Maratha Kranti Morcha : औरंगाबादेतील औद्योगिक क्षेत्रात तीनशे कोटींचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 August 2018

औरंगाबाद - वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा आणि औरंगाबाद या औद्योगिक वसाहतींमध्ये उद्योगांनी बंद पाळत मराठा बांधवांच्या आंदोलनाला सहकार्य केले. उत्पादन बंद असल्याने औरंगाबादेतील औद्योगिक क्षेत्राला सुमारे तीनशे कोटींचे नुकसान सहन करावे लागले. 

औरंगाबाद - वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा आणि औरंगाबाद या औद्योगिक वसाहतींमध्ये उद्योगांनी बंद पाळत मराठा बांधवांच्या आंदोलनाला सहकार्य केले. उत्पादन बंद असल्याने औरंगाबादेतील औद्योगिक क्षेत्राला सुमारे तीनशे कोटींचे नुकसान सहन करावे लागले. 

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या बंदला औरंगाबादेतील उद्योगांनी चांगला प्रतिसाद दिला. पहिल्या शिफ्टसाठी गेलेल्या बजाज ऑटो कंपन्यांच्या बसला आंदोलकांनी कंपनीच्या प्रवेद्वारापाशीच अडवले आणि माघारी जाण्याची विनंती केली. त्यानंतर वाहने माघारी फिरली. वाळूज औद्योगिक क्षेत्रातील सगळ्याच चौकांमध्ये यानंतर आंदोलक गेल्यानंतर दळणवळण ठप्प  झाले. त्यानंतर ज्यांनी उद्योग सुरू ठेवण्याचा बेत आखला होता तो फसला आणि तासाभरासाठी सुरू झालेले उद्योग लगेचच बंद झाले. उद्योजक आणि कामगारांना माघारी जाण्यासाठी वाटच शिल्ल्क राहिली नसल्याने अनेकांना शरणापूर, सिडको महानगर परिसरातून औरंगाबादकडे वाट करावी लागली. 

उत्पादन सुरू; उद्योगांत गोंधळ  
ऑडिट आणि किरकोळ उत्पादने घेणाऱ्या उद्योगांमध्ये मात्र आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत अवघ्या तासाभरात हे उद्योग बंद पाडले. अनेक कंपन्यांमध्ये उत्पादन सुरू असल्याचे आंदोलकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी या उद्योगांच्या सेक्‍युरिटी केबिनला विचारणा करत आत प्रशासकीय विभागाकडे मोर्चा वळवला. तेथे लोक असल्याचे लक्षात आल्यावर एका बहुराष्ट्रीय कंपनीला बंद करण्याचे आंदोलकांनी सांगितल्यावर त्वरित काम थांबवण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Kranti Morcha 300 crores of losses in the industrial area of Aurangabad