
तृतीयपंथीयांची समाजाकडून होणारी अवहेलना थांबविण्यासाठी शासन, सेवाभावी, सामाजिक संस्थांकडून प्रयत्न सुरू आहेत.
औरंगाबाद : तृतीयपंथीयांची समाजाकडून नेहमीच अवहेलना केली जाते. मात्र त्यांना समाज प्रवाहात आणण्यासाठी स्मार्ट सिटीतर्फे सुरू असलेल्या विविध उपक्रमात कंत्राटी पद्धतीने नोकरीवर सामावून घेण्याचा क्रांतिकारी निर्णय महापालिकेचे प्रशासक तथा औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी घेतला आहे. शहर बससेवा, स्मार्ट सिटीच्या कार्यालयात पहिल्या टप्प्यात या नियुक्त्या दिल्या जातील, असे श्री. पांडेय यांनी नमूद केले.
औरंगाबादकरांसाठी आनंदाची बातमी! मालमत्ता करावर मिळणार घसघशीत सूट
तृतीयपंथीयांची समाजाकडून होणारी अवहेलना थांबविण्यासाठी शासन, सेवाभावी, सामाजिक संस्थांकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यांचे आर्थिक व शैक्षणिक सक्षमीकरण केले जात आहे. त्यांचा छळ थांबविण्यासाठी कायदे देखील करण्यात आले आहेत. काही तृतीयपंथीयांनी विपरीत परिस्थितीवर मात करून समाजात मानाचे स्थान मिळविले आहे. अनेकांनी राजकारणासह इतर कामांत ठसा उमटवला आहे. बोटावर मोजण्याएवढी उदाहरणे सोडली तर इतरांची मात्र अवहेलनाच सुरू आहे.
आधार लिंक नाही तर कर्जमुक्तीचा लाभही नाही; औरंगाबादमधील ६ हजार ९९३ लाभार्थींचे आधार लिंक नाही
औरंगाबाद शहरात तृतीयपंथीयांची संख्या पाचशेपेक्षा अधिक असून, यातील अनेक जण सुशिक्षित असूनही रस्त्यावर फिरून पैसे मागून उपजीविका भागवितात. त्यांच्यासाठी औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. यासंदर्भात श्री. पांडेय यांनी सांगितले की, तृतीयपंथीय हा घटक नेहमीच उपेक्षित राहिला आहे. समाजात त्यांना मानाचे स्थान मिळत नाही.
त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार मानाचे स्थान देण्यासाठी स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत काही तृतीयपंथीयांना कंत्राटी पद्धतीने नोकरी देण्याचा संकल्प केला आहे. लवकरच त्याला मूर्त स्वरूप मिळेल. स्मार्ट सिटी अभियानातर्फे स्मार्ट बससेवा चालविली जाते. याठिकाणी बसची माहिती देण्यासाठी उद्घोषक किंवा इतर कामे त्यांना दिली जातील.
दोन महिन्यांत होणार प्रक्रिया पूर्ण
तृतीयपंथीयांना नोकरीत सामावून घेण्यासंदर्भातील प्रक्रिया आगामी दोन महिन्यात पूर्ण करण्यात येईल. त्यासाठी रीतसर जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असून, स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुष्कल शिवम् यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आल्याचे श्री. पांडेय यांनी सांगितले.
संपादन - गणेश पिटेकर