महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यात तगडा बंदोबस्त

गणेश पांडे 
Wednesday, 8 August 2018

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलक व पोलिस यंत्रणा यांच्यात समन्वयाचे दृष्टीने जिल्हा पोलिस दलाने पूर्व तयारी म्हणून पोलिस ठाणे, बीट, उपविभाग व अधिक्षक कार्यालयस्तरावर सदर मागणी संबंधीत नागरीक, स्थानिक नेते, कार्यकर्ते, समर्थक यांच्या विविध स्तरावर बैठका घेण्यात आल्या.

परभणी - मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी (ता. 9) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुववस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हा पोलिसांच्यावतीने सर्वत्र तगडा बंदोबस्त ठेवला आहे. बंद दरम्यान कोणही कायदा हातात घेऊ नये असे आवाहन पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी केले आहे.

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलक व पोलिस यंत्रणा यांच्यात समन्वयाचे दृष्टीने जिल्हा पोलिस दलाने पूर्व तयारी म्हणून पोलिस ठाणे, बीट, उपविभाग व अधिक्षक कार्यालयस्तरावर सदर मागणी संबंधीत नागरीक, स्थानिक नेते, कार्यकर्ते, समर्थक यांच्या विविध स्तरावर बैठका घेण्यात आल्या. त्यात आंदोलनाची दिशा, पोलिसांचे सहकार्य व समन्वय तसेच आंदोलन विधायक रितीने करण्याबाबत चर्चा झाली. शासकीय मालमत्ताचे नुकसान न करता सनदशिर मार्गाने आंदोलन करण्यावर भर देण्यात आला. त्यावेळी आंदोलकांची सुरक्षा व काही अनुचित घटना घडल्यास पूर्व तयारी म्हणून विविध पोलिस ठाणातंर्गत पोलिस बंदोबस्त व साहित्याच्या वापराची रंगीत तालीम वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. ठाणे स्तरावर पोलिस बंदोबस्त मनुष्यबळ व वाहनांसह रुट मार्च घेण्यात आला.

बंद दरम्यान सहा उपविभागीय पोलिस अधिकारी, 14 पोलिस निरीक्षक, 66 सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक, 944 पोलिस कर्मचारी, 11 स्ट्रॉयकींग फोर्स, 2 आरसीपी प्लॉटून, 2 क्विक रिसन्पॉन्स टीम, 450 होमगार्ड, 40 साध्या वेशातील पोलिस, 2 सशस्त्र पोलिस फोर्स देण्यात आला आहे.

संवेदनशिल ठिकाणी विशेष बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून अफवा पसरविणे हा कायद्याने गुन्हा आहे. यावर सायबर पोलिसांची करडी नजर आहे. सर्व नागरीकांनी व आंदोलनकर्त्यांनी जिल्हा पोलिस दलास सहकार्य करावे. कोणही कायदा हातात घेऊ नये.
- कृष्णकांत उपाध्याय, पोलिस अधिक्षक, परभणी

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MarathaKrantiMorcha There Are Strong Settlement In Parbhani