#SakalForMaharashtra वाचकांच्या प्रतिक्रिया

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 28 July 2018

महाराष्ट्र घडविण्याच्या या कामात आपण काय सहभाग देऊ इच्छिता?  
आमच्यापर्यंत पोचवा #SakalForMaharashtra हा हॅशटॅग वापरून.
ई-मेल कराः  webeditor@esakal.com  
Call Center : 9225800800

तरुणांचा कल उद्योगाकडे आहे. स्किल डेव्हलपमेंटसाठी अनेक कार्यक्रम होतात. पण ते प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या पातळीवर येत नाहीत. मोठ्यांना सगळे मिळते, पण तरुणांना काही मिळत नाही. सौर ऊर्जा केंद्राच्या खूप चांगल्या स्कीम आहेत. पण त्यांची राज्य अंमलबजावणी करत नाही. नाणारला तेलशुद्धीकरण प्रकल्पाऐवजी सोलार प्रकल्प झाला, तर शेतकऱ्यांना जागा न विकता प्रकल्पात भागीदार होऊन वीजेचाही लाभ होईल. 
- मिथिलेश देसाई, रत्नागिरी 

कोकणात तरुण मोठ्या संख्येने शिकलेले आहेत. पण रोजगाराची संधी नाही. एमआयडीसी रिफायनरीसारखे प्रकल्प आणण्यापेक्षा स्थानिकांना प्रत्यक्ष रोजगार देणारे उद्योग आहेत. शासन रोपे पुरविते, पण पाणी देत नाही. सौरपंप देत नाही. तरुणवर्ग रस्त्यावर का येतोय, हे समजून घेतले पाहिजे. इथला तरुण शिकलेला आणि शांतताप्रिय आहे. प्रदूषण होणार नाहीत, असे प्रकल्प कोकणात आणा. मोठे मराठा उद्योजक आणि तरुण यांच्यात समन्वय झाला पाहिजे. स्मार्ट व्हिलेज झाले, तर मुलांना नोकरीसाठी कुणाकडे जावे लागणार नाही. 
- हरिश्‍चंद्र देसाई, रत्नागिरी 

मराठवाड्यातील सततचा दुष्काळ आणि शेती क्षेत्रात निर्माण झालेली प्रतिकूल परिस्थिती यामुळे ग्रामीण भागातील समाज व तरुण अधिकच अस्वस्थ झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर "सकाळ'ने घेतलेला पुढाकार सकारात्मक बदल घडविणारा आहे. यासाठी सर्वप्रथम "सकाळ'चे अभिनंदन. दुष्काळ निवारण, ग्रामीण भागातील बेरोजगार युवक-युवतींसाठी शेती व शेतीपूरक व्यवसायासाठीची कौशल्यविषयक प्रशिक्षण शिबिरे, रोजगार, स्वंयरोजगार व शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी ग्रामविकास संस्था योगदान देण्यास तयार आहेत. 
- नरहरी शिवपुरे, ग्रामविकास संस्था, औरंगाबाद 

युवकांच्या हाताला काम नाही, रोजगाराच्या संधी कमी झाल्या आहेत. यामुळे त्यांच्या हाताला काम देण्याची गरज आहे. तरुणांना कौशल्यविषयक प्रशिक्षण देणे, उद्योग व्यवसायासाठी आर्थिक मदत कुठे मिळू शकते याविषयी त्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. समाजातील तरुणांची उद्योजकतेची मानसिकता तयार करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी शेतीपूरक व्यवसायांची जोड द्यावी लागणार आहे. शासनाच्या खूप योजना असल्या तरी त्याचा लाभ माहितीअभावी खऱ्या गरजूंना मिळत नाही. योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोचला पाहिजे, यासाठी आपल्या भागात मागदर्शन केंद्रे सुरु करता येतील. 
- स्वप्नील म्हात्रे, पेण 
 
कौशल्य विकासाचे रोजागारात रुपांतर गरजेचे आहे. इंडस्ट्रीची गरज आणि भविष्यात निर्माण होणाऱ्या नोकऱ्या यांचा समन्वय साधणे गरजेचे आहे. प्रतापराव पवार यांच्या मार्गदर्शनात "कमवा व शिका' योजनेतून 25 हजार तरुण हे 250 संस्थांमध्ये प्रशिक्षणासोबत नोकरीही करीत आहेत. यशस्वी संस्थाही तरुणांना शिक्षण व ऑन द जॉब ट्रेनिंग देण्याचे काम करत आहे. याचा सर्व खर्च संस्था करीत आहे. अशाच "सकाळ'च्या या उपक्रमात आमचाही सहभाग असेल. 
- विश्‍वेश कुलकर्णी, अध्यक्ष- यशस्वी संस्था, पुणे 

रोजगार नसणे, हे समस्येचे मूळ आहे. हाताला काम असेल, तर तरुणांना वेगळ्या मार्गांचा अवलंब करण्याचे कारण उरणार नाही. दहावी, बारावीनंतर शिक्षणक्रमांना प्रवेश मिळणेच जिकिरीचे होऊन बसले आहे. त्यासाठी शुल्कामध्ये सवलत दिली पाहिजे. कौशल्यविकासाचे कार्यक्रम महाविद्यालये आणि बारावीनंतर राबवले जावेत. त्यातून बाहेर पडणाऱ्या तरुणाला उद्योग उभा करण्यासाठी आवश्‍यक कर्जपुरवठाही झाला पाहिजे. 
- विवेक कुराडे, सातारा 

तरुणांच्या हाताला काम मिळेपर्यंत अस्वस्थता कायम राहणार आहे. यासाठी युवकांना कौशल्याधारित शिक्षणाची गरज आहे. जसे सौर ऊर्जा आणि एलईडी दिवे हा माझा व्यवसाय आहे. मी अडीचशे व्यक्तींना एकत्र करुन त्यांना उभे करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यांच्याकडे परतफेडीसाठी तारण ठेवण्यास काही नसते, त्यामुळे बॅंका कर्ज देत नाहीत. अशा वेळी आमच्याकडे कर्ज परतावा करण्याची क्षमता असते, त्यामुळे व्यवसाय करु इच्छिणाऱ्यांना शासनाच्या विविध योजनांतून बॅंकाचे कर्ज मिळवून देणे, त्यांना व्यवसायात उर्जितावस्था येईपर्यंत त्यांच्या मागे ठाम उभा राहणार आहे. "सकाळ'ने चांगली सुरवात केली आमचे त्यास सहकार्य असेल. 
- संदीप पोळ, सातारा 

"सकाळ'ने आतापर्यंत जलयुक्त शिवार आणि त्यासारख्या योजनांमध्ये केलेले काम स्तुत्य आहेच. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला शासनाने भरघोस निधी दिला पाहिजे, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत केली होती. अल्पशिक्षितांना स्वयंरोजगारासाठी विनातारण कर्ज दिले पाहिजे. व्याजदर कमी असावा. कर्जाची परतफेडही 100 टक्के झाली पाहिजे. यासाठी दबावगट निर्माण करून शासनाकडे पाठपुरावा केला पाहिजे. 
-विलास लोकरे, सोलापूर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal For Maharashtra readers opinion