महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण यांचा दणदणीत विजय, भाजपला मोठा धक्का

मधुकर कांबळे/प्रकाश बनकर
Friday, 4 December 2020

मराठवाड पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा विजय झाला आहे.

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा विजय झाला आहे. विजयाची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जाहिर केले आहे. सतीश चव्हाण यांना १ लाख १६ हजार ६३८ इतकी मते मिळाली.  पदवीधर निवडणुकीत एकूण मतदान २ लाख ४१ हजार ९०८ इतके झाले. त्यापैकी २३ हजार ९२ इतकी मते अवैध ठरली आहेत. पाचव्या फेरीअखेर सतीश चव्हाण यांना १ लाख १६ हजार ६३८, तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना ५८ हजार ७४३ मते मिळाली आहेत. सतीश चव्हाण यांनी ५७ हजार ८९५ मतांची आघाडी घेत विजयाची हॅट्ट्रिक केली साजरी केली आहे.

फेरीनिहाय दोन्ही उमेदवारांना मिळालेली मते अशी  
सतीश चव्हाण              शिरीष बोराळकर
पहिली फेरी  २७, २५०    ११, २७२
दुसरी फेरी   २६,६२७      १३,९८९
तिसरी फेरी   २६,७३९     १४,४७१
चौथी फेरी    २६,७००     १४,२८७
पाचवी फेरी   ८,७२२      ४,४३८
-----
एकूण मते: १,१६,६३८    ५८,७४३

 

मतमोजणी केंद्रावर नो सोशल डिस्टन्सिंग
कलाग्रामच्या मतमोजणी केंद्रावर विविध 35 उमेदवारांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते सकाळीच धडकले होते. त्यामुळे सकाळपासूनच येथे कार्यकर्त्यांची मोठी वर्दळ पाहायला मिळाली. प्रशासनाने कोरोना प्रतिबंधासाठी प्रत्येकाला थर्मलगने तपासून, सॅनिटायझर लावून आत सोडले जात होते. मात्र मध्ये पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी असल्याने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा फज्जा उडालेला दिसून आला. मोजणीच्या प्रत्यक्षस्थळी मोबाइल बंदी असतानाही अनेकांच्या हातात मोबाइल दिसून आल्याने वंचित बहुजन आघाडीने यावर आक्षेप घेत विभागीय आयुक्‍त सुनील केंद्रेकर यांच्याकडे सकाळच्या सत्रातच तक्रार केली. केंद्रेकर यांनी कारवाईचे आश्‍वासन दिले. मात्र पुढे काही कारवाई झालेली दिसून आली नाही.

ट्रेण्ड लक्षात येताच सोडले मतमोजणी केंद्र
सुरुवातीला अतिशय उत्साहात असलेल्या भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पोस्टल मतमोजणी नंतरच मावळला. भाजपचे उमेदवार शिरीष  बोराळकर आणि भाजप पदाधिकारी,  कार्यकर्ते मतमोजणी केंद्रावर सकाळपासूनच येऊन बसले होते. पोस्टल मतपत्रिकांची मोजणी पूर्ण झाली आणि पहिल्या फेरीची मोजणी अंतिम अंतिम टप्प्यात आली तेंव्हा ट्रेण्ड स्पष्ट जाणवू लागला. यानंतर मात्र भाजप उमेदवार शिरीष बोराळकर व अन्य भाजप पदाधिकाऱ्यांनी मतमोजणी केंद्र सोडले.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahavikas Aaghadi's Satish Chavan Win Aurangabad Graduate Constituency Election