राज्यमंत्री सत्तारांचे 'एकला चलो रे'चा नारा, जिल्हा बँक ताब्यात घेण्यासाठी उतरले मैदानात

प्रकाश बनकर
Tuesday, 23 February 2021

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीविरुद्ध भाजप असे चित्र असताना सत्तार यांनी महाविकास आघाडीसह भाजपलाही चकवा देत स्वतंत्र पॅनल उभे करण्याची तयारी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी ताकदपणाला लावून बँक ताब्यात घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सोमवारी (ता.22) अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तिसरा अर्ज दाखल केला आहे. अब्दुल सत्तार यांनी यापूर्वी दोन अर्ज दाखल केले होते, तर सोमवारी  तीन अर्ज दाखल केले असे एकूण पाच अर्ज सत्तार यांनी या औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी दाखल केले आहे. त्यांचा मुलगा समीर सत्तार यांनीही तीन अर्ज निवडणुकीसाठी दाखल केले आहेत.

वाचा - कोरोना काळात औरंगाबादचे राजकारणी इतके बेफिकीर कसे? ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग; नियम काय जनतेनेच पाळायचे का ?

महाविकास आघाडीमध्ये मंत्री असलेले अब्दुल सत्तार यांनी जिल्हा बँकेत मात्र महाविकास आघाडी सोबत न जाण्याचा निर्णय घेतला आहे. कारण सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या तिनी पक्षांसोबत अब्दुल सत्तर दिसले नाहीत. सत्तार यांनी दुपारी तीन वाजेनंतर स्वतंत्रपणे अर्ज दाखल केला. एवढेच नाही तर जिल्हा परिषदेच्या फाॅर्म्युला जिल्हा मध्यवर्ती बँकेत वापरण्याचा ही डाव अब्दुल सत्तार यांचा दिसून येत आहे.

वाचा - स्वप्नं पापण्यातले पापण्यातच विरले, कुटुंबाचा आधार होऊ पाहणाऱ्या जिद्दी प्रतिक्षाला काळाने अडविलेच

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीविरुद्ध भाजप असे चित्र असताना सत्तार यांनी महाविकास आघाडीसह भाजपलाही चकवा देत स्वतंत्र पॅनल उभे करण्याची तयारी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपतर्फे आमदार हरिभाऊ बागडे यांच्या नेतृत्वाखाली दोन बैठका बँकेच्या बिनविरोध निवडणुकीसाठी झालेल्या या बैठकीतही अब्दुल सत्तार यांनी दांडी मारली. यासह आज  सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षांतील उमेदवारांनी एकत्र येत अर्ज दाखल केली. त्यावेळीही सत्तार यांनी दांडी मारली होती. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सत्तारांची नवी खेळी बघायला मिळणार आहे. दहा मार्चपर्यंत अर्ज मागे घेण्याची तारीख असल्याने मोठा कालावधी आहे. या काळात काय बदल होता हेच पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Above Two Hundred Applications For Aurangabad District Cooperative Bank Elections Aurangabad News