जेथे एक ड्रमसाठी पैसे मोजावे लागतात तेथे ते चालवितात पाणपोई 

शेखलाल शेख
Wednesday, 3 June 2020

अलोकनगर, चंद्रशेखरनगर भागातील जनावरे येथे दररोज पाणी पिण्यासाठी येतात. काही जणांकडे पाळीव जनावरे असल्याने ते सुद्धा येथे पाणी पिण्यासाठी आणतात. शहरात एक ड्रमच्या पाण्यासाठी पैसे मोजावे लागतात तेथे मधुकर देशमुख यांना दररोज ३ ते ५ ड्रमपर्यंत पाणी जनावरांसाठी लागते. तेवढी पाणी त्यांच्याकडील बोअरला सुद्धा असते. त्यामुळे त्यांच्याघरातील मंडळी दररोज येथील पाण्याचे टब भरुन ठेवतात.

औरंगाबाद: मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने हंडाभर पाण्याला सुद्धा प्रचंड मोल आहे. दरवर्षी उन्हाळ्यात माणसांची आणि जित्राबांची तहान भागविण्यासाठी प्रशासनाची धडपड सुरु असते. अनेक भागत टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो. तर काही जण विकतेचे पाणी घेतात. औरंगाबादच्या सातारा परिसरात तर अशीच बिकट परिस्थिती असते.

अशा स्थितीत ही चहा विक्रेते मधुकर देशमुख हे मागील पाच वर्षापासून सातारा परिसरातील अलोकगनर, चंद्रशेखरनगर भागात मागील पाच वर्षापासून जनावरांसाठी पाणपोई चालवत आहे. त्यांच्याकडील बोअरल भरपुर पाणी असल्याने दररोज ३० ते ४० जनावरे पाणी पितात. भटकणारी, तसंच दावणीची जित्राबं येथे येतात पाणी पिऊन तृप्त होतात. 

मधुकर देशमुख हे चहा विक्रीचा व्यवसाय करतात अगोदर त्यांची नुतन कॉलनी येथे चहाची हॉटेल होती. आता त्यांची बीडबायपास भागात चहाची टपरी आहे. हे सर्व करत असतांना त्यांच्या मनात सामाजिक दायित्वाची भावना सुद्धा आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच मानवासह प्राण्यांनाही पाणी टंचाईची झळ बसत आहे. पाण्यासाठी जनावरांना तर वनवन भटकावे लागत आहे. हे लक्षात घेऊन एन. डी. अग्रवाल यांनी देशमुख यांना गो सेवा करण्याची सूचना केली होती. त्यानंतर अग्रवाल यांनी त्यांना पाण्याचे टब घेऊन दिले.

हेही वाचा- औरंगाबादेत आणखी दोघांचा मृत्यू, भुसावळच्या रुग्णाचा समावेश

सातारा परिसरातील त्यांच्या घरातील बोअरला चांगले पाणी असल्याने त्यांनी पाच वर्षापुर्वी जनवारांसाठी पाणपोई सुरु केली. विशेष म्हणजे वर्षभर अग्रवाल यांनी देशमुख यांच्या बोअरसाठीचे लाईटबिल सुद्धा भरले. त्यानंतर आता मधुकर देशमुख यांची मुले मोठी कमावती झाली. त्यांच्याकडे एक पिठाची गिरणी सुद्धा आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या पाणपोईचा उपक्रम अविरतपणे सुरु ठेवला. 

अलोकनगर, चंद्रशेखरनगर भागातील जनावरे येथे दररोज पाणी पिण्यासाठी येतात. काही जणांकडे पाळीव जनावरे असल्याने ते सुद्धा येथे पाणी पिण्यासाठी आणतात. शहरात एक ड्रमच्या पाण्यासाठी पैसे मोजावे लागतात तेथे मधुकर देशमुख यांना दररोज ३ ते ५ ड्रमपर्यंत पाणी जनावरांसाठी लागते.

तेवढी पाणी त्यांच्याकडील बोअरला सुद्धा असते. त्यामुळे त्यांच्याघरातील मंडळी दररोज येथील पाण्याचे टब भरुन ठेवतात. दुपारी ते रिकाम झाले तर ते पुन्हा भरले जाते. कडक उन्हाळात येथे जनावरे पाणी पिऊन तृप्त होत असल्याने आपल्याला आत्मीक समधान मिळते असे देशमुख यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Animal Panpoi Aurangabad News