Martha Kranti Morcha: बंदमुळे मराठवाड्यातील व्यवहार पूर्णपणे बंद

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 August 2018

शेखलाल शेख, राजेभाऊ मोगल
औरंगाबाद - मराठा क्रांती मोर्चातर्फे क्रांतिदिनी पुकारलेल्या बंदला मराठवाड्यात मोठा प्रतिसाद मिळाला. आठही जिल्ह्यांत कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. चौकाचौकात, विविध रस्त्यांवर आंदोलकांनी ठिय्या देत रास्ता रोको केला. हातातील भगवे झेंडे फडकावत त्यांनी दिलेल्या घोषणा लक्ष वेधत होत्या. आंदोलनात महिलांची संख्या लक्षणीय होती.

शेखलाल शेख, राजेभाऊ मोगल
औरंगाबाद - मराठा क्रांती मोर्चातर्फे क्रांतिदिनी पुकारलेल्या बंदला मराठवाड्यात मोठा प्रतिसाद मिळाला. आठही जिल्ह्यांत कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. चौकाचौकात, विविध रस्त्यांवर आंदोलकांनी ठिय्या देत रास्ता रोको केला. हातातील भगवे झेंडे फडकावत त्यांनी दिलेल्या घोषणा लक्ष वेधत होत्या. आंदोलनात महिलांची संख्या लक्षणीय होती.

मराठा आंदोलकांनी आज सकाळपासून चक्का जाम करून आंदोलन सुरू केले. शहरासह ग्रामीण भागातील सर्वच ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. अनेक ठिकाणी रस्त्यांवर टायर पेटवून घोषणाबाजी करण्यात आली. मराठवाड्यातील बाजारपेठा, शाळा, महाविद्यालये, वाहतूक सेवा पूर्णपणे ठप्प असल्याने रस्त्यांवर शुकशुकाट होता.

गुरुवारी सकाळपासूनच बंदचा मराठवाड्यात मोठा परिमाण जाणवला. बाजारपेठांसह सर्वच व्यवहार ठप्प झाल्याने कडकडीत बंद पाळला गेला. आंदोलक ठिकठिकाणी रस्त्यावर फिरून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आहेत. काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. शहरात शंभर टक्के बंद आहे. पोलिसांनी शहरात तगडा पोलिस बंदोबस्त लावला आहे. जालना जिल्ह्यातही ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलन झाले. शहरात व्यवहार पूर्णपणे बंद आहेत. जालना शहरातील अंबड चौफुली, औरंगाबाद चौफुली, मंठा चौफुली, नव्हा चौक, राजुर चौफुली, कन्हैयानगर, गोलपांगरी यासह भोकरदन, परतूर, अंबड, घनसवांगी, बदनापूर, जाफराबाद, मंठा तालुक्‍यात ठिकठिकाणी दुपारी बारापर्यंत आंदोलन सुरू होते. लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत कडकडीत बंद आहे. तेथे पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.

अत्यावश्‍यक सेवांवरही परिणाम
औरंगाबादेत बंददरम्यान बहुतांश दवाखाने, पेट्रोल पंप बंद होते. त्यामुळे अत्यावश्‍यक सेवेवर परिणाम झाला. क्रांतिदिनापासून मोर्चाला सुरवात झाल्यामुळे या दिनाचे विशेष महत्त्व आहे. शासनाकडून मागील पंधरा दिवसांत आंदोलन थांबविण्याचे जोरदार प्रयत्न झाले; मात्र त्याला यश आले नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Martha Kranti Morcha maratha reservation agitation #MaharashtraBandh