esakal | औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यात दीड लाखाहून अधिक हेक्टरवर रब्बीची पेरणी पूर्ण
sakal

बोलून बातमी शोधा

perni

विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत येत असलेल्या औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ६८ हजार ६९४ हेक्‍टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे.

औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यात दीड लाखाहून अधिक हेक्टरवर रब्बीची पेरणी पूर्ण

sakal_logo
By
मधुकर कांबळे

औरंगाबाद : विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत येत असलेल्या औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ६८ हजार ६९४ हेक्‍टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे. लांबलेल्या पावसामुळे रब्बीची पेरणीही लांबली आहे. सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत २५. ४ टक्‍के पेरणी झाल्याचे विभागीय कृषी कार्यालयातून देण्यात आली आहे. औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामासाठीचे सर्वसाधारण क्षेत्र ६ लाख ६४ हजार ३६ हेक्‍टर इतके आहे. त्या तुलनेत २५ टक्‍के क्षेत्रावर अर्थात १ लाख ६८ हजार ६९४ हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली आहे.

यंदा विद्यार्थ्यांचा दीपोत्सव सूनासूना, कोरोनामुळे शाळा बंदचा परिणाम

पेरणी झालेल्या क्षेत्रात जिल्ह्यातील १४ हजार ८५१ हेक्‍टरसह जालनामधील ४७ हजार ११ व बीड जिल्ह्यातील सर्वाधिक १ लाख ६ हजार ८३२ हेक्‍टर क्षेत्राचा समावेश आहे. तीनही जिल्ह्यातील पेरणी उरकलेल्या क्षेत्रात रब्बी ज्वारी आणि व हरभरा या प्रमुख पिकांसह ८० हेक्‍टरवरील करडई, २६ हेक्‍टरवरील जवस, ७१६० हेक्‍टरवरील गहू, ५१२१ हेक्‍टरवरील मका, १४६ हेक्‍टरवरील इतर तृणधान्य,१ हेक्‍टरवरील मोहरी व २५ हेक्‍टरवरील इतर गळीतधान्यांचा समावेश असल्याची माहिती कृषी विभागाच्यावतीने देण्यात आली. पावसाळा लांबल्याने अनेक भागात अजूनही जमीनीमध्ये वापसा नसल्याची स्थिती आहे. जसजसा वापसा होत आहे त्यानुसार रब्बीच्या पेरणीला गती येत आहे. तीनही जिल्ह्यात रब्बी ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ६५ हजार ९९७ हेक्‍टर इतके आहे.


हरभऱ्याचे क्षेत्र ५१ हजार हेक्‍टरवर
तीनही जिल्ह्यात हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ६९ हजार ५४७ हेक्‍टर इतके आहे. त्या तुलनेत प्रत्यक्षात ५१ हजार ५७० हेक्‍टरवर हरभऱ्याची पेरणी झाली आहे. सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ३० टक्‍के पेरणी उरकलेल्या हरभऱ्याच्या क्षेत्रात औरंगाबाद जिल्ह्यातील ३५७८ हेक्‍टर, जालन्यातील १२९४७ हेक्‍टर तर बीड जिल्ह्यातील ३५ हजार ४५ हेक्‍टर हरभऱ्याच्या क्षेत्राचा समावेश आहे.

संपादन - गणेश पिटेकर