विजयाच्या हॅट्ट्रीकनंतर सतीश चव्हाणांनी मानले मतदारांचे आभार; म्हणाले सर्वांची साथ प्रत्येक पावलावर होती

गणेश पिटेकर
Friday, 4 December 2020

मराठवाडा मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांनी विजयाची हॅट्ट्रीक साजरी केली आहे. त्यांनी भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांचा पराभव केला आहे.

औरंगाबाद : मराठवाडा मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांनी विजयाची हॅट्ट्रीक साजरी केली आहे. त्यांनी भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांचा पराभव केला आहे. विजयानंतर चव्हाण यांनी पदवीधर मतदारांचे आभार मानले आहेत. निवडणुकीत चव्हाण यांना १ लाख १६ हजार ६३८ मते मिळाली आहेत, तर बोराळकरांना ५८ हजार ७४३ मते घेतली आहेत.

फेसबुकवरील पोस्टमध्ये चव्हाण लिहितात, की अंतःकरण पूर्वक आभार! आपली सर्वांची साथ प्रत्येक पावलावर होती. हा विजय तुमच्या निर्व्याज प्रेमाचा आहे. मार्गदर्शनासह अथक परिश्रम घेणाऱ्या महाविकास आघाडीच्या मान्यवर नेत्यांनी, प्रत्येक ठिकाणी खांद्याला खांदा लावून लढलेल्या कार्यकर्त्यांनी आणि सत्याचाच त्रिवार विजय होतो. हे पुन्हा एकदा सिद्ध करणाऱ्या मराठवाड्यातील माझ्या तमाम सुज्ञ पदवीधर बंधू आणि भगिनींनी ही विजयश्री खेचून आणली आहे. प्रसिद्धी माध्यमे आणि समाजमाध्यमांचीही विशेष साथ मिळाली. आपणांस एकूण १,१६,६३८ मते मिळाली असून ५७,८९५ मतांच्या फरकाने महाविकास आघाडीचा महाविजय झाला आहे. आपल्या सर्वांचे आभार !


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After Victory Satish Chavan Express Gratefulness To Voters Aurangabad