औरंगाबाद-सोलापूर महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारची दुभाजक ओलांडून ट्रकला धडक; एक ठार, तर एक गंभीर जखमी

शेख मुनाफ
Sunday, 21 February 2021

यात कारचा चुराडा होऊन कारमधील मोरेश्वर वैद्य हे जागीच ठार झाले, तर संजय मांडे हे गंभीर झाले. हे दोघेही औरंगाबाद येथील रहिवासी आहेत.

आडुळ (जि.औरंगाबाद) : बीडकडुन येणाऱ्या कारच्या चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार दुभाजक ओलांडून औरंगाबादकडुन पाचोडकडे जाणाऱ्या ट्रकला समोरुन धडकली. यात कारमधील एक जण जागीच ठार , तर तिन जण जखमी झाल्याची घटना शनिवारी (ता.२०)  रोजी रात्री पाऊणे बाराच्या सुमारास औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील रजापुर (ता.पैठण) शिवारात घडली आहे.

वाचा - वाहनाच्या जोरदार धडकेत तरुण जागीच ठार, पैठण-औरंगाबाद रस्त्यावरील दुर्दैवी घटना

औरंगाबाद- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने बीडकडून औरंगाबादकडे जाणारी कार  (एमएच २० ईवाय ६९५३) रजापुर शिवारात चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने दुभाजक ओलांडून औरंगाबादकडून पाचोडकडे जाणाऱ्या ट्रकला (एमएच ०४ जेके ४५६५) धडकल्याने कार व ट्रकचा भीषण अपघात झाला.

वाचा - मोबाइलचे हप्ते थकले ते भरून टाक, असे म्हणताच महिलेला संताप अनावर धारदार वस्तूने केला एकाला जखमी

यात कारचा चुराडा होऊन कारमधील मोरेश्वर वैद्य हे जागीच ठार झाले, तर संजय मांडे हे गंभीर झाले. हे दोघेही औरंगाबाद येथील रहिवासी आहेत. मागे बसलेली एक महिला व एक छोटी मुलगी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांची नावे वृत्त लिहेपर्यंत माहित झाली नव्हती. जखमींना आयआरबीच्या 1033 रुग्णवाहिकेचे डॉक्टर डॉ. विजय धारकर, चालक आत्मराम गाढेकर, रवी गाढे यांनी पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविले. थापटी तांडा येथील विनोद राठोड व ग्रामस्थांनी मदत कार्य केले.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Accident News One Dies, One Serious Injured At Rajapur Paithan