तरुणांना विधायक कामाची दिशा मिळेलच, शिवाय करिअरचे अनेक नवे मार्ग खुले होण्यास मदत होईल. हाताला काम नसल्यामुळे रस्त्यावर येणारा तरुण रचनात्मक कामांकडे वळण्यातच सर्वांचे भले आहे. 
- तुषार पाटील, नंदुरबार

"स्कील डेव्हलपमेंट'च्या दृष्टीने आज शालेय शिक्षण व्यवस्थेत कोणताही बदल झालेला नाही. शालेय स्तरापासून हा बदल आपणच करायला हवा. चीन, जपानसारख्या राष्ट्रांनी कौशल्य विकासावर मोठा भर दिल्याने त्यांची प्रगती आपल्यासमोर आहे. संवाद कौशल्य असेल तर अनेक गोष्टी सोप्या होतात. संवाद कौशल्याचे धडे आपण सध्या मुलांना देतोच, त्याला व्यापकपणे समाजापुढे अणण्यासाठी आपण योगदान देऊ शकतो. नोकरीरुपी गुलामगिरीकडे जाणाऱ्या मराठा समाजाला आज नेतृत्वाची गरज आहे. 
- शिवश्री प्रवीण चव्हाण 

प्रत्येक जिल्ह्याचे शेतीविषयक वेगवेगळे महत्त्व आहे. धुळे-नंदूरबार जिल्ह्यात पपई, मिरची, कापूस उत्पादन होते. जिथे पिकते तिथेच विकल्या गेल्यास रोजगारनिर्मिती होईल. त्यामुळे जिल्हानिहाय प्रक्रिया लघु उद्योग उभारले पाहिजेत. त्यासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ तेथेच प्रशिक्षित झाले पाहिजे. त्यातून स्थलांतर थांबविण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत. गावातील रोजगार निर्मितीवर भर देत आहोत. "सकाळ'च्या उपक्रमात सहभागी होऊ. 
- कुंदन सुभाष सोनवणे-पाटील, नंदुरबार 

हाताला काम नाही आणि कामाला दाम नाही, अशा विवंचनेत हजारो सुशिक्षीत बेरोजगार तरुण रोजगारासाठी धडपडत आहेत. एकीकडे काम मिळेना दुसरीकडे वाढती महागाई यामुळेही सामान्य माणसाचे जगणे अवघड झाले आहे. सध्या तर सर्वच क्षेत्रात अस्थिरता निर्माण झालेली आहे. त्यामुळे भावी पिढीला योग्य मार्गदर्शन, नोकरी, व्यवसायाविषयी प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. यासाठी "सकाळ'ने उचललेले पाऊल निश्‍चितच अभिनंदनीय आहे. या कामी माझाही हातभार राहील. 
- ज्ञानेश्‍वर गायकवाड, औरंगाबाद 

शेती क्षेत्रात अस्थिरतेचे वातावरण असल्याने शेतकरी उद्योजक बनला पाहिजे, या भूमिकेतून मी प्रतिनिधीत्व करीत असलेल्या बळीराजा शेतकरी संघाच्या माध्यमातून काम करत आहे. कृषी पर्यटनाच्या माध्यमातून शेतीत नवीन संधी निर्माण करीत आहोत. शेतकऱ्यांकडूनच मालावर प्रक्रिया करणे, शेतकऱ्यांमार्फतच त्या मालाची विक्री करणे सुरु आहे. यातून शेतकऱ्यांनाही चार पैसे मिळत आहेत. त्यांच्या मालाला चांगला भाव मिळत आहे आणि शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगारही उपलब्ध होत आहे. "सकाळ'ने सुरु केलेल्या या उपक्रमाच्या माध्यमातूनही गावोगावी अशा प्रकारचे मागदर्शन मेळावे घेतले जाऊ शकतील, यासाठी आपली तयारी आहे, त्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम ठरवावा लागेल. 
- कृष्णा फडतरे, पुरंदर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal For Maharashtra opinion from readers