चारा पिकांवर आला नाकतोडा! पण ही टोळधाड नव्हे बरं....

सुषेन जाधव
सोमवार, 13 जुलै 2020

औरंगाबाद तालुक्यातील आडगाव (बु.) परिसरात चारा पिकांवर सध्या नाकतोड्याचे संकट आले असल्याने ही टोळधाड तर नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये भिती पसरली आहे. 

औरंगाबाद: तालुक्यातील आडगाव (बु.) परिसरात चारा पिकांवर सध्या नाकतोड्याचे संकट आले असल्याने ही टोळधाड तर नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये भिती पसरली आहे.

हेही वाचा- सोयाबीन उगवलेच नाही, तक्रारी ४९ हजार अन् गुन्हे केवळ ४६! खंडपीठात झाली सुनावणी

ही परिस्थिती लक्षात येताच शेतकऱ्यांनी कळविल्यानंतर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत (परभणी) कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. किशोर झाडे यांनी धाव घेतली. त्यानंतर ही टोळधाड नसून नाकतोडे असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिले. तसेच यावर शेतकऱ्यांना काही उपाययोजनाही सुचविण्यात आल्या आहेत. 

हेही वाचाउस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांना औरंगाबाद खंडपीठाची अवमान नोटीस, पण कशामुळे?  

आडगाव हे दुग्धोत्पादनासाठी परिचित गाव आहे. त्यामुळे या गाव परिसरात मका, ज्वारी चारा पीकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. पाहणी केल्यानंतर शास्त्रज्ञ डॉ. झाडे यांनी सांगितले की, ही टोळधाड असल्याची शेतकऱ्यांत चर्चा होती, मात्र प्रत्यक्ष पाहणी केली असता नाकतोड्याची (Grasshopper nymphs) पिल्ले अवस्था असल्याचे स्पष्ट झाले.

नाकतोडा या किडीने मका, ज्वारी या चारा पिकांची कोवळी पाने मोठ्या प्रमाणात खाल्ली असून नाकतोड्याचे प्रमाणही जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. पाहणी करणाऱ्या चमूत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, जिल्हा कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार, कृषी सहायक बी. पी. गुरव, सरपंच, शेतकरी उपस्थित होते. 

हेही वाचा- आमदार कुचे यांच्यासह भाऊ, युवतीविरोधात गुन्हा दाखल, युवतीकरवी भाच्यालाच पाठविले अश्लिल संदेश 

असे करा व्यवस्थापन 
डॉ. झाडे यांनी सांगितले की, नाकतोड्याच्या नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफॅास २० ई.सी. २४ मिली किंवा क्लोरोपायरीफॅास ५०ई.सी. १० मिली, डेल्टामेथ्रीन २.८ ई.सी. १० मिली प्रती १० लिटर पाण्यात टाकून बाधित ठिकाणी फवारणी घ्यावी. महत्त्वाचे म्हणजे फवारणीनंतर जवळपास ४ ते ५ आठवडे जनावरांना तो चारा खाऊ घालू नये,

त्याऐवजी चारा पिकावरती जैविक मेटारायझिएम ५० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करता येईल. सामूदायिकरित्या गाव परिसरात बांधांवर किटकनाशकाची फवारणी केल्यास धोका टळेल. या किडीचा २०१९ मध्ये भूम तालूक्यात (जि. उस्मानाबाद) तसेच २०१८ मध्ये सिल्लोड तालुक्यात प्रादूर्भाव झाल्याचेही डॉ. झाडे यांनी नमूद केले. 

पांदण, पडीक जमीन, ओढ्याला लागून असलेल्या जमिनी, मशागती न झालेल्या ठिकाणी याचा प्रादूर्भाव होतो. ही कीड अशा ठिकाणी अंडी घालतात, बाल्‍यावस्थेत समूहात राहतात, त्यानंतर मोठे झाले की परत विखुरतात अर्थात त्याचा पिकांवर प्रादूर्भाव होतो. 
-डॉ. किशोर झाडे, शास्त्रज्ञ. 

हेही वाचा: व्याज कापल्याशिवाय बॅंका देईनात पीककर्ज, खरीपात कशी करु पेरणी म्हणत शेतकरी थेट खंडपीठात


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Grasshopper Nymphs Attack On Fodder Crops Aurangabad News