मोबाईल फोन क्षेत्रातील उलाढाल ठप्प

प्रकाश बनकर
सोमवार, 1 जून 2020

शहरात मोबाईल स्टोअर, रिपेरिंग व आक्सेसरीज विक्रेत्यांची संख्या जवळपास एक हजारांच्या घरात आहे. ठाणबंदी झाल्यापासून त्यांचे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यांच्याकडे कार्यरत असलेले कामगार घरी परतले आहेत

औरंगाबाद : लॉकडाउनलोडमुळे दोन महिन्यांपासून मोबाईल फोन विक्रेते, रिपेरिंग व आक्सेसरीज विकणाऱ्यांचे सर्व व्यवहार ठप्प आहेत. दुकाने सुरू ठेवण्यासाठी परवानगी मिळत नसल्याने यावर अवलंबून असलेल्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. दोन महिन्यांत यातून होणारी कोट्यवधी रुपयांची उलाढालही ठप्प झाली आहेत. आतातरी परवानगी द्या, अशी मागणी या विक्रेत्यांनी जिल्हा प्रशासन व महापालिकेतर्फे केली आहे. 

शहरात मोबाईल स्टोअर, रिपेरिंग व आक्सेसरीज विक्रेत्यांची संख्या जवळपास एक हजारांच्या घरात आहे. ठाणबंदी झाल्यापासून त्यांचे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यांच्याकडे कार्यरत असलेले कामगार घरी परतले आहेत. मोबाईल विक्री, दुरुस्ती आणि आक्सेसरीज विक्री करणाऱ्यांना दिवसाकाठी पाच ते दहा हजार रुपये उलाढाल होते. दोन महिन्यांपासून सर्व उलाढाल ठप्प आहेत. कामगारांचा पगार निघत नाही. याशिवाय दुकानाचे भाडेही मोठ्या प्रमाणावर वाढल्याने ते कुठून द्यायचे असा प्रश्न या व्यापाऱ्यांना समोर उभा ठाकला आहे. त्यामुळे तत्काळ परवानगी देऊन मोबाईल विक्री दुरुस्ती आणि आक्सेसरीज विक्रीचा मार्ग मोकळा करा, अशी मागणी करण्यात येत असल्याचे मोबाईल असोसिएशनचे गुलाब हक्कानी यांनी सांगितले. 
हेही वाचाखुशखबर 50 हजार तरुणांना रोजगार
सप्लाय चेन विस्कळित 
मोबाईल दुरुस्तीसाठी लागणाऱ्या आक्सेसरीज या चीनवरून आयात करण्यात येतात. फेब्रुवारीपासून चीनवरून येणाऱ्या आक्सेसरीज आयातच विक्रेत्यांकडे झाली नाही. यामुळे आता टाळेबंदी हाटल्यानंतर दुरुस्तीसाठी येणाऱ्या मोबाईल यांना लागणारी आक्सेसरीज तुटवडा निर्माण होईल. आक्सेसरीज व मोबाईलचा सप्लाय चेन बंदीमुळे विस्कळित झाली असल्याची माहिती कॅनॉट व्यापारी महासंघाचे ज्ञानेश्वर खर्डे यांनी दिली. 
हेही वाचा:शेतकऱ्यांनो...निंबोळी अर्क तयार करण्याची हीच खरी वेळ, विनाखर्च बनविण्याची ही आहे पद्धत
आकडे बोलतात 

  • मोबाईल स्टोअर -२०० 
  • मोबाईल रिपेरिंग-३०० 
  • आक्सेसरीज विक्रेते-५०० 
  • सिम कार्ड विक्री करणारे -२०० 
  • कामगार -३,००० 

या आहेत मागण्या 

  • दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, सर्व नियम पाळून काम करू. 
  • दोन महिन्यांपासून दुकान बंद असल्याने दुकानाचे भाडे माफ करावे. 
  • वीजबिल, इंटरनेट बिल माफ करावे 
  • ऑनलाइन विक्रीची परवानगी द्यावी 
  • महापालिकेतर्फे आकारण्यात येणारा करही माफ करावा 

 

मोबाईल विक्री, दुरुस्‍ती आणि दुकाने सुरू व्हावी. ही मागणी आम्ही जिल्हा व्यापारी संघामार्फत पालकमंत्र्यांकडे केली. मात्र, त्यांनी नकार दिला. आम्ही ऑनलाइन विक्रीची मागणी केली. त्यातही अडथळा आला. मोबाईल मार्केट सुरू होणे गरजेचे आहे. 
- गुलाब हक्कानी,अध्यक्ष, मोबाईल असोसिएशन 
 
शहरातील मोबाईल विक्रेत्यांवर जवळपास तीन हजारांहून अधिक कामगार अवलंबून आहे. कामगारांचे पगार अनेकांनी आपल्या खिशातून केले. टाळेबंदीमुळे मोबाईल विक्रेते, रिपेरिंगवाले चे जीवनच बदलून गेले. तीन महिन्यांपासून सर्वजण घरीच बसून आहे. परवानगी मिळत नाही, यामुळे किमान फोनच्या माध्यमातून ऑर्डर मिळवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. 
- ज्ञानेश्वर अप्पा खर्डे, अध्यक्ष कॅनॉट व्यापारी असोसिएशन 

दुकानाला नऊ हजारांचे भाडे असून, तीन महिन्यांपासून ते थकले आहे. महिनाभर घरून काम केले; मात्र आता मोबाईलसाठी लागणारे पार्ट मिळत नाहीत. काही पाठवले ते दोन ते तीन पट जास्त किमतीने खरेदी करावे लागतात. 
मुंबईहून येणारी आक्सेसरीज बंद झाली आहे. त्यामुळे आता महिनाभरापासून काम बंद आहे. 
-अवी पाटील, रिपेरिंगवाला 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mobile Industry Business Stopped Aurangabad News