आमदार कुचे यांच्यासह भाऊ, युवतीविरोधात गुन्हा दाखल, युवतीकरवी भाच्यालाच पाठविले अश्लिल संदेश

सुषेन जाधव
Wednesday, 8 July 2020

जुन्या कौटुंबिक वादाचा आकस बाळगत एका युवतीला हाताशी धरून भाच्याला अश्‍लील संदेश पाठवत त्रास दिल्याप्रकरणात पीडित भाच्याने चंदनझिरा (जि. जालना) पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र, पोलिसांनी दखल न घेतल्याने भाच्याने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली.

औरंगाबाद: जुन्या कौटुंबिक वादाचा आकस बाळगत एका युवतीला हाताशी धरून भाच्याला अश्‍लील संदेश पाठवत त्रास दिल्याप्रकरणात पीडित भाच्याने चंदनझिरा (जि. जालना) पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र, पोलिसांनी दखल न घेतल्याने भाच्याने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली.

हेही वाचा- जेव्हा वकीलच होतो आरोपी....अन् न्यायाधीशांसमोर...

सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे व न्यायमूर्ती श्रीकांत डी. कुलकर्णी यांच्या खंडपीठाने संबंधित भाचा दीपक डोंगरे यांच्या दोन मार्च रोजीच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करून घेण्याचे आदेश पोलिसांना दिले. त्यानुसार मंगळवारी (ता.सात) बदनापूरचे आमदार नारायण कुचे, त्यांचा भाऊ देविदास कुचे आणि अश्‍लील संदेश पाठविणाऱ्या संबंधित युवतीविरोधात चंदनझिरा (जि. जालना) पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. 

काय आहे मूळ प्रकरण 
डोंगरे हे व्यवसायानिमित्त सख्खे मामा आमदार नारायण कुचे यांच्याकडे वास्तव्यास होते. तक्रारीत नमूद केल्यानुसार डोंगरेंनी कुचे यांना ४० लाख रुपये निवडणुकीसाठी दिल्याचे म्हटले आहे. दरम्यान, कुचे परिवाराने त्यांच्या मुलीशी डोंगरे यांचा विवाह लावून देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. तो डोंगरेंसह त्यांच्या नातेवाइकांना मान्य होता. यातून कुचे परिवारातील मुलीशी डोंगरे यांचे प्रेम जुळले.

क्लिक करा- ...अन्यथा विभागीय कृषी सहसंचालकांना अटक करुन उच्च न्यायालय खंडपीठात हजर करा  

डोंगरेंनी पैशांच्या मागणीसंदर्भात संपर्क केला असता, आमदार नारायण कुचे यांना प्रेमप्रकरणाविषयी समजले. दरम्यान, कुचे यांचा राग अनावर होऊन त्यांनी कंत्राटाचे प्रमाणपत्र रद्द करून काळ्या यादीत टाकतो, काटा काढतो अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच आमदार कुचे यांच्यासह त्यांचे बंधू देविदास कुचे यांनी आपणाविरोधात षडयंत्र रचून एका युवतीस आपणास अश्‍लील संदेश पाठविण्यास सांगत जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचेही नमूद केले आहे. 

खंडपीठाच्या आदेशानुसार गुन्हा 
दोन मार्च २०२० रोजी दीपक डोंगरे यांनी चंदनझिरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. प्रकरणात पोलिसांनी पाच मार्च रोजी डोंगरेंना अश्‍लील संदेश पाठविणाऱ्या संबंधित युवतीला चौकशीसाठी बोलावत जबाब नोंदविला. पाच मार्च रोजी युवतीने दिलेल्या जबाबानुसार देविदास कुचे यांच्या सांगण्यावरून आपण डोंगरे यांना प्रेमाचे संदेश पाठविल्याचे सांगितले.

हेही वाचा- कोरोनाचे सर्वच रेकॉर्ड जपून ठेवा, खंडपीठ करणार पाहणी  

यानंतर पोलिसांनी या तक्रारीची दखल घेतली नाही. या नाराजीने डोंगरे यांनी ॲड.रवींद्र गोरे यांच्यातर्फे खंडपीठात धाव घेतली. सुनावणीदरम्यान युवतीचा सदर जबाब याचिकाकर्त्यातर्फे खंडपीठाच्या निदर्शनास आणून देण्यात आला.

सुनावणीअंती डोंगरे यांनी दोन मार्च रोजी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. खंडपीठाच्या आदेशानुसार आमदार नारायण कुचे, त्यांचे बंधू देविदास कुचे व संबंधित युवतीविरोधात चंदनझिरा पोलिसात भादंवि कलम २९४, ५०७, ३४ आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. रवींद्र गोरे यांनी काम पाहिले. ॲड. गोरे यांना ॲड. चंद्रकांत बोडखे यांनी साहाय्य केले. 

हेही वाचा- अंगणात लावले चंदनाचे झाड, २२ वर्षाचे झाल्यावर पोलिसांना लागले काम

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: FIR Registered Against MLA Narayan Kuche & His Brother After Order of Aurangabad HighCourt