दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक; दोघे जण ठार, तिघे गंभीर जखमी

Accident
Accident

बनोटी (जि.औरंगाबाद) : सोयगाव-चाळीसगाव राज्यमार्ग क्रमांक २४ वर बनोटी (ता.सोयगाव) गावापासून एका किलोमीटर अंतरावरील वळणावर दोन दुचाकींची समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत दोन जण ठार, तर तीन जण जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता.१४) सकाळी दहाच्या सुमारास घडली.


शेवरी (ता.चाळीसगाव) येथील चंद्रकात बद्री फणशे (वय ३५ ) हे पत्नी अरुणा चंद्रकात फणशे (३०) आणि मुलगा कार्तिक चंद्रकांत फणशे (५) तिघे जण दुचाकीवरुन (एमएच १९ एएस ०६४७) बनोटी येथील नातेवाईकाच्या दहाव्याच्या कार्यक्रमासाठी येत होते, तर बनोटी येथील बन्सी हरचंद चौधरी (वय ४०)आणि संदीप चंपालाल चौधरी (वय३२) हे दोघे दुचाकीने (एमएच १९ एके ०७०१) नागदकडे वैयक्तिक कामासाठी जात असताना बनोटी गावापासून काही अंतरावर असलेल्या वळणावर दोन्हीही दुचाकी समोरासमोर जोरात धडकल्या. यात दुचाकीवरील तीन जण उडुन आडव्या पडलेल्या दुचाकीवर मरणासन्न अवस्थेत पडले, तर दोन जण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. अपघातात दुचाकींचा जोरात आवाज झाल्याने आसपासच्या शेतातील शेतकरी तसेच ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाल्याने काही काळ वाहतूक खोळंबून वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या.

घटनास्थळी उपसरपंच सागर खैरनार, स्वप्नील सोनवणे तसेच बनोटी येथील युवक मदतीला धावून येत पाचही जणांना बनोटी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करुन पाचोरा (जि.जळगाव) येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले असता बनोटी येथील बेचाळीस वर्षीय बन्सी हरचंद चौधरी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पाच वर्षीय कार्तिकची तब्येत खालावल्याने जळगाव येथील खासगी दवाखान्यात नेत असतांना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. तिघांची तब्‍येत चिंताजनक असून पाचोरा येथील दवाखान्यात उपचार चालू आहेत. पोलिस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाली बनोटी पोलीस चौकीचे कॉन्स्टेबल सुभाष पवार, विकास दुबेले यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.

रस्त्याच्या दुतर्फा गवत, झुडपे वाढल्याने अपघातात वाढ
राज्य महामार्ग क्रमांक २४ वरील सोयगाव-चाळीसगाव रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले गवत आणि झुडपांमुळे तसेच अनेक ठिकाणी धोकादायक वळणावर समोरुन येणाऱ्‍या वाहनांचा अंदाज येत नाही. त्यामुळे वाहने समोरासमोर धडकण्याच्या घटनेत वाढ झालेली असून नुकतेच बहुलखेडा गावाजवळ अशाच अपघातात एका जणाला प्राण गमवावे लागले आहे.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com