औरंगाबादेत चरस तस्करीतील आरोपीची जामीनावर सुटताच मिरवणूक! व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना जाग

सुषेन जाधव
Thursday, 3 December 2020

एकीकडे शहरात पदवीधर निवडणूक व कोरोनामुळे कलम १४४ लागू असताना दुसरीकडे चक्क चरस तस्करीच्या गुन्ह्यातील आरोपी जामीनावर सुटताच त्याच्या पंटरांनी आतषबाजी करत मिरवणूक काढल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी (ता.दोन) रात्री घडला.

औरंगाबाद : एकीकडे शहरात पदवीधर निवडणूक व कोरोनामुळे कलम १४४ लागू असताना दुसरीकडे चक्क चरस तस्करीच्या गुन्ह्यातील आरोपी जामीनावर सुटताच त्याच्या पंटरांनी आतषबाजी करत मिरवणूक काढल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी (ता.दोन) रात्री घडला. विशेष म्हणजे, या घटनेची बेगमपुरा पोलिसांना खबरही नव्हती. मात्र मिरवणुकीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधिताविरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला.

अकबर अली (रा.आसेफिया कॉलनी) असे जामीनावर सुटलेल्या संशयिताचे नाव असून त्याला दोन महिन्यांपूर्वी चरस तस्करी प्रकरणात जामीन मंजूर झाला होता. त्यानंतर टॉऊन हॉल परिसरातून आसेफिया कॉलनीपर्यंत त्याची आतषबाजी करत मिरवणूक काढण्यात आली. अलीविरोधात पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकाने कारवाई केलेली आहे. तो हर्सूल कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. तब्बल महिन्याभरानंतर जामीनावर सुटल्याने त्याच्या साथीदारांनी बुधवारी रात्री चारचाकी वाहनाच्या टपावर बसवून गळ्यात फुलांची माळ घालून, फटाक्यांची आतषबाजी करत भव्य मिरवणूक काढली. मिरवणुकीमध्ये शेकडो तरुण सहभागी होते. कोरोनाचे नियम सर्वांनी पायदळी तुडविले. जोरदार घोषणाबाजी आणि फटाक्यांची तुफान आतषबाजी करून या टोळक्याने परिसर दणाणून सोडला होता.

रात्री उशिरा गुन्हा दाखल
मिरवणुकीदरम्यान तरुणांनी गाण्याच्या तालावर बेधुंद धिंगाणा घातला. यावेळी ट्रॅफिक जाम झाली होती. सर्व प्रकार बेगमपुरा पोलिसांना मिरवणुकीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर समजला, तोपर्यंत आरोपी घरी पोचला होता. बुधवारी (ता.दोन) या प्रकरणात रात्री उशिरा गुन्हा दाखल केल्याची माहिती बेगमपुरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सानप यांनी दिली.

 

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accused Come Out On Bail And Celebration Starts, Police Take Action Aurangabad