
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची चिकलठाणा एमआयडीसीतील कलाग्राम समोरच्या मराठवाडा रिएल्टर्स प्रा. लि. येथे गुरुवारी (ता.तीन) सकाळी आठला मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची चिकलठाणा एमआयडीसीतील कलाग्राम समोरच्या मराठवाडा रिएल्टर्स प्रा. लि. येथे गुरुवारी (ता.तीन) सकाळी आठला मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. ५६ टेबलांवर मतमोजणीच्या पाच फेऱ्या होतील. सुरवातीला सर्व पेट्यांतील मतपत्रिका एका दहा बाय दहाच्या मिक्सिंग ड्रममध्ये टाकल्या जातील. त्यानंतर दोन सभागृहांमध्ये प्रत्येकी २८ टेबलवर २५ मतपत्रिकांचा एक गठ्ठा याप्रमाणे मोजणी केली जाईल. मतमोजणीसाठी औरंगाबाद विभागातील सर्व जिल्हाधिकारी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून येथे दाखल झाले आहेत.
पोस्टल बॅलेटसाठी दोन टेबल
पोस्टल बॅलेट मतमोजणी टेबल क्रमांक - एकसाठी जालन्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांची तर टेबल क्रमांक दोनसाठी औरंगाबादचे अपर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांची नियुक्ती आहे. मोजणी पर्यवेक्षक म्हणून ५६ अधिकाऱ्यांची तर राखीव मोजणी पर्यवेक्षक म्हणून २४ अधिकारी नियुक्त आहेत. मोजणी सहायक म्हणून १६८ तर राखीव मोजणी सहायक म्हणून २२ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना मदतीसाठी ११ अधिकारी, कर्मचारी नियुक्त आहेत.
असा ठरेल कोटा
वैध मतांची बेरीज करून पहिल्या पसंतीच्या मतानुसार विजयी होण्यासाठी कोटा ठरेल. वैध मतांच्या संख्येला दोनने भागून त्यात एक अधिक केल्यानंतर जी संख्या येईल, ती संख्या विजयासाठी कोटा म्हणून निश्चित करण्यात येईल.
संपादन - गणेश पिटेकर