दोन दिवसांच्या उघडीपनंतर पुन्हा जोरदार पावसाची हजेरी

हबीबखान पठाण
Thursday, 1 October 2020

पाचोड (ता.पैठण) येथे गुरुवारी (ता.एक) तीन वाजता पावसाने जोरदार हजेरी लावल्याने रब्बीच्या पेरणीसाठी जुळवाजुळव करून शेतावर गेलेले शेतकरी वाफसा मोडल्याने निराश होऊन गावांकडे परतले.

पाचोड (जि.औरंगाबाद) : तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर पाचोड (ता.पैठण) येथे गुरुवारी (ता.एक) तीन वाजता पावसाने जोरदार हजेरी लावल्याने रब्बीच्या पेरणीसाठी जुळवाजुळव करून शेतावर गेलेले शेतकरी वाफसा मोडल्याने निराश होऊन गावांकडे परतले. सलग चार महिन्यांपासून पाचोडसह पैठण तालुक्यात पावसाने थैमान घातल्यानंतर केवळ दोनच दिवस उघडीप दिली, अन् शेतकऱ्यांना हायसे वाटले. परंतु आज पुन्हा पावसाने दुपारी जोरदार वादळी वाऱ्यासह हजेरी लावून शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजन घातले.

साहेब, आमच्या सोयाबीनचे पंचनामे करा हो! एकवीस गावांतील शेतकऱ्यांचा टाहो

सकाळी मोठ्या उत्साहाने शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरणीसाठी जमवा जमव करून शेती अवजारे, बियाणे, मजुर घेऊन पेरण्यासाठी शेतावर गेले. पेरणी सुरू होऊन पाटाभर रान होत नाही तोच धो....धो पाऊस सुरू झाला व क्षणातच वाफसा मोडल्याने शेतावर गेलेले शेतकरी फौजफाट्यासह घरी,गावाकडे परतले. आता पावसाने उघडीप दिली तर वेळेवर रब्बीच्या पेरण्या होतील, अन्यथा पावसाने आपला जोर कायमच ठेवला तर खरिपाच्या पेरण्याची वेळ निघून जाईल. अधिकच्या पावसामुळे रब्बीच्या पेरण्यासंबंधी प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After Two Days Rainfall Aurangabad News