सोळावं वरीस खरच ठरल तिच्यासाठी धोक्याचं...

माधव इतबारे
Thursday, 6 August 2020

नगरखाना गल्लीतील धोकादायक इमारत मालकाला २००४ पासून महापालिकेतर्फे इमारत पाडून घेण्यासाठी नोटिसा बजावल्या जात होत्या. मात्र नोटिसांची दखल घेतली जात नसल्याने २८ मेरोजी नव्याने नोटीस बजावण्यात आली होती.

औरंगाबाद ः पावसाचा जोर वाढत असल्याने महापालिकेला शहरातील धोकादायक इमारतींची आठवण झाली आहे. २००४ पासून महापालिकेतर्फे एका इमारत मालकाला नोटिसा दिल्या जात होत्या. मात्र, उपयोग होत नसल्याने बुधवारी (ता. पाच) सायंकाळी जेबीने गुलमंडी भागातील नगरखाना गल्लीतील ही इमारत जमीनदोस्त करण्यात आली. तब्बल १६ वर्षानंतर ही कारवाई करण्यात आली. 

शहरातील जुन्या भागात आजही अनेक धोकादायक इमारती उभ्या आहेत. पावसाळ्यापूर्वी अशा इमारतींचे सर्वेक्षण करून इमारत मालककांना नोटिसा बजावण्याचे काम महापालिकेतर्फे केले जाते. यंदा मात्र कोरोनाच्या उपाययोजनांमध्ये प्रशासन मग्न असल्यामुळे धोकादायक इमारतींचा विसर पडला होता. मात्र पावसाचा जोर वाढल्यामुळे धोकादायक इमारती कोसळून त्यात राहणारे नागरिक, शेजाऱ्यांना धोका निर्माण होण्याची भीती असल्यामुळे महापालिकेने बुधवारी एका इमारतीवर कारवाई केली.

नगरखाना गल्लीतील या इमारत मालकाला २००४ पासून महापालिकेतर्फे इमारत पाडून घेण्यासाठी नोटिसा बजावल्या जात होत्या. मात्र नोटिसांची दखल घेतली जात नसल्याने २८ मेरोजी नव्याने नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी प्रभारी अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांच्या नेतृत्वाखालील पथकाचे पदनिर्देशित अधिकारी वसंत भोये, इमारत निरीक्षक सय्यद जमशीद, मझहर अली, आर. एस. राजतवार यांनी ४० बाय ६० आकाराची ही इमारत जेसीबी लावून पाडली.

`ते’ अधिकारी पुन्हा नगररचना रिटर्न 
महापालिकेच्या नगररचना विभागातील टीडीआर घोटाळा विधिमंडळात गाजला होता. त्यानंतर चौकशीची घोषणाही झाली. या पार्श्‍वभूमीवर तत्कालीन आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी नगररचना विभागातील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांची इतरत्र बदली केली होती. श्री. निपुण यांची बदली होताच आता हे अधिकारी-कर्मचारी पुन्हा नगररचना विभागात येण्यास सुरवात झाली आहे. दोन दिवसांपूर्वी एका अधिकाऱ्याची पुन्हा नगररचना विभागात बदली झाली आहे. लवकरच जुने शहर आणि वाढीव हद्द अशा दोन्हींचा एकत्रित विकास आराखडा तयार केला जाणार आहे. त्यामुळेच राजकीय व्यक्तींकडून सर्व जुन्या जाणकार अधिकारी कर्मचाऱ्यांना नगररचना विभागात परत आणण्याच्या हालचाली सुरू असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

साडेतीन हजार चाचण्या, ११९ जण पॉझिटिव्ह 
शहरात बुधवारी (ता. पाच) शहराच्या विविध भागांत मोबाईल पथके आणि सहा एन्ट्री पॉइंटवर ३७४३ अँटीजेन, आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ३६२४ अँटीजेन चाचण्यांमधून ११९ जण पॉझिटिव्ह आढळून आले. बुधवारी सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत सहा एन्ट्री पॉइंटवर एक हजार ७९६ जणांच्या अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या. त्यात ४५ जण पॉझिटिव्ह निघाले. चार जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. कोविड केअर सेंटर आणि क्वारंटाइन सेंटरमध्ये ८८ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. मोबाईल पथकांच्या माध्यमातून दिवसभरात एक हजार ८२८ जणांची अँटीजेन चाचणी करण्यात आली. त्यापैकी ७४ जण पॉझिटिव्ह निघाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action on dangerous building