पप्पा, कोरोना संपला ? मी जवळ येऊ का ? 

शेखलाल शेख
Friday, 17 April 2020

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सध्या बालाजी पडगी, संतोष रोमन, चांगदेव गायकवाड, सुधीर मेने, सुरेश जाधव, शांतीलाल फुले आणि मी अशा चालकांना कोरोना स्पेशल ड्युटी देण्यात आली आहे. यामध्ये एक दिवस १२ तास तर एका रात्री १२ तास अशा आठवड्यातून दोन दिवस कोरोना स्पेशल ड्युटी येतात. यामध्ये कोरोनासाठी स्पेशल रुग्णवाहिका देण्यात आलेली आहे.

औरंगाबाद: ‘‘पप्पा, कोरोना संपला का? मी तुमच्या जवळ येऊ का? सांगा ना मी कधी तुमच्याकडे येऊ? ’’ हे काळीज पिळवटून टाकणारे वाक्य आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात (घाटी) रुग्णवाहिकेवर चालक असलेल्या संदीप जमधडे यांच्या तीनवर्षीय दीक्षांत नावाच्या मुलाचे. श्री. जमधडे हे सध्या कोरोना स्पेशल ड्युटी करीत आहेत.

ड्युटी संपल्यावर घरी आल्यानंतर त्यांना कोरोनामुळे मुलांना जवळ करता येत नाही. त्यांनी सध्या स्वतःला घरात सेल्फ आयसोलेशन केले. ड्युटी करताना पुरेशा सुरक्षेच्या सुविधा दिल्या असून, मी सुरवातीला स्वतःच कोरोना स्पेशल ड्युटी मागून घेतली होती. यासाठी विशेष प्रशिक्षणसुद्धा देण्यात आल्याची माहितीही चालक जमधडे यांनी दिली. आता त्यांच्यासोबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सहा चालकांना कोरोना स्पेशल ड्युटी देण्यात आली आहे.

हेही वाचा- लाॅकडाऊनमध्ये फेसबुकवर बहरली प्रेम कहाणी

श्री. जमधडे म्हणाले, ‘‘कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यानंतर अनेकांच्या मनात याची खूप जास्त भीती होती. मी आणि माझे सहकारी संदीप फुले यांनी १८ मार्चला पत्र लिहून स्पेशल कोरोना ड्युटी मागून घेतली. २० मार्चपासून आम्हा दोघांना रुग्णवाहिकेवर कोरोना स्पेशल ड्युटी मिळाली.

सुरवातीला संशयितांना मी आणि माझे सहकारी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात घेऊ जात होतो. यामध्ये धोका असला तरी पुरेशी सुरक्षा साधने आम्हाला दिली गेली आहेत. ३१ मार्चपर्यंत मी पन्नास पेक्षा जास्त रुग्णांना घेऊन गेलो. त्यानंतर आता अनेक सहकाऱ्यांना ही जबाबदारी देण्यात आली.’’ 

या चालकांना कोरोना स्पेशल ड्युटी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सध्या बालाजी पडगी, संतोष रोमन, चांगदेव गायकवाड, सुधीर मेने, सुरेश जाधव, शांतीलाल फुले आणि मी अशा चालकांना कोरोना स्पेशल ड्युटी देण्यात आली आहे. यामध्ये एक दिवस १२ तास तर एका रात्री १२ तास अशा आठवड्यातून दोन दिवस कोरोना स्पेशल ड्युटी येतात. यामध्ये कोरोनासाठी स्पेशल रुग्णवाहिका देण्यात आलेली आहे.

हेही वाचा- अकरा जिल्हाधिकाऱ्यांना उच्च न्यायालयाची नोटीस

सुरवातीला घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, वैद्यकीय अधीक्षक सुरेश हरबडे, वाहन विभागप्रमुख डॉ. सरफराज यांनी चालकांचे पालकत्व घेऊन त्यांना विशेष प्रशिक्षण दिले. 

कुटुंबापासून स्वतःला ठेवावे लागते वेगळे 

कोरोना स्पेशल ड्युटी करणारे डॉक्टर, कमर्चारी आणि चालकांनी स्वतःला कुटुंबापासून वेगळे केले आहे. कोरोना स्पेशल ड्युटी करताना त्याच दिवशी घाटीत अंघोळ करून दहा ते बारा तास घाटी रुग्णालयात राहावे लागते. त्यानंतरच आम्ही घरी जातो; मात्र घरही वेगळे राहतो. कोरोनाची आम्हाला भीती वाटत नाही.

या अगोदर मी अवयवदानाच्या वेळीसुद्धा रुग्णवाहिका चालविली होती. आम्हाला पुरेशी सुरक्षा साधने दिली गेली; तसेच सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डॉ. ज्योती बजाज यांनी घरांच्यापासून आयसोलेटेट कसे राहायचे, याबद्दल विशेष माहिती दिली, असे जमधडे यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ambulance Driver Corona Special Duty Aurangabad News