...आणि त्याच्या डोक्यावरून गेले जेसीबीचे चाक

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 2 January 2020

  • सिल्लोड तालुक्‍यातील घटना
  • चालकाचा निष्काळजीपणा
  • लोकांनी केली बेदम मारहाण

शिवना (जि. औरंगाबाद) : केंद्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अकोला विभागांतर्गत सुरू असलेल्या अजिंठा - बुलडाणा राज्यमार्गाच्या कामावर जेसीबी यंत्राच्या चाकाखाली येऊन एका मजुराचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता. 31) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास भोरखेडा फाट्यानजीक घडली.

सध्या अजिंठा-बुलडाणा राज्यमार्गाच्या दुपदरीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. या रस्त्याच्या पॅचिंगचे काम सुरू असताना जेसीबी यंत्र मागे घेण्याच्या नादात चालकाला अंदाज आला नाही आणि यंत्राच्या मागे काम करीत असलेला कामगार चाकाखाली आला. 

आशुतोष अरुणकुमार पासवान (वय 30, रा. महादा बननी, खडगिया, बिहार) असे या मजुराचे नाव आहे. त्याच्या डोक्‍यावरून जेसीबीचे चाक गेल्याने तो जागीच गतप्राण झाला. 

हे वाचलंत का?Video : दोन किलो मिठाई खाणारा उंदीर... पहा पराक्रम

या सिमेंट रस्त्याच्या सिमेंटीकरणाचे काम परराज्यातील स्फायरो ही बांधकाम कंपनी करीत आहे. कामावर जवळपास सर्वच मजूर उत्तर प्रदेश, बिहारमधील रहिवासी आहेत. 

जेसीबी चालकाला मारहाण

जेसीबी चालकाने अचानक जेसीबी मागे घेतल्याने काम करीत असलेल्या पासवान याच्या डोक्‍यावरून चाक गेले. त्यात तो ठार झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या बिहारी मजुरांनी त्यांचाच सहकारी असलेल्या बिहारी जेसीबी चालकाला (नाव कळू शकले नाही) बेदम मारहाण केली. 

वाचा बिबट्याच्या तावडीतून असे बचावले दांपत्य

या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या चालकाला पोलिसांच्या मदतीने स्थानिक नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृतीही चिंताजनक असल्याचे समजते. अजिंठ्याचे सहायक पोलिस निरीक्षक किरण आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार रविकिरण भारती, दीपक भंगाळे पुढील तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident on Ajanta Buldana Road Near Sillod Aurangabad News