डिसेंबर अखेरपर्यंत ६१३ ग्रामपंचायतींवर प्रशासक निभावणार सरपंचाची भूमिका!

दुर्गादास रणनवरे
Monday, 7 September 2020

औरंगाबाद जिल्ह्यातील तब्बल ६१३ ग्रामपंचायतीची मुदत टप्प्या-टप्प्याने डिसेंबरपर्यंत संपणार असल्याने या सर्व ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासक सांभाळणार आहेत. सरपंचांना जे अधिकार आणि कर्तव्ये असतात ते सर्व प्रशासकाना वापरता येणार आहेत.

औरंगाबाद : जिल्ह्यातील तब्बल ६१३ ग्रामपंचायतीची मुदत टप्प्या-टप्प्याने डिसेंबरपर्यंत संपणार असल्याने या सर्व ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासक सांभाळणार आहेत. सरपंचांना जे अधिकार आणि कर्तव्ये असतात ते सर्व प्रशासकाना वापरता येणार आहेत. ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यातील ४७ ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली, तर सप्टेंबर महिन्यात मात्र तब्बल ५४१ ग्रामपंचायतींची मुदत संपत असल्याने तिथे प्रशासक नियुक्तीची तयारी अंतिम टप्प्यात आली असुन ९ सप्टेंबरपूर्वीच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले नियुक्तीचे आदेश काढणार असल्याची माहिती पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुनील भोकरे यांनी "सकाळ"शी बोलतांना दिली.

मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी, जायकवाडी धरण ९८ टक्के भरले

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेणे शक्य नसल्याने जुलै ते डिसेंबर २०२० पर्यंत अशा सर्व ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीचे अधिकारी राज्य शासनाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत. पालकमंत्र्यांशी चर्चा करुन पहिल्या टप्प्यात आॅगस्टमध्ये कार्यकाळ संपलेल्या कन्नड व वैजापुर तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्ती करण्यात आली.

आता सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक ५४१ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपत आहे. तेथे विविध संवर्गातील अधिकाऱ्यांना प्रशासक म्हणून नेमण्यात येणार आहे. परंतु मतदानाचा हक्क वगळता सरपंचांचे सर्व अधिकारी या प्रशासकांना असणार आहेत. तसेच मुळ पदाचे काम सांभाळून ही अतिरिक्त जबाबदारी सांभाळावी लागणार आहे. कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतींवर विस्तार अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापकांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांना ही जबाबदारी दिली जाणार आहे.

कोरोनाचा असाही परिणाम, व्यापारी करु लागले ऑनलाइन व्यवहार

या आहेत कार्यकाळ संपणाऱ्या जिल्ह्यातील ५४१ ग्रामपंचायती
१० सप्टेंबरला औरंगाबाद तालुक्यातील ४१, फुलंब्री तालुक्यातील ११, पैठण तालुक्यातील ३२ अशा ८४, ११ सप्टेंबरला  फुलंब्री तालुक्यातील १४, सिल्लोड तालुक्यातील १६, वैजापुर तालुक्यातील ३९, पैठण तालुक्यातील १२ अशा ८६, १२ सप्टेंबरला औरंगाबाद ३३, फुलंब्री १५,  सिल्लोड १९, कन्नड २९, खुलताबाद १९, वैजापुर १, पैठण १९ अशा १३५, १३ सप्टेंबरला औरंगाबाद २, फुलंब्री ४, सिल्लोड १७, सोयगांव ४०, कन्नड २९, खुलताबाद ६, गंगापुर ३१, वैजापुर ३७, पैठण १२ अशा १७७, १४ सप्टेंबरला सिल्लोड १७, गंगापुर ३४ अशा ५१, १५ सप्टेंबरला गंगापुरच्या ४, १६ व १८ सप्टेंबरला पैठण येथील प्रत्येकी १, ३० सप्टेंबरला सिल्लोड तालुक्यातील एका ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपत आहे. नोव्हेंबरमध्ये फुलंब्रीतील ४ तर वैजापुर येथील एका तर डिसेंबरमध्ये २० ग्रामपंचायतींची मुदत संपणार असल्याची माहिती पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुनील भोकरे यांनी "सकाळ" शी बोलताना दिली.

(संपादन - गणेश पिटेकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Administers Hold Charge Of Grampanchayat Till December