AMC : कोरोना रुग्णांच्या जेवणावर ३५ लाख तर पत्रे ठोकण्यासाठी ५३ लाख खर्च

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

कोरोनाविरुद्ध लढाई : औरंगाबाद महापालिकेला ११ कोटींचा निधी 

औरंगाबाद  : शहरातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारकडून महानगरपालिकेला आतापर्यंत ११ कोटी १७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी महापालिकेचे कोविड व क्वारंटाइन सेंटरसाठी भोजन, रुग्णव्यवस्था, औषधी आणि कंटेनमेंट झोनमधील प्रवेशबंदी यावर सुमारे दोन कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असल्याचे शहर अभियंता एस. डी. पानझडे यांनी सांगितले. यामध्ये रुग्णांच्या जेवणावर ३५ लाख रुपये, पत्रे ठोकून सील करण्यासाठी ५३ लाख रुपये, औषधी, साहित्य आणि पीपीई किट, उपकरणे १ कोटी १० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. मार्च ते जून या साडेतीन महिन्यांच्या काळात महापालिकेची यंत्रणा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिवसरात्र परिश्रम घेत आहे. राज्य सरकारने तातडीने उपाययोजना राबविण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे जाहीर केले. त्याप्रमाणे राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून २ कोटींचा निधी मिळाला व ५ कोटींचा निधी मंजूर झाला.

जिल्हा नियोजन समितीने महापालिकेला ४ कोटी १७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या निधीतून तीन कोविड केअर सेंटर आणि सहा क्वारंटाइन सेंटरसाठी लागणारे साहित्य गाद्या, उशा, बेडशीट, चादरी, औषधी, मेडिकल उपकरणे, सेंटरची दुरुस्ती, रुग्णांसाठी जेवण, वाहन व्यवस्था, कंटेनमेंट झोनमधील विविध वसाहतींत रुग्ण आढळून आल्यानंतर तो भाग सील करण्याची प्रक्रिया यासाठी मार्च ते मेदरम्यान जवळपास २ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. जेवणावर ३५ लाख रुपये, पत्रे ठोकून सील करण्यासाठी ५३ लाख रुपये, औषधी, साहित्य आणि पीपीई किट, उपकरणे १ कोटी १० लाख रुपये याप्रमाणे साधारणपणे २ कोटींचा खर्च करण्यात आला आहे.

प्रत्येक रविवारी होणार लॉकडाऊन; राज्य सरकारचा मोठा निर्णय

सरकारकडून ५ कोटींचा निधी अद्याप प्राप्त झालेला नाही. जून महिन्यात लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे कोविड केअर सेंटर आणि क्वारंटाइन सेंटरही वाढविण्यात आले. त्यावर मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. बाधित रुग्णांसोबतच संपर्कातील व्यक्तींनाही क्वारंटाइन केले जात असल्यामुळे त्यांच्यावरही खर्च होत आहे. रोज साधारणपणे पाच ते सहा लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.  
  
क्वारंटाइन सेंटरनिहाय केटरर्स 
महापालिकेने शहरातील कोविड केअर सेंटर आणि क्वारंटाइन सेंटरमधील रुग्णांसह संशयित व्यक्तींना दोनवेळचे जेवण, दोनदा चहा, नाश्‍ता, बिस्कीट हे पुरविण्यासाठी महापालिकेची मध्यवर्ती स्वयंपाकघर योजना सुरू केली. परंतु रुग्णांसाठी ते सोयीचे नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे आता क्वारंटाइन सेंटरनिहाय केटरर्सची नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठी निविदा मागवून त्या अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे श्री. पानझडे यांनी सांगितले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 11 crore fund to Aurangabad Municipal Corporation