Ganesh Festival : पाकिस्तानात गणरायाला वंदन

आदित्य वाघमारे
Sunday, 16 September 2018

औरंगाबाद - इस्लामी राष्ट्र अशी ओळख असलेल्या पाकिस्तानात मराठी आणि अमराठी हिंदू समाजबांधवांनी गणरायाला वंदन करण्याची परंपरा फाळणीपूर्व काळापासून अखंड सुरू ठेवली आहे. एकट्या कराची शहरात बसणाऱ्या दीड दिवसाच्या गणरायाला सुमारे तीस मंडळांनी शुक्रवारी (ता. १४) वाजत-गाजत निरोप दिला. 

औरंगाबाद - इस्लामी राष्ट्र अशी ओळख असलेल्या पाकिस्तानात मराठी आणि अमराठी हिंदू समाजबांधवांनी गणरायाला वंदन करण्याची परंपरा फाळणीपूर्व काळापासून अखंड सुरू ठेवली आहे. एकट्या कराची शहरात बसणाऱ्या दीड दिवसाच्या गणरायाला सुमारे तीस मंडळांनी शुक्रवारी (ता. १४) वाजत-गाजत निरोप दिला. 

पाकिस्तान शब्द ऐकताच तप्त सीमारेषा आणि गोळीबार आपल्यापुढे उभा राहतो; पण फाळणीपूर्वी कराची शहराने स्वीकारलेला सार्वजनिक गणेशोत्सव आजही आनंदाने साजरा केला जातो. तेथील सार्वजनिक गणेश मंडळे वाढत असल्याचे नागरिक सांगतात. उल्हासनगरशी संबंधित असलेल्या नाईक परिवाराचे राजेश नाईक आजही येथील मंडळांसाठी लागणाऱ्या चिकण मातीच्या गणेशमूर्ती तयार करतात. यंदाही कराचीत दीड दिवसाचा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा झाला, विसर्जन शुक्रवारी झाले. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या जयघोषात गणरायाला निरोप देण्यात आला. 

मराठी-अमराठींचा समान उत्साह
श्रावणापासूनच गणरायाच्या आगमनाची चाहूल कराचीत लागते. बोहरी कंपाउंड परिसरापासून सुरू झालेला गणेशोत्सव आज दिल्ली कॉलनी, कलिफ्टन, जीना मद्रासी कॉलनी, रफी या अमराठी वसाहतींत साजरा होतो, अशी माहिती कराचीतील नागरिक विशाल राजपूत यांनी ‘सकाळ’ला दिली. बस, लहान वाहने घेऊन नागरिक विसर्जनासाठी गणरायाला घेऊन जातात, असेही त्यांनी सांगितले. 

राणा लियाकत अली आणि गणेशोत्सव
पाकिस्तानात एकेकाळी दिग्गज राजकारणी म्हणून परिचित असलेले राणा लियाकत अली आणि लियाकत अली खान यांनी कराचीत गणेश मंडळाला भेट दिली होती. पाकिस्तानी सरकार या सणाला सुरक्षा पुरवते, असेही श्री. राजपूत म्हणाले. 

कराचीतील मंडळे 
गणेश मठ मंदिर, सोल्जर बाजार, बोहरी कंपाउंड, कलिफ्टन, सिंध येथील नारायण जगन्नाथ विद्यालय, रत्नेश्वर महादेव मंदिर, दिल्ली कॉलनी, जीना मद्रासी कॉलनी, स्वामीनारायण गणेश मंडळ, यंग हिंदू-मद्रासी गणेश सेवा मंडळ आदी.

मूर्तींचा प्रवास दुबईमार्गे
भारतात तयार केलेल्या गणेशमूर्ती कराची आणि अन्य शहरांत विराजमान होतात. मंडळांमध्ये आरास करण्याची स्पर्धा लागते. भजने गायली जातात आणि त्यातूनच भावी पिढीला हा वारसा दिला जात असल्याचे विशाल राजपूत म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Festival Ganeshotsav Pakistan