#MarathaKrantiMorcha नांदेड, परभणी धगधगतेच

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 July 2018

नांदेड, औरंगाबाद - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठवाडा अजूनही धगधगता असून, शनिवारीही (ता. २८) ठिकठिकाणी वेगवेगळी आंदोलने झाली. परभणी जिल्ह्यात जमावाच्या हल्ल्यात आठ पोलिस जखमी झाले, तर नांदेड जिल्ह्यात बस पेटवून देण्यात आली. अन्य जिल्ह्यांत रास्ता रोको, पाण्यात उतरण्यासह ठिय्या आंदोलने झाली.

नांदेड, औरंगाबाद - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठवाडा अजूनही धगधगता असून, शनिवारीही (ता. २८) ठिकठिकाणी वेगवेगळी आंदोलने झाली. परभणी जिल्ह्यात जमावाच्या हल्ल्यात आठ पोलिस जखमी झाले, तर नांदेड जिल्ह्यात बस पेटवून देण्यात आली. अन्य जिल्ह्यांत रास्ता रोको, पाण्यात उतरण्यासह ठिय्या आंदोलने झाली.

पोलिसांच्या वाहनावर हल्ला
परभणी ः चक्काजामदरम्यान धर्मापुरी (ता. परभणी) येथील रस्ता मोकळा करून पुढे जाणाऱ्या ग्रामीण पोलिसांचे वाहन टाकळी कुंभकर्ण (ता. परभणी) येथे मोठ्या जमावाने अडविले. पोलिसांना खाली उतरण्यास भाग पाडण्यात आले. त्यानंतर जमावाने लाठ्या-काठ्या व दगडांचा वापर करून पोलिसांवर हल्ला केला. त्यात पोलिस निरीक्षक नरेंद्र पाडाळकर यांच्यासह फौजदार उदय सावंत, पोलिस कर्मचारी जनार्दन चाटे, राजकुमार बचाटे, ज्ञानेश्वर निंबाळकर, साईनाथ मिठेवाड, सुरेश सुरनर, योगेश सानप हे गंभीर जखमी झाले. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी योगेश सानप व जनार्दन चाटे यांना अधिकच मार बसला आहे. 

बस अडवून पेटवली
नांदेडहून देगलूरकडे निघालेली एसटी बस (एमएच- २०, बीएल- २१७८) नांदेड-हैदराबाद महामार्गावरील येळी (ता. लोहा) फाट्याजवळ आज दुपारी एकच्या सुमारास २५ ते २५ जणांनी दगडफेक करीत अडविली. प्रवाशांना खाली उतरविले. त्यानंतर जमावाने बसमध्ये रॉकेल ओतून ती पेटवून दिली आणि घोषणा देत संबंधित वेगवेगळ्या दुचाकींवरून पसार झाले.

घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी धाव घेत महामार्गावर बंदोबस्त वाढविला. या घटनेमुळे बसमधील सुमारे ३० प्रवासी बिथरले. बस पेटविणाऱ्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आत्महत्येचा प्रयत्न
आरक्षणप्रश्‍नी पिंपळगाव (ता. अर्धापूर) येथील एका ज्येष्ठ नागरिकाने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. प्रल्हाद कल्याणकर असे त्यांचे नाव असून, त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून पत्रही लिहिले आहे.

अन्य जिल्ह्यांत आंदोलने
हिंगोली, उस्मानाबाद जिल्ह्यांत काही ठिकाणी रास्ता रोको झाले. परळीत ठिय्या आंदोलन अकराव्या दिवशीही सुरू असून लातूरला अडत बाजार बंद होता.  औरंगाबाद शहरातील हनुमाननगरात पाण्याच्या टाकीवर चढून आठ तरुणांनी आंदोलन सुरू केले असून, क्रांती चौकातील ठिय्याला मुस्लिम अवामी समितीने पाठिंबा दिला. जालन्यात काही ठिकाणी मुंडण आंदोलन झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #MarathaKrantiMorcha maratha reservation agitation bus fire