वाळूजमध्ये अल्पवयीन मुलीची काढली छेड, संतप्त जमावाने तरूणास दिला बेदम चोप

रामराव भराड
Sunday, 13 December 2020

एका अल्पवयीन मुलीच्या पाठीमागे जाऊन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी संतप्त जमावाने एका तरुणास बेदम चोप दिला.

वाळुज (जि.औरंगाबाद)  : एका अल्पवयीन मुलीच्या पाठीमागे जाऊन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी संतप्त जमावाने एका तरुणास बेदम चोप दिला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. ही घटना रविवारी (ता.१३) दुपारी वाळूज येथे घडली. वाळूज येथील लाईननगर परिसरात राहणारी अल्पवयीन मुलगी रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास उघड्यावर शौचास जात होती. ती झाडाझुडपात गेल्याचे पाहताच एक तरुण तिच्या पाठीमागे गेला. हा प्रकार काही लोकांच्या लक्षात आला.

मुलीच्या पाठीमागून गेलेला तो तिची छेड काढत असताना काही लोकांनी धाव घेत त्याच्या तावडीतून मुलीची सुटका केली. त्यानंतर तेथे मोठी गर्दी जमा झाली. या गर्दीतील संतप्त जमावाने या तरुणास बेदम चोप दिला. त्यामुळे तो जागेवरच बेशुद्ध पडला. हा प्रकार वाळूज पोलिस ठाण्याच्या गस्तीवर असलेल्या राजू डाखोरे व प्रदीप बोरुडे यांच्या लक्षात आला. त्यामुळे त्यांनी वेळी तिकडे धाव घेऊन संतप्त जमावाच्या तावडीतून त्या तरुणाची सुटका केली. दरम्यान १०८ रुग्णवाहिकेचे डॉ.अनंत पाटील व पायलट नितीन लांडगे यांनी बेशुद्ध पडलेल्या तरुणास उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटीत दाखल केले. त्यानंतर संतप्त जमाव शांत झाला.

   
उपचारासाठी हलवण्यास विरोध
घटनेची माहिती मिळताच पीडित मुलीचे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान बेशुद्ध पडलेल्या त्या तरुणास उपचारासाठी दवाखान्यात हलवत असतानाच मुलीच्या नातेवाईकांनी विरोध दर्शवत त्याला आमच्या तावडीत द्या. आम्ही पाहून घेतो. असे म्हणून दवाखान्यात घेऊन जाण्यास विरोध केला.

 

संपादन - गणेश पिटेकर
      


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Angry Crowd Beaten Youth Waluj Aurangabad News