esakal | सावधान!! कोविडच्या मृत्युदरात औरंगाबाद देशापेक्षाही आहे पुढे
sakal

बोलून बातमी शोधा

CoronaVirus News

कोरोनाचा काळ औरंगाबादसाठी अत्यंत कठीण असून, या काळात रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. केवळ पंधरा दिवसांतच औरंगाबादेत ६४ टक्के मृत्यू झाले आहेत.

सावधान!! कोविडच्या मृत्युदरात औरंगाबाद देशापेक्षाही आहे पुढे

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद: कोरोनाचा काळ औरंगाबादसाठी अत्यंत कठीण असून, या काळात रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. केवळ पंधरा दिवसांतच औरंगाबादेत ६४ टक्के मृत्यू झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशाचा मृत्युदर २.८६ टक्के आहे. महाराष्‍ट्राचा मृत्युदर ३.२१ टक्के आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार पुण्याचा मृत्युदर सर्वाधिक ४.५६ टक्के असून त्यानंतर औरंगाबादचा (४.४४ टक्के) क्रमांक लागतो. मुंबई (३.२६ टक्के) व ठाणे (१.३३ टक्के) एवढा आहे.

हे वाचंलत का? - आता पाच मिनिटांत कोरोनाचे निदान; राज्यातील पहिलाच प्रयोग

एक मे ते २१ मे यादरम्यान औरंगाबादेत कोरोनाचा उद्रेक होता. या काळात एक हजार सात रुग्ण वाढले; तर ५२ रुग्णांचा मृत्यू झाला. अर्थात एक हजार सात रुग्णांमागे ५.१६ एवढा मृत्युदर होता. विशेषतः एकूण रुग्णांच्या मृत्यूपैकी १५ ते २१ मे दरम्यान ३८.९८ मृत्यू व २१ ते २६ मे या सहा दिवसांत २५.४२ एवढे मृत्यूचे प्रमाण आहे. एकूण कोरोनाच्या साथकाळापैकी तब्बल ६४.४० टक्के मृत्यू केवळ दहाव्या व अकराव्या आठवड्यातील आहेत ही गंभीर बाब आहे.

हे गंभीरच
- भारतातील एकूण मृत्यूपैकी १.३९ टक्के मृत्यू औरंगाबादेत
- देशातील २२ राज्यांपेक्षा जास्त मृत्यू औरंगाबादेत
-मुंबई, पुणे, ठाण्यानंतर सर्वांत जास्त औरंगाबादेत मृत्यू
- आंध्रप्रदेश (५६), तेलंगणा (५६), कर्नाटक (४४), पंजाब (४०) या राज्यापेक्षा औरंगाबादेत जास्त मृत्यू

हेही वाचा- शिवसेनेच्या नाकीनऊ आणलेल्या या माजी आमदाराने राजीनामा कुठं दिला?

राज्यांच्या तुलनेत...
अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, गोवा, मणिपूर, मिझोरम, नागालॅंड, सिक्किम, त्रिपुरा या आठ राज्यांत कोरोनाचा एकही मृत्यू झालेला नाही. तर मेघालय, उत्तराखंड, झारखंड, आसाम, हिमाचल प्रदेश, केरळ, ओरिसा, बिहार, हरियाना या नऊ राज्यांत एकूण ५८ (४९.५८ टक्के) बळी गेले आहेत. या राज्यांच्या तुलनेत औरंगाबादेत ५९ (५९.४२ टक्के) बळी गेले आहेत.

शहराचे आकडे बोलतात...
-सुमारे ८० टक्के मृत्यू ५१ ते ८५ वयोगटातील.
-सुमारे ९० टक्के मृत्यूला कोविडसह इतर आजारही कारणीभूत.
-३१ ते ४० वयातील चार रुग्णांचा मृत्यू
-४१ ते ५० वयाच्या आठ रुग्णांचा मृत्यू
-५१ ते ६० वयाच्या अठरा रुग्णांचा मृत्यू
- ६१ ते ७० वयीन अठरा रुग्णांचा मृत्यू
-७१ ते ८५ वयातील अकरा जणांचा मृत्यू.
-एकूण मृतांत ६६.७ टक्के पुरुष व ३३.३ टक्के महिलांचा समावेश

क्लिक करा- घाबरू नका, तब्बल नव्वद टक्के रुग्ण ठणठणीत बरे होणार

go to top