दहा दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला शेतात

शेख मुनाफ
Sunday, 27 September 2020

पैठण तालुक्यातील आगलावे गेवराई येथे तरुणाचा मृतदेह आढळला आहे.

आडुळ (जि.औरंगाबाद) : घरात कोणालाही काहीही न सांगता घरातुन निघून गेलेल्या तरुणाचा मृतदेह तब्बल दहा दिवसानंतर गावातील एका शेतातील लिंबाच्या झाडाखाली आढळून आला. यामुळे गावात खळबळ उडाली असून ही हत्या की आत्महत्या असे तर्कवितर्क लावले जात आहे. आगलावे गेवराई (ता. पैठण) येथील अविवाहित नारायण बाप्पु आगळे (वय २८) हा तरुण ता. १८ सप्टेंबर रोजी सकाळी प्रातःविधीसाठी जात आहे असे सांगून घरातून बाहेर गेला होता.

त्यानंतर तो परत आला नसल्याने त्याच्या नातेवाईकांनी त्याचा दिवसभर शोध घेतला. मात्र तो सापडला नसल्याने त्याचे नातेवाईक कल्याण आगळे यांनी दुसऱ्या दिवशी नारायण आगळे बेपत्ता असल्याची तक्रार पाचोड येथील पोलिस ठाण्यात दाखल केली. तेव्हापासून पाचोड पोलिस व ग्रामस्थ या तरुणाचा विविध दिशेने शोध घेत होते.

दोन हजार मेंढ्या बचावल्या, तरुणांनी दिला मेंढपाळाला मदतीचा हात

अखेर दहा दिवसानंतर गावातीलच संतोष माणिकराव आगलावे यांच्या पांढरी-पिंपळगाव शिवारातील गट क्रमांक ११८ मधील एका लिंबाच्या झाडाखाली आढळून आले. संतोष यांचे मोठे बंधू हरिश्चंद्र आगलावे हे दुपारी शेतात गेले असता त्यांना दुर्गंधी आल्याने त्यांनी तिथे जाऊन बघितले असता तिथे कुजलेल्या अवस्थेत मानवी मृतदेह असल्याचे दिसले.

त्यामुळे त्यांनी गावात येऊन सांगितले. त्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. ही घटना करमाड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने याची माहिती करमाड पोलिसांना देण्यात आली. मृत नारायण हा अविवाहित असुन त्याला एक भोळसर वृध्द आई आहे. त्याचे अकाली निधन झाल्याने या वृध्द मातेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After Ten Days Missing Youth Dead Body Found Aurangabad News