विद्यापीठाकडून सहा तासानंतरही प्रश्‍नपत्रिका मिळालीच नाही! विद्यार्थ्याने सांगितली आपबिती

अतुल पाटील
Thursday, 15 October 2020

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ऑनलाइन परीक्षा सुरु आहेत. विद्यापीठाच्या परिक्षेला चार जिल्ह्यांतून एक लाख ६४ हजार विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत.

औरंगाबाद : ‘‘ऑनलाइन परीक्षेमध्ये सततच्या अडचणीमुळे परीक्षा ऑफलाइन देण्याचे ठरवले. त्याप्रमाणे परतूर (जालना) येथील एका कॉलेजला पोचलो. तिथेच दुसऱ्या सत्रात दोन ते चार दरम्यान, ऑनलाइनसाठी प्रयत्न केला. तो असफल ठरल्यानंतर दुपारी चारला महाविद्यालयात परीक्षा देण्याचे ठरवले. मात्र पेपर आलेला नाही, वाट पहा, असे सांगण्यात आले. सहा वाजेनंतर महाविद्यालयाने आमचा प्रशासकीय वेळ संपला.’’ असे एका विद्यार्थ्याने ‘सकाळ’ला सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ऑनलाइन परीक्षा सुरु आहेत. विद्यापीठाच्या परिक्षेला चार जिल्ह्यांतून एक लाख ६४ हजार विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. विद्यार्थ्यांना प्रचंड तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ऑनलाइन परीक्षेत लॉगीनसाठी अडचणी येत असल्याने विद्यार्थी ऑफलाइन परीक्षेची निवड करत आहेत. मात्र, विद्यापीठाच्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेविनाच परतावे लागत आहे.

दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक; दोघे जण ठार, तिघे गंभीर जखमी

प्रश्‍नपत्रिकेसाठी विद्यार्थ्यांना सहा तास ताटकळत बसावे लागत आहे. कधीकधी प्रश्‍नपत्रिकाच न आल्याने ऑफलाइनच्या वेळेनंतरही विद्यार्थ्यांना महाविद्यालयात थांबण्याचा सल्ला विद्यापीठातर्फे नेमलेले आयटी समन्वयक देत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणखीनच हाल सोसावे लागत आहे.हॉलतिकीटवर दिलेल्या वेळेनुसार परीक्षा होत नाहीत. परीक्षेच्या ऑनलाइन वेबसाईटवर गेल्यानंतर विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

एकाच अभ्यासक्रमातील परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या सत्रात ६० गुणांची प्रश्नपत्रिका ऑनलाईन मिळाली, परंतु दुसऱ्या सत्रातील परीक्षा देणाऱ्यांना ३० गुणांची प्रश्नपत्रिका मिळाली, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. ऑनलाईन परीक्षा देताना काहींना त्यांच्या सत्राचे विषय तर काहींना अभ्यासक्रमही दिसत नाहीत. परीक्षेतील अडचणीविषयी विभागाशी संपर्क साधल्यावर ते एमकेसीएलशी संपर्क साधण्यास सांगत असल्याचे ऐश्‍वर्या पवार या विद्यार्थीनीने सांगितले.

 

लॉगीन केले. सिलेक्ट टेस्ट केली. त्यानंतर फॅकल्टी आणि प्रोग्राम भरायचे. यात स्ट्रीम आणि सेमिस्टर निवडायचे असते. यात सेमिस्टर आलेच नाही. आयटी समन्वयक फोन उचलत नाहीत. दोन वाजेपासून काही सोबतचे विद्यार्थी नेट कॅफेवर अडकून पडले आहेत.
- आकाश गायकवाड  

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After Six Hours Not Get Question Papers Bamu News