#MarathaKrantiMorcha मराठा आंदोलकांनी ओढले अंगावर चाबकाचे फटकारे

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 July 2018

औरंगाबाद - मराठा आरक्षणाबाबत सरकार कोणतीच ठोस भूमिका घेत नसल्याने आंदोलकांनी अंगावर चाबकाचे फटकारे ओढून निषेध नोंदविला. क्रांती चौकातील ठिय्या आंदोलनात रविवारी (ता. २९) आंदोलक आक्रमक झाले होते. समन्वयक म्हणून कमी पडल्याची भावनाही त्यांनी व्यक्‍त केली.

औरंगाबाद - मराठा आरक्षणाबाबत सरकार कोणतीच ठोस भूमिका घेत नसल्याने आंदोलकांनी अंगावर चाबकाचे फटकारे ओढून निषेध नोंदविला. क्रांती चौकातील ठिय्या आंदोलनात रविवारी (ता. २९) आंदोलक आक्रमक झाले होते. समन्वयक म्हणून कमी पडल्याची भावनाही त्यांनी व्यक्‍त केली.

मराठा आरक्षण मिळावे, या मागणीसाठी गेल्या नऊ दिवसांपासून क्रांती चौकात ठिय्या आंदोलन आणि उपोषण सुरू आहे. मागणी लावून धरण्यासाठी वेगवेगळ्या स्वरूपाची आंदोलने हाती घेतली जात आहेत. मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी रविवारी दुपारी बाराच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर पोतराजाच्या वेशात येऊन आंदोलन केले. या वेळी रणरणत्या उन्हात अंगावर चाबकाचे फटकारेही ओढले. यात महिला, तरुणांनी आंदोलनात सहभाग घेतला. हलगीच्या तालावर आंदोलकांनीच पोतराजाची भूमिका निभावली.

आंदोलन झाल्यानंतर पोतराजाची भूमिका साकारलेल्या समन्वयकांनी सांगितले, की ‘‘मराठा आरक्षणासाठी दोन वर्षांत शांततेत मोर्चे काढले. राज्य मागासवर्ग आयोगाला पुरावे गोळा करून दिले. तरीही सरकार दखल घेत नाही. समन्वयक म्हणून कमी पडलो की काय? अशी भावना मनात आल्याने हे आंदोलन हाती घेतले आहे.’’

चर्चेसाठी गेलेल्यांवर बहिष्कार
मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेला कोणी जाणार नाही असे ठरले होते; मात्र तरीही रविवारी (ता. २९) मुंबईत होत असलेल्या चर्चेला औरंगाबादेतून तीन समन्वयक गेले असल्याची चर्चा आहे. चर्चेला गेले असल्याचे सिद्ध झाल्यास मराठा क्रांती मोर्चा त्यांच्यावर बहिष्कार घालेल, असे ठिय्या आंदोलनस्थळी असलेल्या उपस्थित तरुणांनी जाहीर केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #MarathaKrantiMorcha maratha reservation agitation