हृदयद्रावक : नोकरी गेली, म्हणाला, ‘सोडून जाणार नाही मी तुला’ अन्...

विकास पाटील
शुक्रवार, 29 मे 2020

रात्रभर नांगरटी चालू होती. पहाटे चारच्या सुमारास ट्रॅक्टर मागे घेत असताना पन्नास फूट खोल विहिरीत ट्रॅक्टर जाऊन पडले विहिरीत असलेल्या पाण्यात ट्रॅक्टर अंगावर पडल्याने सागर दाबला जाऊन पाण्यात बुडून गुदमरला.

बनोटी (जि. औरंगाबाद) : मोठी स्वप्न पाहून तो नोकरीसाठी सुरतला गेला. तिथं स्थिर होत नाही तोच नोकरी गेली. गावी आला. इकडे एका शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरवर चालक म्हणून कामाला लागला. पण, नियतीच्या मनात वेगळेच काही शिजत होते. एक क्षणात होत्याचे नव्हते झाले. त्याचा ट्रॅक्टर अपघातात मृत्यू झाला. दरम्यान, त्याने ‘टिकटॉक’वर केलेला ‘सोडून जाणार नाही मी तुला’ हा व्हिडिओ परिसरात व्हायरल झाला. मात्र, त्याच्या अचानक सोडून जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना आज (ता. २९ मे) पहाटे चारच्या सुमारास गोंदेगाव (ता. सोयगाव) येथे घडली. सागर चिंतामण देसले (वय २४) असे मृताचे नाव आहे. 

लॉकडाउचा फटका बसल्याने नोकरी हिरावलेल्या गोंदेगाव येथील सागर गावी परतला आणि ट्रॅक्टर चालविण्याचे काम करीत कुटुंबास हातभार लावीत होता. गुरुवारी सायंकाळी नऊ वाजता जेवण आटोपून मुखेड शिवारातील गट क्रमांक ९१ मधील सुभाष बोरसे यांच्या शेतात नांगरटी करण्याकरिता गेला होता. रात्रभर नांगरटी चालू होती. पहाटे चारच्या सुमारास ट्रॅक्टर मागे घेत असताना पन्नास फूट खोल विहिरीत ट्रॅक्टर जाऊन पडले विहिरीत असलेल्या पाण्यात ट्रॅक्टर अंगावर पडल्याने सागर दाबला जाऊन पाण्यात बुडून गुदमरला.

यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सकाळी घटनेची माहिती बनोटी दूरक्षेत्रात मिळाल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे अंमलदार योगेश झाल्टे, सतीश पाटील, दीपक पाटील, विकास दुबिले यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. करीत मृतदेह शवविच्छेदनाकरिता बनोटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणल्यावर आरोग्य अधिकारी डॉ. मंगेश बनसोडे यांनी शवविच्छेदन केल्यानंतर शुक्रवारी दुपारी पोलिस बंदोबस्तात गोंदेगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

सावधान!! कोविडच्या मृत्युदरात औरंगाबाद देशापेक्षाही आहे पुढे
 

आर्थिक परिस्थिती हलाखीची

सारगरच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. आई-वडील वयस्कर असल्याने घरातील मोठा मुलगा नात्याने घरची जबाबदारी त्याच्यावर येऊन पडली. त्यात गावात काम मिळत नसल्याने सागरने सुरत गाठले येथील एका खासगी कारखान्यात काम करीत घर संसार चालवीत होता. परंतु, लॉकडाउमुळे त्याची नोकरी गेली. तो बेरोजगार झाला आणि मागील आठवड्यात गावी परतला होता. घरी रिकामे बसण्यापेक्षा ट्रॅक्टर चालविता येत असल्याने गावातील शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरचा चालक म्हणून काम करू लागला. शुक्रवारी पहाटे संबंधित शेतकरी आणि त्याच्या बरोबर आलेला चालक झोपी गेल्याने सागरने काम चालूच ठेवले होते. नांगरटी अंतिम टप्प्यात आली असतानाच काळाने घात केला. अंधारात त्याला शेतातील विहीर दिसली नाही आणि ट्रॅक्टर मागे घेताना विहिरीत जाऊन पडले आणि सागराचे आयुष्य संपले.

कामगारांना पूर्ण पगार मिळालाच नाही, कोर्टाचे दरवाजे ठोठावले अन...

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accidental Death of Youth at Gondegaon